सोमवार, ९ जानेवारी, २०१७

रोह्यातील मुसाफिरी - किल्ले घोसाळगड आणि कुडा लेणे

किल्ले घोसाळगड - तटबंदीयुक्त माची 
सालाबादप्रमाणे , म्हणजेच  नित्य नेहेमीच्या आमच्याच नियमावली प्रमाणे , इंगजी नव्या वर्षाची सुरवात , नवं वर्ष स्वागत हे आपल्या सह्याद्रीतल्या  कड्या कपारीत , निवांत रमणीय अश्या निसर्गदत्त वलयात  , भौगलिक अन ऐतिहासिक वारसा किंव्हा  वैभव लाभलेल्या आपल्याच  दुर्ग मंदिरात  , सह्य माथ्याशीच , त्याच्या सहवासात रंगून मिसळूनच होते.
नवी ऊर्जा ,  जगण्याची नवी प्रेरणा ,नवी उमेद हि ह्या गतवैभवातूनच सहजी  अशी मिळून जाते. 

यंदाचं म्हणावं तर हे वर्ष  देखील  असंच , २०१६ च्या डिसेंबर महिन्याच्या एक आठवडाभर आधीच एक दोन दिवसाची मोहीम आम्ही उरकली होती .  रवळ्या जवळ्या आणि  मार्कंड्या ...  त्यानंतर आठवड्या भरानंतर  लगेचच हि ..आमची पुढील  मोहीम....
किल्ले घोसाळगड आणि  कुडा लेणी ...

रायगड जिल्ह्यातील , निसर्ग संपन्न अश्या  , कुंडलिका नदीच्या सानिध्यात  नितळपणे खळखळत हसत असलेलं  रोहा , त्या जवळील हि  मुशाफिरी ...

दिवा -  सावंतवाडी : 
दिवा-सावंत वाडीच्या नेहमीच्याच वर्दळ असणाऱ्या गाडीने प्रवास करणं म्हणजे दिव्यत्वेचा साक्षात्कार जणू  ,   ह्याचा प्रत्यय तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतलाच असेल  एकदा....

अफाट गर्दी , आणि त्या दिव्य अफाट  गर्दीतून मार्ग काढत , सुरू असलेली विक्रेत्यांच्या सामानांची खरेदी  विक्री,गोंगाट  जणू आक्खी ट्रेन हि  एक स्वतंत्र चालतं बोलतं मार्केटच आहे जणू  ,असा  भास नाही तर  प्रत्यक्षदर्शी जाणीव आपल्याला तिथे होते .
वेगवेगळ्या स्तरातील , आवाजातील  लयबद्द ,अभिनय अश्या शैलींनी सादर केलेली विक्रेत्यांची ती 'आरोळी' ...मनाला वेगळ्याच तंद्रीत, भावनगरीत  खेचून घेते . 
करमणूक तर होतेच पण त्या शब्दांची जादू ,  चेहर्यावरचे विविध रंगभाव ह्याकडे आपलं बारीकशी लक्ष लागून राहतं.  

कुणी 'शिरा उपमा कांदा पोहे' घ्या असं म्हणता म्हणता ..
''घाऊन घ्या ताई मी परत येणार नाही ..'' हे पुढचं वाक्य शक्कल लढवून सहज  बोलून  जातं. (आणि खरंच पुन्हा येत नाही )
कुणी , मामीने बनविलेले , चुलीवरचे  वडापाव , १० ला दोन असं म्हणतं , भाव खाऊन जातं .
कुणी बोरं घ्या, चमेली बोरं  म्हणतं,
कुणी कारली , मेथी पावटा , पासून , कचोरी भाकरवाडी , वेफर्स , ते गावठी केळी पर्यंत येऊन पोहोचतं. 
कुणी 'माझ्या तर्फे खाऊन घ्या, पैसे  अजिबात देऊ नका' इथपर्यंत मजल मारतं. 
तर कुणी आप आपसात 'आजचा दिवस जाऊ देत सोन्याचा , उद्याचा दिवस जाऊ देत चांदीचा' ...असं
गमतीनं, पण आपलेपणान  म्हणतं ..एकमेकांनच्या  व्यवसायाला हातभार लावतं. 
इतक्या भाव छटा , इतके भावतरंग , शब्दोली सहज आपल्याला ह्या दिवा सावंतवाडी प्रवासात  मिळून जातात.
असाच प्रवास करत आम्ही  रोह्याला पोहचलो . 


तेंव्हा साधारण पावणे दहा झाले होते. नित्य नेहेमीच्या दिनक्रमानुसार आजही  अर्धा पाऊण  तासाचा फरक पडला होता.  दिवा सावंतवाडी उशिरा  पोहोचली होती .
त्यामुळे आता घाई करणं आम्हाला  भाग होतं. पुढची मोहीम वेळेवर अवलंबून होती.
रोह्याला उतरून , लगेचच पायीच  आम्ही एसटी डेपो  गाठलं .
त्यात   कुंडलिका नदीचं सुंदर पात्र  अन गावाच्या वळणवाटेतून येता येता , चकचकीत अशी नवी कोरी भांडी दिसली ती  कॅमेरात बंदिस्त करून घेतली.


