शुक्रवार, २० डिसेंबर, २०१३

स्वप्नं ...... जेव्हा सत्यात उतरते


सफर वनदुर्ग वासोट्याची अन मकरंदगड-प्रतापगडाची.....
















जीवन हे अनेक स्वप्नांनी, इच्छा आकांक्षांनी रंगलं आहे ,सजलं आहे . अन त्यामुळेच जीवन जगण्याला एक अर्थ आहे .
तसं प्रत्येकाच एक स्वप्न असतं. अंतरंगात उमटलेले , मनी साठलेलं...

त्या स्वप्नांना अनुसरूनच जो तो हे जीवन रंगवत असतो. 
निरनिराळ्या रंगानी . ते स्वप्न सत्यात उतरावं , ते पूर्णत्वाला जावं ह्यासाठी सतत धडपडत असतो . 
 सामोरी येणारी जड अवघड आव्हाने हि तो पेलण्यास सदा तत्पर असतो. तसं पहायला गेल्यास प्रत्येकाचं स्वप्न ' निराळं' , अन त्याप्रमाणे येणारी आव्हाने हि त्या प्रमाणे निरनिराळी . 
यशाची उत्तुंग शिखरे पदो पदी गाठावी . स्वप्न साकार व्हावं अस प्रत्येकाला वाटत .
तसे मला हि ..वाटतं. 

माझ हि आयुष्य अशा अनेक स्वप्नांनी रंगल आहे. त्यात हे '' गड - कोट किल्ले'' एक.
महाराष्ट्रातील एकूण एक किल्ले पहावे, तिथला इतिहास जाणून घ्यावा , 
तिथल्या वास्तू बारकाइने निरखून  घ्याव्यात ...
तिथल्या निसर्गाशी गुज गोष्टी करत त्या वातावरणाशी अगदी संलग्न होवून जावे असे सतत वाटत राहते . 
आणि हे वाटनेच मला दर शनिवार रविवार माझ्या पाउल वाटेने माझ्या स्वप्नाच्या दिशेने घेऊन जाते. .

असंच , एक कित्येक दिवसापासूनच स्वप्न होतं. मनी साठलेले , वनदुर्ग वासोटा ची सफर करायची -
निबिड अरण्य , वन्यश्वापदांचा मुक्त वावर, एकीकडे शिवसागराचा मनाला थक्क करणारा अथांग जलाशय , हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्याची आठवण करून देणारा बाबू कडा, त्याच भव्य दिव्य रूप , नवीन वासोटा , जुना वासोटा , नागेश्वराची गुहा . 
वासोट्याबद्दल वाचनात आलेले अनेकानेक ब्लॉग तिथला थरार , तिथला इतिहास इतकं सार वाचून ऐकून तिथे जाण्याची उत्सुकता तर शिगेला पोहोचली होती.

म्हणून कधी एकदा वासोटा करतोय , कधी एकदा तो योग जुळतोय ह्याचीच अति आतुरतेने वाट पाहत होतो , अन काही हि म्हणा जर मनापासून इच्छा असेल , आणि त्या उपरवाल्याचा वरदहस्त असेल तर मनातली ती सुप्त इच्छा पूर्ण होण्यास वेळ लागत नाही .

एके दिवशी असंच बहिणीला फोन आला पुण्यावरून ...पुण्यातले पराडकर काका बोलत होते,
वासोटा करायचा आहे , नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये ? तयार आहात ना ? काय ते ठरवा अन सांगा ?

बस्स इथपासून आमची सुरवात झाली ........आमच्यातल्या ' क ' ह्या प्रश्नसंचाची. 
कोण कुठे ?काय नि कस ?किती ? वगैरे वगैरे ....एकमेकांना विचारन सुरु झालं. 

त्यात भेटी गाठी होऊ लागल्या . अन सर्वतोपरी एकमताने डिसेंबर ची ६-७-८ ह्या तारखेवर शिक्का मोर्तब झाले.
आमच्यातला पुढारी ' यतीन' ने ह्यात पुढाकार घेत ट्रेक चे व्यवस्थित नियोजन केले .

९ जणांचा आमचा चमू वासोटा (सातारा) ट्रेक साठी तयार झाला. त्यात यतीन , रश्मी , संपदा , सुशील , सुशांत , मयुर , लक्ष्मन , हेमंत नि मी होतो. 