कुंडलिका ....आणि एकमेकांकशी  चालता बोलता  पंधरा ते वीसेक मिनिटात , आम्ही एसटी स्थानकात दाखल  झालो .  पुढील पाच एक मिनिटात घोसाळगड मार्गी (मुरुड - भालेगाव ) जाणाऱ्या एसटीने ,

वळणावळणाच्या त्या हिरवाईने घेरलेल्या दाट  घाटवाटातून, (आंब्यांचे कलम , तंटामुक्त गाव  पाहत  ) आम्ही अर्धा तासात  घोसाळगड च्या पायथ्याशी पोहोचलो .  समोरच हिरवाईने वेढलेला सुंदरसा छोटेखानी किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आम्हाला साद देत होता. 
क्रमश : 

--------------------------------------------------------------------

कुडा लेणी ...
 

 


 रवळ्या जवळ्या - मार्कंड्या अन...

रवळ्या जवळ्या वरील मंतरलेली रात्र अन मार्कंड्या च अध्यात्मिक महात्म्य... 

(रवळ्या जवळ्या पठारावरून , किल्ले जवळ्या कडे प्रस्थान करताना , नजरेत भरलेला राजबिंडा असा देखणा धोडप किल्ला ...)
नाशिक हे माझं सर्वात आवडतं ठिकाण ,
ते त्याच्या उंचच उंच अश्या कातळकोरीव रौद्र भीषण पण तितक्याच सौन्दर्यपूर्ण अश्या सह्य कड्यांमुळे, ऐतिहासिक तसेच पावित्र्य अश्या अध्यात्मिक महतीमुळे..
गेले दोन दिवस अश्या ह्या आपल्या सह्य मंदिरात आम्ही मुक्काम धरून होतो.
रवळ्या जवळ्या पठारावरील लुकलुकणाऱ्या असंख्य तारका समूहा सोबत , त्या नभो मंडळात , गूढ अश्या शांत वलयात अनुभवलेली/ मंतरलेली ती रात्र , कदापि विसरता येणार नाही. 
तारका समूहांच ते पांघरून अंगावर घेऊन निजनं किंव्हा नजर उघडी ठेवत नक्षत्रांच ते देणं अनुभवणं ह्यासारखं सुख नाही.
भर दिवसा अन सांज समयी , रवळ्या जवळ्या वरील गूढ वलय, तो सौम्य(आनंद देणारं) थरार , त्या वास्तू अन एकूण रम्य असा सभोवताल... मन अगदी प्रसन्नतेत खळखळत होतं.

वणी दिंडोरी/ कांचंनबारी ची लढाई मनाच्या तळघरात दौड करत होती.
भेटलेले गावकरी ,अध्यात्मिक गुरू , त्यांच्या सोबत जुळलेली आपलेपणाची नाळ, अन सप्तशृंगी मातेचं दैवी वलय मनाला एक आगळं वेगळं वळण देत होतं.

नाशिक ची सौन्दर्य सृष्टी अन ऐतिहासिक , अध्यात्मक दृष्टी हि अंतःकरण उजळून देणारी आहे.
महिपत सुमार रसाळ ह्या त्रिकुटा नंतर ह्या वर्षाअखेरीसच हे त्रिकुट आमच्या साठी अविस्मरणीय असंच ठरलं.
मित्रावळ , मित्रावळातील संघटन अन प्रेम असंच चीरतरुण राहो...
लवकरच इतर फोटोस अपलोड करेन, अन विस्तृत असं (ब्लॉग) लिहेनच...

    
     (मार्कंड्यावरून ...सप्तशृंगी दर्शन ..)शनिवार, १३ ऑगस्ट, २०१६

गर्द वनातील त्रिकुट _ महिपतगड _सुमारगड आणि रसाळगड

नभा नभातुनी 
दऱ्या खोऱ्यांतुनि   
गर्जितो माझा सह्याद्री ...!!

दिशा दिशांना 
साद घालूनी 
पुलकित होतो सह्याद्री ...!!!
    
मी निसंर्ग प्रेमी आहे अन सह्य वेडा हि..अन  म्हणूनच  सह्याद्रीत वारेमाप भटकताना मी स्वतः असा विरून जातो . प्रेरित इतिहासाची अन भौगोलिक दुनियाची सांगड घालत. 
तर कधी ह्या सृष्टी सौंदर्याने  नटाटलेल्या निसर्गाशी एकरूप होतं त्याच्याशी हितगुज करतं  ...
महिपतगड _सुमारगड आणि रसाळगड हि अशीच आमची एक सुंदर, गर्द वनातलि त्रिकुट मोहीम ...चार मित्रांसमवेत, ३ दिवस  अनुभवलेली . 
चला तर मग त्या अनुभवाची शिदोरी तुमच्या पुढे उघड करतो ...२०१५ , नोव्हेंबर  सरला ,  डिसेंबर महिना उजाडला .  सालाबादप्रमाणे  इंग्रजी महिन्याच्या वर्षा अखेरीस , सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात भटकंती करण्याचे आमचे स्वप्नं मनी वेध घेऊ लागले . 
कुठे जायचं ह्याचा  ठराव पास  झाला . हळूहळू एकेक माहिती जमा  होऊ लागली. 
त्यावर मित्रांची बैठक झाली. काय , कस जायचं ह्यावर चर्चा रंगली . वेळ खर्चाचा अंदाज मांडला गेला. 
जाण्यावर अन तारखेवर शिक्कामोर्तब झाले.     
अन पाठीवर ओजड अशी  सक्क लादून , आम्हा ४ मित्रांची फौज ३१ तारखेच्या रात्री कोकण कन्या च्या संगतीने  खेड च्या प्रवासाला  वारेमाप निघाली. गर्द  वनातील त्रिकुट  सर करायला. 
त्याच नाव  महिपतगड _सुमारगड आणि रसाळगड .  
रत्नागिरी जिल्ह्यातल्या  खेड तालुक्याच्या पूर्वेस , साधरण २०-२५ किमी दूर, सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर अशी  उभी असलेलेली हि गर्द वनातील डोंगर रांग ..म्हणजेच महिपतगड _सुमारगड आणि रसाळगड . 


नित्य नेहमी सह्याद्रीत वणवण भटकणारे  अन वेग वेगळ्या वाटा  धुंडाळनारे  ट्रेकर्स मंडळी इथे हमखास भेट 
देऊन जातात.   पण इतर  कुणी इथे फिरकत नाही . अपवाद काय तो रसाळ गडाचा. कारण तिथपर्यंत आता थेट गाडी रस्ता झाल्याने , पायथ्याशी वाहनं हि नेता येतात .  त्यामुळे जाणं येण सहज सोपं  अन आरामदायी झालं आहे . किल्ला हि म्हणावा तसा छोटेखानी पण देखणा  असल्याने  इथे पर्यटकांचा ओघ तसा अधून मधून होतच असतो. . आम्हाला  आमच्या ट्रेकची सांगता ह्याच  रसाळ वाणी  किल्ल्यांनी करायची होती. म्हणून आम्ही थोडी वेगळी वाट धरली. 
मुळात इथे येण्याआधीच आमचा तसा प्लान ठरला  होता . 
भले खेड पासून रसाळगड - सुमारगड  - महिपतगड ,असा दुर्गक्रम असला तरी आमची सुरवात 
महिपतगड पासून होणार होती . त्यासाठी दहिवली हे महीपत गडाच्या पायथ्याचे गाव गाठायचे होते. 
तेथून सुमारे  साडे तिन तासाची उभी चढणीची पायपीट  आम्हाला बेलदार वाडीत घेऊन जाणार होती. 
बेलदार हि साधारण पंधरा एक घरांची मिळून असलेली टुमदार वाडी. येथून किल्ला गाठण्यास साधरण पाऊन एक तास लागतो. 
 दुसरी एक वाट  म्हणजे   वाडी जैतापूर (मांडवा ) मार्गे  ,  सरळ सोपी वाट ..येथून हि बेलदार वाडीत पोहचता येते. आता तर येथून अर्ध्यापर्यंत गाडी रस्ता आला आहे . त्यामुळे येथून जाणे म्हणजे  वेळेची अन शारीरिक उर्जेची बचतच म्हणावी लागेल. 

तर कोकण कन्याच्या सुसाट हवेशीर प्रवासाने आम्ही खेड गाठलं.   तेंव्हा २०१५ ची सांगता होऊन 
२०१६ ह्या इंग्रजी नवं वर्षाची सुरवात झाली होती. पहाटेचा अंधार मात्र अजूनही गडद रंगाने न्हाहून  निघाला होता. सूर्य नारायणाची कोवळी साज अजूनही क्षितिजाशी उधळली न्हवती. 
पहाटेचे तसे साडे पाचच  वाजले होते . पण साडेपाच च्या सुमारास सुटणारी दहिवली एसटी मात्र अजूनही गैरहजर होती. म्हणून तिच्या अनुपस्थितच  , तोपर्यंत तिथल्याच एका हॉटेल मध्ये आम्ही थोडफार खाऊ पिउ घेतलं . आणि साधारण सव्वा सहाच्या सुमारास  एसटीच  आगमन होताच , एसटी दिशेने  धाव घेतं. आत शिरकाव करत जागा   मिळेल तिथे आम्ही आसनस्थ झालो. 

तशी एसटीत तुरळकच  माणसं होती.  मुंबई  वरून काही दाखल झालेली.  आप्तजणांच्या  भेटीसाठी, कुणी कुठल्याश्या कामासाठी , आम्ही मात्र मुद्दाम वेडी वाकडी वाट करत किल्ले भ्रमंती साठी निघालो  होतो. 
बस्स अजून , काही क्षणाचा  अवधी होता.  महीपतगडाच्या दर्शनासाठी मन आसुसलं  होतं .   
साधारण १ तासाचा हा पल्ला , हा  एसटी प्रवास , आम्हाला आमच्या मुक्कामी म्हणजेच दहिवलीला घेऊन जात होता.  तिथून पुढचा पायी प्रवास ...ठरलेला. 