गुरवार दिनांक ५ डिसेंबर ला रात्री ९:२५ ची कल्याण हून महालक्ष्मी एक्स्प्रेस ने सातारा गाठायचे ठरले होते. 
त्याप्रमाणे आम्ही सर्व ९:१५ पर्यंत कल्याण स्थानकात पोहचते झालो. ( एक मित्र वगळता, त्याला येण्यास उशीर झाल्याने , ९:२० ला कल्याण हून सुटणारी ट्रेन सुटली नि त्याला खाजगी वाहनाने सातारा गाठावे लागले .)















पहाटे ३ वाजून १७ मिनिटाला आम्ही सातारा स्थानकात पाउल ठेवले , तेंव्हा थंडीने अगोदरच आपले बाहू सर्वत्र पसरले होते . तिच्या मगर मिठीत सारेच आले होते . त्यामुळे कुणाची कुडकुड हूडहूड चालूच होती.

सातारा रेल्वे स्थानकात तशी फारशी वर्दळ न्हवती. मोजता येतील इतकीच माणसे होती
नाही म्हटले तरी पहाटे ३:२० ला इतक्या लवकर कुठे वर्दळ असणार हो .
असो , तसा अजून बराच वेळ होता म्हणा . पहाटे ५ वाजून ३० मिनिटाची ची ,सातारा एसटी डेपो मधून बामणोलीसाठी एसटी होती. त्या एसटी तून आमचा पुढचा प्रवास होणार होता.
काही वेळ आमचा असाच इकडच्या तिकडच्या गप्पात निघून गेला अन क्षणभरात एक चार चाकी वाहन (क्रुझर ) आम्हाला घ्यायला आली.


तसे ठाण्याचे आम्ही ९ ट्रेकर्स आणि पुण्यावरून काही जण येणार होते , थांबा किती ते आकडेमोड करतो , एक पराडकर काका (गुरुजी) , ते दिघे भाऊ , ती छोटी , राहुल , अक्षय , सागर , आणि ते दोघे असे , हा असे दहाजण. म्हणजे आम्ही सर्वमिळून १९ जण होतो .

दिलीप पराडकर (काका) -
आणि त्यांचा ग्रुप , खर तर पराडकर काका आज आम्हाला दोन वर्षांनी भेटणार होते. 
दोन वर्षापूर्वीची त्यांची आमची भेट ती हि काही अवधीचीच , सिद्धगड - भीमशंकर ट्रेक दरम्यानची .पण त्या भेटीत त्यांचा प्रभाव आम्हावर (विशेषता माझ्यवर ) न पडो म्हणजे झाले.

जवळ जवळ पाउने तिनसे किल्ले त्यांनी सर केले आहे . आणि त्यामुळे त्यांच्याकडे माहितीचा साठा हि तितकाच .आणि ते आम्ही सिद्धगड - भीमाशंकर ट्रेक दरम्यान अनुभवल होत . ऐकल होत.
पेशाने ते तसे शिक्षक ,अन सह्याद्री वर त्याचं मनापासून प्रेम . म्हणून रानं वन पायदळी तुडवत त्यांची भटकंती सतत चालू असते . सर्व जण त्यांना गुरुजी म्हणतात . आम्ही मात्र काका . :)

आज त्यांच्यामुळेच खर तर वासोटा करायची संधी मिळाली होती.
आमच्या आधीच ते पुण्याहून साताऱ्याला त्यांच्या एका ओळखीच्या ठिकाणी (घरी) येउन पोहचले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत आलेली क्रुझर (चार चाकी वाहन ) आम्हाला आणण्यास पाठवली.

साधारण ४ दरम्यान आम्ही सातारा रेल्वे स्थानक सोडले . आणि चार चाकी वाहनाने (त्या क्रुझरने ) पुढे एसटी डेपो कडे सरकायला लागलो . आमचा एक मित्र हेमंत (ज्याची ट्रेन सुटली होती ) काही मिनिटातच सातारा एसटी डेपोत पोहचता झाला . त्याला सोबत घेऊन आम्ही ते (ते सर्व पुणेकर )जिथे मुक्कामी होते त्या घरी पोहचलो. खर तर एसटीने सिधा बामणोलीला जायचा आमचा प्रस्ताव होता .पण नंतर तो प्रस्ताव मोडला नि एकत्रित कसे बसे जागा करत एकमेकांना सांभाळत आम्ही त्या क्रुझरनेच त्या पाहुण्या घरी पोहोचलो.

तिथे थोडी विश्रांती घेऊन अन गरमा गरम चहाचा घोट घशात ओतून नि त्याबरोबर गप्पांचा ओघ तिथेच ठप्प करत आम्ही ६ दरम्यान तिथून बामणोली कडे प्रस्थान केले.
जाता जाता अजिंक्य ताराची नजरभेट घेऊनच ..