दहिवली  -  लहान मोठ्या वाड्यांचे मिळून असलेलं एक  गावं . 
आम्ही साधारण  सव्वा सात च्या ठोक्याला , कुडकुडतच दहिवली गावात पोहाचलो.  
तेंव्हा सुर्य नारायणाची कोवळी किरणं हि  एव्हाना भूतळावर दाखल झाली होती. 
साऱ्या सृष्टीची दिनचर्या , उगवत्या  त्या सूर्य नारायणाला जणू  वंदन करत सूर खेळू लागलेली.  
पाखरांची मंजुळ शिळ मनाशी सौख्य उजळत होती.  
हळूहळू गाढ निद्रा अवस्थेतून लोकं हि  जागे होत  आप आपल्या कामास जुंपत होते. 
कौलारू घरांच्या एकेक वाड्यांनी वसलेलं हे गाव . फारचं   देखण अन सुंदर दिसत होतं. 

दहिवली - हे म्हणावं तर  लहान मोठ्या वाड्यांचे मिळून असलेलं एक  गावं . 
इथले ग्रामस्थ म्हणजे शेलार - मोरे आणि इतर जण . दळणवळणाच त्याचं साधन म्हणजे हि  एसटी आणि  काही  खाजगी वाहन. भात इथला मुख्य पीक , वर्षभरातुन तो  एकदा घेतला  जातो. 
असं तिथल्या ग्रामस्थांकडून कळलं.   असो , 

सकाळी 7 दरम्यान आम्ही एसटीतून  दहिवलीत उतरलो . काळोख्या नजरेतून आमची आता सुटका झाली होती. प्रकाशधारा दिसू लागल्या होत्या . आभाळ कसं मोकळं होतं. गारवा फैलून होता .  एक  मोकळा श्वास घेत आम्ही इकडं  तिकडं जरा नजरानजर केली. काही ग्रामस्थ मंडळी उभी दिसली. त्यांच्याशी चौकशी करावयास म्हणून गेलो.  
किल्ल्याची वाट कोणती हो ? तेंव्हा ते आमचं बोलण ऐकून , एसटी तून उतरल्यांपैकी एकाने ..चला या माझ्यासोबत म्हणून. पथपरेड सुरु केली. 
त्यांच्या बरोबरीने  आम्ही हि चालू लागलो. चालता  चालता, एकमेकांची ओळख झाली . 
नाव  : उमेश मोरे , वरच्या शेलार वाडीतले.   मुंबईतून   शक्ती तुराच्या कार्यक्रमासाठी आज विशेष करून ह्याचं येन झालं होतं . शाहीर असल्याने त्यांचाच तो  कार्यक्रम होता. त्यांनी आयोजित केलेला. 
संध्याकाळी सात च्या सुमारास ...इथल्याच कुणा एका गावात तो कार्यक्रम ठरलेला. त्यासाठी त्यांनी  आम्हाला हि येण्याचं आमंत्रण दिलं . पण ते काही आम्हाला शक्य न्हवतं. 
महीपतगडाची ओढ अधिकच खुणावू लागली होती .  घोड्यांच्या टापांनी  पाय आता घौड दौड करू लागले होते.

दहिवली गावातुनाच सरळ उजवीकडच्या हाताला वळसा घेत , 
थोडा उंचवटा चढत आम्ही पुढे सरू लागलो. उमेश मोरेंच्याच एका ओळखी ठिकाणी , आग्रहातर आम्ही चहा पान घेतलं. अन क्षणभराच्या विश्रांती नंतर  पुन्हा नव्या दमानं आमच्या  मार्गीस्त लागलो. 

दहिवली गावातून साधारण  १५-२० मिनिटाच्या पायपीटा नंतर, थोडा उंचवटा गाठल्यावर शेलार वाडी लागते.  तिथूनच पुढची पायवाट आहे . 
उमेश मोरेंनी आम्हास  एका टेकडापर्यंत मार्ग दाखवला. आणि आणि आल्या मार्गी ते पुन्हा  माघारी  परतले.  आता येथून पुढे आम्हालाच आमची पायवाट शोधावि लागणार होती. 
काही क्षण तिथेच बागा टाकून आम्ही क्षणभर  विसावलो . सभोवतालाच्या  शांततेची एकरूप होतं.   
आणि पुन्हा मार्गीस्थ झाली . 

गर्द रानातली सुकलेली पानवळ सर्वत्र  अस्ताव्यस्त  अशी पसरलेली. 
त्या पानवळी तून चालताना करकर असा नादब्रम्ह होई. तेंव्हा ह्या मातीशी  निष्ठा राखून, आपलं अस्तित्व मिटेपर्यंत झगडणाऱ्या त्या सुकल्या पानांची कथा अगदी  नव्यानेच  जन्म घेई. 
अन मनाला जगण्याचा मर्म सांगू जाई . 
निसर्गातील प्रत्येक घटक  हा तसा जगण्याचा एक मूळमंत्रच  आहे. त्याकडे डोळसपणे पाहिलं कि ते स्वतःउन उमगून येतं . 
वेड्या वाकड्या वाटे आम्ही पुढे चालत होतो . अधून मधून कुठल्याश्या पाखरांचा मंजुळ स्वर कानी पडत होतं . वाऱ्याची झुळूक हि घामजलेल्या अंगाला सुखद असा स्पर्श करून जाई....  
जणू निसर्गातील ममत्वेचा हा हळुवार स्पर्शच ... 
अंगातला क्षीण अश्याने कुठल्या कुठे निघून जात होता. 

चालता चालता आम्ही  एकमेकांशी बोलत होतो . मधेच शांत होतं होतो . निसर्गाच्या चमत्कारीत घटकांचा  कानोसा घेत. आम्ही आता एका टेकडावर येउन पोहोचलो.  महीपतगडचा  येथून विहिन्ग्मय अस दृश्य नजरेस भरलं. तासाभराची हि पायपीट खरंच सुखाचं क्षण देऊन गेली.  कॅमेरातही ते क्षण बंदिस्त करून घेतले  अन पुन्हा पायीपिट  सुरु केली. 

साधारण तीन ते साडे तीन तासाची तंगडतोड केल्यावर , चढ उतार करत आम्ही , कुठे , बेलदार वाडीत येउन पोहोचलो. 

बेलदार वाडी - हि पंधरा एका घरांची , निसर्गसंपन्न अन डोंगरांनी दरयांनी वेढलेली अशी हि डौलदार वाडी. 
तिथे शिरकाव करण्याआधी  गावाच्या वेशीवर  ग्रामस्थ शंकर पवार ह्या आजोबां ची आमची गाठभेट झाली. तेंव्हा चालता बोलता  त्यांच्यासोबतच  त्याचं घर गाठलं . 

शेणा मातिनी सारवलेलं ते  कुड्याचं  घर,  फारच देखण असं .  प्रवेश करताच आजींनी अगदी आपलेपणानं स्वागत केलं .  
नुकताच शेणानं  सारवलेल ते अंगण  , .उन्हं लागू नये म्हणून केलेली बाबूंची आरास अन त्यावर फांद्या पानांनी झाकाळलेलं मांडव ....आणि मोकळ्यावळानं भिरभिरनारं उनाड वारं... अन त्यानं  होणार गुंज ..

हे पाहून अन स्पर्शून आम्ही तिथेच बैठक मारली. अन मोकळे झालो. 
तीन साडे तीन तासाचा आलेला तो  थकवा त्याने कुठल्या कुठल्या उडून गेला ते कळलच नाही. पण पोटी  भुकेचे कावळे  मात्र आग धरून होते.  तेंव्हा  त्यांना शांत करण्यास आम्ही पुढाकार घेतला. 
सोबत  जे काही आणलं होतं ते बाहेर काढलं आणि हादडण्यास सुरवात केली. 
आंबोली काय, खोबऱ्या अन  लसणीची  चटणी काय, बटाट्याची  भाजी काय , गरम गरम आजीनी दिलेली भाकरी काय , पोट अगदी तृप्त झालं हो .  

साधारण दोन तास आम्ही आजोबांच्या मोकळ्या अंगणात मुक्काम धरून होतो.  आजी आजोबांकडून जे ऐकीव (किल्ल्या विषयी इतर गोष्टी विषयी ) मिळतंय ते ऐकत होतो. 
त्यात सुमार गडाच्या  घडलेल्या दुर्घटना , त्याची कठीणाई .., जाणार बिकट वाट , महीपत गडाची पाय  वाट ..प्राणी , जंगल , मंदिर, होणारा उत्सव , ह्या त्या गोष्टीवर चर्चा रंगली. . आजी आजोबांनी जे जे ठाव ते ते त्यांनी मोकळेपणाने  सांगितले. आम्ही ते अधीरतेने ऐकून घेतलं. मनात साठवून घेतलं . 

आणि काही क्षण तिथे  निवांत पडून राहिलो. 

क्रमश : पुढचा भाग लवकरच ...सुंदरश्या छायाचित्रासहित ...
आपलाच , 
संकेत पाटेकर 
रविवार, २६ जून, २०१६

'सह्याद्रीतली माणसं '

मनात खूप सारे विचार आहेत. जे शब्दबद्ध करायचे आहेत . कृतीत उरतवायचे आहेत.
त्यातलंच हे एक ...म्हणजे 'सह्याद्रीतली माणसं '
हा एक स्वतंत्र लेख ..जो लवकरच घेऊन येतोय माझ्या ब्लॉग वर ...

तसं आजवर सहयाद्रीच्या ..दऱ्या खोऱ्यानिशी वावरताना , आड अडगळ ठिकाणी , कुठश्या वळणाशी , खूप माणसं भेटलीत. साधंसच जीवन जगणारी पण माणूसपण मनात ठासून धरलेली . 
मायेचा पंख सदैव उघड ठेवणारी ,
कधी देवदूतासारखी धावून आलेली , 
कधी अनोळखीपणाचं शाप मोडत आपलेपणचा बंध जुळवून मायेचा पांघरून धरणारी...... 
मनमिळावू माणसं....!

मग त्यात देवगिरीच्या शोभा मावशी असो , जेवणासाठी आग्रह धरणारी , 
स्वतःचा डबा देऊ करणारी आणि निरोप घेता घेता , आता येताना जोडप्यानीच या हं ! 
असं आपुलकीने म्हणणारी ...
किंव्हा चकदेव च्या रानावनात राहणारे आजी आजोबा असो , तहान भूक म्हणून जाता ....
ताकाच पातेलंच समोर ठेवणारी,
मोरे काकांसारखी नितळ स्वभावाची माणसं असो , वाट दावंनारी वा घरात आसरा देणारी . किंव्हा
ऐन संध्याकाळी हडसर करून झाल्यावर ....
जेवणासाठी आग्रह धरणारी आणि रायगडापासून हडसर ची रीतसर माहिती पुरवणारी , काका काकी असो , वा मोटारसायकल बंद झाल्यावर दुकान बंद असूनही मदतीस धावून येणारी ...
तिथलीच माणसं ..