पुढे हळूहळू गाडीने जसा वेग धरला अन वेड्या वाकड्या वळणावरून घाट वाटावरून जशी ती पुढे धावू लागली.
तसं तसे दूरवरचे डोंगर दर्याचे विहिंगमय दर्शन मनाला साद घालू लागली .
त्यातच उगवत्या सूर्य नारायणाचे ते सप्तरंगी छटा मनास अधिक झुलवू लागले आनंदाच्या मुक्त लहरीत .

हा निसर्ग ..किती अद्भुत आहे बघा ! त्याच रूप त्याच सौंदर्य ,त्याच रहस्य कशा कशालाच तोड नाही .
किती बर घ्यावं त्या कडून ,
किती तरी शिकावं त्या कडून
नुसतंच टकमक पाहावं कधी ,
नुसतंच कान टवकारून ऐकावं कधी
शिकवेल तो रंग जीवनाचा
दरवळेल स्नेह हर्षाचा !
- संकु



निसर्गाची ती किमिया , ती नवलाई मनात साठवून ठीक ७:३० वाजता आमची गाडी बामणोली ला पोहोचली.
जवळ जवळ तास दीड तासाच्या त्या प्रवासात निसर्गा च्या सौंदर्या सोबत गाडीत सुरु असलेल्या उलट्यांचा गंधाचा देखील आस्वाद लुटता आला .(आता 'आस्वाद लुटता आला' ह्या शब्दापलीकडे दुसरा 'शब्द' काही सुचला नाही हो , तुम्हाला काही सुचतय का ? सुचलं तर सांगा )

गाडीच्या उजव्या डाव्या बाजूच्या खिडकीत एक सागर नि एक अक्षय आपल शीर बाहेर काढून ओकन्याचा कार्यक्रम अधे मध्ये चालू ठेवतं.:P :-) त्यामुळे इतर काही म्हणजेच मी नि मयुर आम्हाला सुद्धा पोटात मळमळायला सुरवात झाली .
(कस असतं , कधी कधी दुसर्यांच्या उलट्या पाहूनही आपल्याला उलट्या होऊ शकतात नाही का ? )पण अधे मधे ब्रेक घेतल्या कारणाने आमची विकेट पडायची राहिली .

असो ...
वासोट्याला जाताना बामनोलीत उतरून वन अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेऊन मग पुढे जावे लागते. आमची गाडी बामणोलीला पोचताच यतीन आणि फिरोज काका परवानगी घेण्यासाठी तिथेच थांबले. आणि इतर आम्ही पुन्हा वळणावळनाचा घाटरस्ता उतरत पुढे तापोळ साठी मार्गीस्थ झालो.

बामणोली वरून खर तर वासोट्या साठी लौंचची सोय असते . पण ह्या वेळेस त्याचं काहीतरी संप वगैरे चालू असल्यामुळे आम्हला २ तासाची वळणा वळणाची रपेट करावी लागली.

तशी तापोळ वरून आमच्यासाठी २ नौकेची सोय झाली होती. अगोदरच त्यांच्याशी बोलणं वगैरे करून . साधारण सव्वा नऊ साडे नऊ दरम्यान आम्ही तापोळला येउन पोहचलो . ते कोयानाचे विशाल पात्र डोळ्यात साठवूनच.

पुढे तापोळला गाडी एका ठिकाणी पार्क करून ...आम्ही नौका सफर साठी तयार झालो.
ह्या पुढचा प्रवास आमचा शिवसागराच्या अथांग जलाशयातून होता.





साधारण दहा वाजता आधे ईधर आधे उधर करत आम्ही नौकेत पाउल ठेवले.

अन काही वेळेतच इंजिनाचा आवाज गरजू लागला . अन हवेत धुरांचे लोळ उसळत , अन खाली पाण्याचे वलय उमटत आमचा त्या नौकेतून वासोट्या कडे तरंगमय प्रवास सुरु झाला.
------------------------------------------------------------------------------------------------------

वासोटा - इतिहासाकडे एक नजर फिरवल्यास ...

कोल्हापूरच्या शिलाहारवंशीय दुसऱ्या भोज राजाकडे ह्या किल्ल्याच्या निर्मितीचे श्रेय जाते . 
नंतर प्रथम शिर्के व मग मोरे यांच्याकडे त्याचे स्वामित्व गेले.
शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोर्यांची चंदाराई बुडवून जी काही अमोलिक दुर्गरत्ने प्राप्त करून घेतली , त्यात रायगड , वासोटा हि प्रमुख होती.