लवकरच घेऊन येतोय ...____________________________________________________________


ज्याच्याकडे कॅमेरा , त्याच्या कडे हास्य आनंदाची कुपी .....

ठाणाळे गाव _एक क्षण हास्याचा  _
निरोप देताना ..टिपलेला क्षण


_______________________________________________________________________________

मल्हारगडचे  आजोबा ...सह्याद्रीच्या कडे कपर्यातुनी मनमुराद वावरताना ..आपला विविध अंगी घटकांशी संबंध येतो. 
त्यात महत्वाचा एक घटक म्हणजे तिथला 'माणूस' ...

दळणवळणाच्या सुखसोयी अपुऱ्या असताही , तृप्त असणारा .. 
समाधानाची मिश्किल, हास्य रेषा चेहऱ्याशी झळकावत मुक्तः कंठे जीवन व्यतीत करणारा...
 हा साधा सरळ , मनमिळाऊ आणि कष्टाळू माणूस .., 
आपल्या खोपटी वजा घरात काही असो नसो , पण याथोच्छित आदरतिथ्य करणारा.. 
या बसा, चहा घ्या, जेवून जा , अस म्हणत सुवासिक गप्पा मारणारा ..
त्यात दंग होणारा हा माणूस ..
.............................पाऊस हाच त्याचा मायबाप ..
त्यावरचं त्याच सारं गणित जुळलेलं . म्हणूनचं व्याकूळ आणि आशावाळ नजरेने ...
 आकाशी त्या मेघ राजाला तो खुणावत असतो. बरस रे ...बरस ..आता तरी..
पण त्याची हृदयवेडी हाक त्यापर्यंत पोहचते का ? 

हीच कळ ह्या आजोबांच्या हृदयातून हि पाझरली . बोलता बोलता ....
यंदा पाऊस नाही .... 

मल्हारगड उतरतेवेळी, निवांत एका ठिकाणी, हे आजोबा विसावलेले दिसले . 
नाव - श्रीकांत काळे - सोनोरी गाव .. तेंव्हा त्यांच्याशी मन मोकळेपणाने संवाद साधला तो क्षण ..

सह्याद्रीत भटकताना हि माणसं नक्कीच भेटतात . 
कधी स्वताहुन ती आपल्याशी संवाद साधत आपलंस करून जातात, तर कधी आपल्याला त्यांच्याशी संवाद साधत त्यांना आपलंस करावं लागतं . 
खूप काही मिळतं हो ..., आशीर्वादासही ..

- संकेत य. पाटेकर 
०८.०९.२०१५ 
____________________________________________________________________

गावाकडची माणसं ..
सांकशी (बळवली ) गावातील पाटील काका ...


पनवेल नजीकचा सांकशीच्या किल्ला अन निसर्गातील अद्भुत कलेचा कलात्मक नजराणा 
पाहून अंतर्मुख होवून आम्ही परतीच्या मार्गी लागलो.
घनदाट वृक्षराजी , कधी मोकळं माळरानं , कधी पक्षी पाखरांची मंजुळ शिळ 
कानी गुळवत, 
फुला फुलांचे रसपूर्ण ताटवे , रसिक मनाने न्हाहाळत , कधी डोईवरी 
आभाळातल्या पांढर्या पुंजक्याकडे कुतूहलाने एकाग्र होत , तांबड्या लाल 
माती च्या मळवट पायवाटेने वळवळण घेत आम्ही बळवली गावा नजीक आलो . तेंव्हा 
ह्या पाटील काकांची भेट झाली . बळवली गावचेच हे पाटील काका ..

मनमिळावू मनाचे अगदी , गर्भ श्रीमंत माणूस , 
चालता बोलता , केवळ ५-१० मिनिटांची क्षणभराची झालेली, आमची काय ती ओळख..
त्याला त्यांनी आपलेपणाची जोड दिली . अन निरोप घेत असता राहवलं नाही म्हणून 
काहीतरी घेऊनच जा असा आग्रह करत हि झेंडूची फुले हाती दिली.

४० लिटर दुधाची रोजची विक्री , आंबे , चिकू ची झाडे , वविध भाज्यांचे मळे, 
आपल्यात जमिनीची मशागत करत, वेगवेगळे त्यात प्रयोग करत ...
'बासमती तांदलाच पिक घेऊन पारितोषिक मिळवणारे हे काका , आपल्या ह्या जमिनीवर 
त्याचं फारच प्रेम. त्याबद्दल पुढे काही गोष्टी हि सांगितल्या. 

जमिनी विकून शहरात येणारे लोक , होणारी वृक्ष तोड , सरकारची वृक्ष लागवड आणि 
फसगत ..इत्यादी गोष्टींवर ते भर भरून बोलले . 
अन जाता जाता ..

इतक सगळ आहे , अजून काय पाहिजे? या पुन्हा , आलेत तर, अस हास्य मुद्रेने 
म्हणत ते त्यांच्या मार्गी अन आम्ही आमच्या मार्गीस्थ झालो . 

गावाकडची अशी हि माणसं ..
साधी भोळी , उदार मनाची ... हृदयात घर करून जातात कायमची ...
ट्रेक ला गेल्यावर अश्या लोकांचा क्षणभरासाठी सहवास लाभतो . पण तो उरतो 
आयुष्यभरासाठी आठवणीत ....
अश्याच आठवणीतल्या गाठोड्यातून ...

- संकेत य. पाटेकर 
२७.०३.२०१४

___________________________________________________________

देवगिरीच्या 'शोभा' मावशी ..


आता पुन्हा याल ते एकत्रच जोडीने या, बर का ? (म्हणजे लग्न करून बायको सोबत )
देव तुम्हाला सदा हसत ठेवो. 
जाता जाता मावशीचा आशीर्वाद आणि तिचे प्रेमळ शब्द
मनाशी बिलगून आम्ही ...
आमच्या परतीच्या मार्गी लागलो.
देवगिरी किल्ल्याला निरोप देत २ दिवसाची आमची हि संभाजीनगर (औरंगाबाद) सफर.... आता पूर्ण होणार होती.
जवळ जवळ पाऊन ते एक तास , आम्ही देवगिरी किल्याच्या बालेकिल्ल्यावर स्थित,
' पेशवेकालीन गणेश मंदिराच्या ओट्यावर, ' त्या शांत वातावरणात ....
स्वभावाने अगदी मोकळ्या मनाच्या , शांत तितक्याच बोलक्या असणारया शोभा मावशीची बोलण्यात अगदी दंग झालो होतो . 
त्याही मन मोकळेपणाने आमच्याशी बोलत होत्या . स्वतःबद्दल तसेच इथला इतिहासाबद्दल मुक्त कंठाने आम्हास सांगत होत्या. 

त्यांची हि तिसरी पिढी . नाव - शोभा खंडागळे . 

सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ ते सवा सहा वाजेपर्यंत ते बालेकिल्ल्यावर स्थित पेशवेकालीन '' गणेशाची'' भक्ती भावाने पूजाअर्चा करतात .
येणाऱ्या भाविकास साखरेचा प्रसाद देऊन, दमलेल्या थकलेल्या मनास पाणी देऊन त्यांच मनशांत करतात . 
त्यांची विचारपूस करतात अगदी मनोभावे .
अगदी कधी कुणास स्वतःसाठी बनवून आणलेला जेवणाचा डबा देखील ते प्रेमाने देतात . 
खाऊ घालतात . 
त्यांची गणेशावर खूप श्रध्दा . . जे काही आहे ते त्याच्या आशीर्वादाने असे ते समजतात. 
येणारे भाविक देवापाशी श्रद्धेने जो काही पैका ठेवतील तो त्यांचा पगार . 

दौलताबाद गावातच त्याचं  घर आहे. 
त्यात त्यांची सासू , तीन मुले - त्यांची सून- नातवंड असे सारेजण एकत्रित राहतात. 

साऱ्यांच नेहमीच चांगल चिंतनारया मावशी स्वभावाने अगदी मोकळ्या मनाच्या आहेत. 
आणि अशा मोकळ्या मनाच्या बोलक्या व्यक्ती क़्वचितच भेटतात आपल्या जीवन प्रवासात... 

- संकेत य. पाटेकर 

_________________________________

वेरूळचा ' शाहरुख ' 

अहो सर घ्या ना ? १२० रु. फक्त ....
बघा तुमच्या गर्ल फ्रेंड ला होईल . गर्ल फ्रेंड साठी तरी घ्या हो......
नको नको म्हटले तरी तो माझा पिच्छा काही सोडत न्हवता . 
नाव विचारले तर म्हणे 'शाहरुख ' 
हेअर स्टाईल वरून तर तसा तो शाहरुखच वाटत होतां.....
असो त्याच्या चेहर्या वरच हास्य मात्र अगदी निखळ होतं.त्यात स्वार्थपणा अजिबात नव्हता .

सांजवेळ होती , सहा वाजून काही एक मिनिटे झाली होती . कैलाश लेणे पाहून नुकताच गेट बाहेर पडलो . 
आणि तिथल्या एका स्थायिक फेरीवाल्याने गाठलं. 
हाती मार्बल ची सुंदर पेटी आणि हत्तीचे कोरीव काम केलेले ती सुबक मूर्ती . 
त्याने दाखवायला सुरवात केली . आणि मी सहज म्हणून ह्याचे किती असे प्रश्न करू लागलो . 
आणि त्याने त्यावर लगेचच उत्तर द्यायला सुरवात केली . ह्या पेटीचे २५० रुपये , ह्या हत्तीचे २०० रुपये. 
ते ऐकून मी नकारार्थी मान फिरवली . खरं तर ती नक्षीकाम केलेली सुंदर मार्बल पेटी घेऊसी वाटत होती. 
पण २५० रुपये जरा जास्तच वाटत होते .

कुठे हि बाहेर जाताना मग तो ट्रेक असो किंव्हा पिकनिक ठरवलेल्या पैशात सर्व भागवायच किंव्हा शक्यतो कमी खर्च करायचं .ह्यात मी नेहमीच प्रयत्नशील असतो . 
कुणास ठाऊक कुठे आणि कशी पैशाची गरज भासेल ? ते काही सांगता येत नाही ना ?