वासोटा किल्ल्याच्या प्राचीनत्वाचा शोध घेता आपल्याला वसिष्ठ ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल. असे मानले जाते की, वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य, अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला, सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर राहण्यास आला व त्याने आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले. कालांतराने या देशीच्या क्षत्रियांनी त्या डोंगराला तटाबुरूजाचे साज चढवून लष्करी ठाणे केले. त्या डोंगराचे परंपरागत ’वसिष्ठ’ हे नाव अपभ्रंश होऊन ‘वासोटा’ झाले.

त्याच वासोट्याचे रूप न्ह्याहाळत ...मनी उमललेल्या स्वप्नाच्या दिशेने आमचा खराखुरा प्रवास सुरु झाला .
एक आगळीक हुरहूर , एक आगळीक मजा अन नवा उत्साह संचारला होता ..तना मनात !
डोळे भिरभिरत ..चूहु दिशेने .
कुठे पाहू कुठे नको ..., सर्वत्र आनंदाचा स्वर '' किती अनोखं , किती विलोभनीय !
सृष्टीचं च इतकं मनोवेधक दृश्य मनाला स्वर्ग सुखाचा आनंद देत .

सूर्य नारायणाचे तेज लहरी हि शिवसागराच्या मुखपटलावरती एखाद्या अलौकिक मोतीवाने झळाळत .
तेंव्हा असे भासे कि , जणू सागराच्या पोटी वर्षानुवर्षाच्या तपानंतर मिळणारा एखादा मोती आज ह्या जलाशयाच्या मुख पटलावरती कितीएक संख्न्यान एकत्रितरित्या झळाळत आहे . अन सृष्टीच्या सौंदर्यात अधिक्तेने भर घालत आहे .

तिन्ही बाजूस घनदाट झाडी , वर मोकळा आकाश ,नजरेत सामावणारा अन क्षणाक्षणात समीप येऊ पाहणारा , गर्द झाडीत स्वतःला लपेटून घेतलेला अन जमिनीपासून साधारण २ हजार फुट उंचीवर वसलेला वासोटा , त्याच रांगड रूप ...अन शिवसागराचं वाहत्या
(धावत्या )नौकेतून होणार अथांग दर्शन ..! काय म्हणावं....
निसर्ग 'खरंच. वेड' लावतं अक्षरशा वेडं !

साधारण २ तासाच्या नौकाविहारातून आम्ही वासोट्याच्या पायथ्याशी येउन पोहोचलो.
अन खांद्यावरून उतरवलेली पाठ्पिशावी पुन्हा खांद्यावर घेत. नौकेतून पायउतार झालो .


कोयना अभयारण्याच्या स्वागत कक्षेत आमचा आता प्रवेश झाला होता . प्रवेश दरम्यानच वाघाची छबी अन त्याची दिलेली माहिती आम्हाला ..सावधतेचा इशारा देत होती .
' वन्य श्वापदांचा मुक्त संचार असलेल्या अभयारण्यत आता तुमचा प्रवेश होत आहेत' . तेंव्हा जरा सांभाळून असा जणू इशाराच होता तो.

तिथून एक दोन एक पाऊल पुढे टाकत आम्ही वन अधिकाऱ्यांच रेस्ट हाउस जवळ आलो. वनअधिकारी आमच्या स्वागताला तयार होतेच. 











स्वागत कस तर इथे हि क ' ह्या बाराखडी पासूनच .....,
कुठून आलात ,किती जण आहात ? काय नि कस वगैरे वगैरे ...!

हे सर्व सांगून झाल्यावर नंतर हि ...प्रत्येकाकडे किती बॉटल्स आहेत , प्लास्टिक पिशव्या किती आहेत ? ह्याची तपासणी अन मोजणी...
खर तर हे एक बर झालं . प्लास्टिक अन कचरा मुक्त जंगल वर्षो न वर्षी तरी टिकून राहील .
नाहीतर जिथे जातो तिथे असतोच प्लास्टिक अन कचर्याचा ढीग इकडे तिकडे पसरलेला .
शिस्त नाहीच .....
अशाने चला शिस्त तरी लागेल. जे फक्त दारू ढोसायला अन पिकनिक म्हणून गडवारया करतात त्यांना काही अंशी तरी ..!

असो ,तर मूळपदावर येतो
दुपारचे बारा वाजून गेले होते. पाठीवरल्या पिशव्यांच ओझं नको म्हणून फक्त काही पाठ पिशव्याच सोबत घेत (त्यात द्पारच जेवण अन पाण्याच्या काही बॉटल्स मोजून घेतलेल्या ) इतर पाठपिशव्या वन अधीकारयाच्या देख्रेखाली ठेवून दिल्या.