तरी हि काही गोष्टी अशा असतात कि मनाचा मोह काही केल्या आवरत नाही . 
नाही नाही म्हणता त्याची किंमत कमी करून , ती सुंदर नक्षीकाम केलेली मार्बल पेटी मी औरंगाबादची आठवण म्हणून विकत घेतली . आणि पुढे चालू लागलो. 
तोच पुन्हा एक इसम पुढे येत त्याजवळ असलेली अजिंठा वेरूळची पुस्तके आणि काही CD's विकत घ्या असे विनवू लागला . त्याला नाही म्हटल . आणि पुन्हा पुढे चालू लागलो. 
आणि तोच समोर उभा राहिला तो शाहरुख . शाळेतल्या मुलांच्या वयाचा ...
हेअर स्टाईल तर अगदी शाहरुख सारखीच. बोलन मात्र अस्सल मराठी...,तिथल्या स्थानिक भाषेतलं.

चेहरा कसा तर हसरा .त्याच्याकडची ती वस्तू मी नक्कीच विकत घेईन अशा खात्रीचे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव . हाती एक प्लास्टिक पिशवी , त्यात विक्रीसाठी ठेवलेलं सामान . 
मला पाहून लागलीच त्याने बोलायला सुरवात केली . हाती असलेल्या पिशवीतून एक वस्तू काढून मला त्याने दाखविली . ज्याचा मला काहीच उपयोग न्हवता . म्हणून मी सरळ नाही म्हटलं.
आणि ती वस्तू घेऊन तरी मी काय करणार होतो ? 
मुलींच्या कानातल्या त्या कुड्या . 
पण तरीही नाही म्हटल्या वर , अरे सर घ्याना घ्या ? तुमच्या गर्ल फ्रेंड ला होईल. 
अस कळकळीने तो म्हणू लागला .
माझी कुणी गर्ल फ्रेंड नाही रे ? अस मी तितक्याच स्पष्टपणे म्हणू लागलो .
अहो गर्ल फ्रेंड नाही तर बहिणी साठी घ्या ? बहिणीला होईल ?
ह्यवर मी काय बोलणार ,अनुत्तर झालो . म्हटलं चला बहिणीसाठी काहीतरी घेऊन जावू . 
आवडल्या तर नक्कीच खुश होतील . तेवढंच भावावरच प्रेम अधिक दृढ होईल . 

आणि म्हणून मी त्या कानातल्या कुड्या  त्याच्याकडून विकत घेतल्या . 
आणि तोच त्याच्या मनाची पुन्हा लगभग सुरु झाली . 
माझ्या मित्रांना तो विनवू लागला . 
तुम्ही सुद्धा घ्या ना एखादं ?

माझ्या मित्रांनी काही ते घेतलं  नाही . पण त्याची छबी मात्र त्यांनी कॅमेरात बंदिस्त केली  आम्ही .
आणि जाता जाता त्याला गमंत म्हणून  विचारल , ' फेसबुक वर आहेस का रे, बाबा  ? 
त्यातलं  त्याला काही एक कळल नाही. पण त्या बोलण्याने मात्र त्याच्या चेहरा निखळ हास्याने उमळला.   
  
असा हा वेरूळचा शाहरुख ..प्रवासात भेटलेला ..आणि मनावर स्वताचा छाप ठसवलेला . 
प्रवास खरं तर  अशा व्यक्ती रेखांनीच यादगार होतो,  नाही का ? त्यातूनच खरी संस्कृती समजते. 
राहणीमान कळतं .  पोटासाठी सुरु असलेली जीवाची  तगमग कळते. 
- संकेत य .पाटेकर 
_________________________________

किल्ले कावनई - सुरकुत्यांचं हे देणे...
सुरकुत्यांचं हे देणे सांगे , 
जीवनाभुवनाचे कथा सार ... 

भक्ती रस ....

त्यो महादेव हाय ना , त्याला हे बेल वाहा...लेकरांनो !!

घोटी ला उतरलो , रिकाम्या पोटात ....मिसळ पाव आणि वडे ढकलत , 6-7 जणांना सहज सामावून घेईल अश्या रिक्षांतून 8 किमी रस्ता कापत ..कावनईशी आलो. . (कपिल धारा तीर्थ ) तिथून पुढे गड महालाकडे पायवाट पकडली. तेंव्हा वाटेत हे आजोबा दिसले. 
काठी टेकत , हळूच आपल्या थरथरत्या अंगाने कुठेशी जात असावे. त्यांची आमची नजरा नजर झाली. गडाकडे चाललोय हे कळताच . त्यांनी किल्ल्यावर स्थित शंभू देवाकडे नजर फिरवली. 
मोकळ्या निरभ्र आकाशाखाली, किल्ल्यावर वास्तव्य करून असलेल्या त्या शंभू देवाशी , वयोपरत्वे त्यांना आता जाणे शक्य होत नसावं. पण त्यांच्या नजरेतील ती भक्तिसाय आम्ही पाहिली , अनुभवली, तो एक क्षण .....

त्यांनी मग हळूच आपल्या गाठोड्यातून , बेलाची पाने काढली आणि ती देऊ केली. 
त्या शंभो महादेवाशी वाहायला ...