अन रानावनातून पायवाटा तुडवत वासोट्याच्या दिशेने वाटचाल करू लागलो.
जाता जाता काही एक अंतर सोडून , इतर वन्यप्राणी पक्षांचे वन अधिकारांनी लावलेले माहिती फलक त्याचं इथलं असणारया वास्तव्याची जाणं करून देत होते.

काही वेळेतेच म्हणजे जवळ जवळ १५- २० मिनिटाने एक खळखळता ओढा ओलांडून आम्ही हनुमान अन गणेश मूर्ती एकत्रित असलेल्या बिना छपराच्या मंदिरा जवळ आलो.




तिथे थोडा विसावलो ते दर्शन घेत उभ्या उभ्याच ..!
 
चहूकडे पसरलेली घनदाट झाडी ,अन शांत लहरीत विसावलेला थंडावा मन अगदी प्रसन्न करी.
मंदिरासमोरून वाहणारा खळखळता ओढा मनाचे तरंग उठवी. त्याचं पाणी इतक गोड अन शीतल कि असलेली तृष्णा सहज भागे.
इथून पुढे दीड तासाच्या प्रवासात पिण्याच पाणी मिळणार न्हवत. त्यामुळे रिकाम्या झालेल्या बॉटल्स इथल्या इथेच भरल्या अन
'' वासोट्याकडे '' असा बाण दर्शवणार्या पाटी कडे एक वार पाहत आम्ही पुढचा रस्ता धरला. 

साधारण दीड तासाच्या सुखद चढनी नंतर , आम्ही गडाच्या ढासलेल्या दरवाज्यापाशी ' ढासळंलेल्या तर काही शाबूत ' अश्या पायऱ्यानिशी गडावर पोहोचलो.


दरवाज्या जवळच एक दगडी जोथा त्याच अस्तित्व दाखवत निपचित पडून होता. एक चाल पुढे गेल्यावर हनुमानाचं विनाछपराच मंदिर दिसलं . हनुमानाची ती सुंदर सुबक मूर्ती लक्ष वेधून घेत होती. त्यामुळे मन आवरेना ..नजरेच्या कैदेत ते क्षण सामवून, मनोमन वंदन करून कॅमेरात ती प्रतिमा बंदिस्त करू लागलो.

हनुमान मंदिरापासूनच डावीकडे जाणारी वाट आपल्याला पाण्याच्या टाक्या जवळ अन बाबू कड्यापाशी घेऊन जाते. हरिश्चंद्रगड गडाच्या कोकण कड्याशी साधर्म्य असणारा हा कडा तितकाच विलोभनीय आहे .
समोरच जुना वासोटा आपला दर्शन घडवत इतिहासाची पुनवृत्ती करतो
वासोट्याचा जुळाभाऊ जुना वासोटा हा उंचीनं अधिक असल्याने इथे घडलेल्या प्रत्येक लढाईत हा वासोट्याचा काल ठरला आहे. 
बापू गोखल्यांशी आठ दहा महिने प्रखर झुंज देऊन ताई तेलीनीने (ओंध पंत प्रतिनिधी ह्यांची स्त्री) हा किल्ला लढवला . पण शेवटी १७३० रोजी हा किल्ला बापू गोखले ह्यांच्या ताब्यात आला. तो जुना वासोट्या वरून तोफा डागल्यानेच .
१८१८ सालच्या शेवटच्या इंग्रज मराठे युद्धाततही जुन्या वासोट्या वरूनच मोर्चे बांधणी केल्याने .हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

इतिहासाची अशी रक्तरंजित शौर्य कथा ऐकून वाचून अन प्रत्यक्ष ती तिथे अनुभवून,  मन प्रत्येक इथल्या बाबीला वास्तुला , त्यां शूर सेनानींना सलाम करतं त्यापुढे नतमस्तक होतं.
सह्याद्रीतल्या अशा प्रत्येक किल्ल्यावर जावून आपला माथा तिथे टेकवावा अस हे पवित्र स्थान म्हणजे आपले गड किल्ले ..खरचं..!

इतिहास संदर्भ -
१) ट्रेक क्षितीज वेबसाईट
२) साद सह्याद्री भटकंती किल्ल्यांची - प्र. के घाणेकर

क्रमश :- पुढचा भाग लवकरच ..
संकेत य. पाटेकर
२०.१२.२०१३
२७.१२.२०१३