सोमवार, ९ जानेवारी, २०१७

रोह्यातील मुसाफिरी - किल्ले घोसाळगड आणि कुडा लेणे

किल्ले घोसाळगड - तटबंदीयुक्त माची 
सालाबादप्रमाणे , म्हणजेच  नित्य नेहेमीच्या आमच्याच नियमावली प्रमाणे , इंगजी नव्या वर्षाची सुरवात , नवं वर्ष स्वागत हे आपल्या सह्याद्रीतल्या  कड्या कपारीत , निवांत रमणीय अश्या निसर्गदत्त वलयात  , भौगलिक अन ऐतिहासिक वारसा किंव्हा  वैभव लाभलेल्या आपल्याच  दुर्ग मंदिरात  , सह्य माथ्याशीच , त्याच्या सहवासात रंगून मिसळूनच होते.
नवी ऊर्जा ,  जगण्याची नवी प्रेरणा ,नवी उमेद हि ह्या गतवैभवातूनच सहजी  अशी मिळून जाते. 

यंदाचं म्हणावं तर हे वर्ष  देखील  असंच , २०१६ च्या डिसेंबर महिन्याच्या एक आठवडाभर आधीच एक दोन दिवसाची मोहीम आम्ही उरकली होती .  रवळ्या जवळ्या आणि  मार्कंड्या ...  त्यानंतर आठवड्या भरानंतर  लगेचच हि ..आमची पुढील  मोहीम....
किल्ले घोसाळगड आणि  कुडा लेणी ...

रायगड जिल्ह्यातील , निसर्ग संपन्न अश्या  , कुंडलिका नदीच्या सानिध्यात  नितळपणे खळखळत हसत असलेलं  रोहा , त्या जवळील हि  मुशाफिरी ...

दिवा -  सावंतवाडी : 
दिवा-सावंत वाडीच्या नेहमीच्याच वर्दळ असणाऱ्या गाडीने प्रवास करणं म्हणजे दिव्यत्वेचा साक्षात्कार जणू  ,   ह्याचा प्रत्यय तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतलाच असेल  एकदा....

अफाट गर्दी , आणि त्या दिव्य अफाट  गर्दीतून मार्ग काढत , सुरू असलेली विक्रेत्यांच्या सामानांची खरेदी  विक्री,गोंगाट  जणू आक्खी ट्रेन हि  एक स्वतंत्र चालतं बोलतं मार्केटच आहे जणू  ,असा  भास नाही तर  प्रत्यक्षदर्शी जाणीव आपल्याला तिथे होते .
वेगवेगळ्या स्तरातील , आवाजातील  लयबद्द ,अभिनय अश्या शैलींनी सादर केलेली विक्रेत्यांची ती 'आरोळी' ...मनाला वेगळ्याच तंद्रीत, भावनगरीत  खेचून घेते . 
करमणूक तर होतेच पण त्या शब्दांची जादू ,  चेहर्यावरचे विविध रंगभाव ह्याकडे आपलं बारीकशी लक्ष लागून राहतं.  

कुणी 'शिरा उपमा कांदा पोहे' घ्या असं म्हणता म्हणता ..
''घाऊन घ्या ताई मी परत येणार नाही ..'' हे पुढचं वाक्य शक्कल लढवून सहज  बोलून  जातं. (आणि खरंच पुन्हा येत नाही )
कुणी , मामीने बनविलेले , चुलीवरचे  वडापाव , १० ला दोन असं म्हणतं , भाव खाऊन जातं .
कुणी बोरं घ्या, चमेली बोरं  म्हणतं,
कुणी कारली , मेथी पावटा , पासून , कचोरी भाकरवाडी , वेफर्स , ते गावठी केळी पर्यंत येऊन पोहोचतं. 
कुणी 'माझ्या तर्फे खाऊन घ्या, पैसे  अजिबात देऊ नका' इथपर्यंत मजल मारतं. 
तर कुणी आप आपसात 'आजचा दिवस जाऊ देत सोन्याचा , उद्याचा दिवस जाऊ देत चांदीचा' ...असं
गमतीनं, पण आपलेपणान  म्हणतं ..एकमेकांनच्या  व्यवसायाला हातभार लावतं. 
इतक्या भाव छटा , इतके भावतरंग , शब्दोली सहज आपल्याला ह्या दिवा सावंतवाडी प्रवासात  मिळून जातात.
असाच प्रवास करत आम्ही  रोह्याला पोहचलो . 


तेंव्हा साधारण पावणे दहा झाले होते. नित्य नेहेमीच्या दिनक्रमानुसार आजही  अर्धा पाऊण  तासाचा फरक पडला होता.  दिवा सावंतवाडी उशिरा  पोहोचली होती .
त्यामुळे आता घाई करणं आम्हाला  भाग होतं. पुढची मोहीम वेळेवर अवलंबून होती.
रोह्याला उतरून , लगेचच पायीच  आम्ही एसटी डेपो  गाठलं .
त्यात   कुंडलिका नदीचं सुंदर पात्र  अन गावाच्या वळणवाटेतून येता येता , चकचकीत अशी नवी कोरी भांडी दिसली ती  कॅमेरात बंदिस्त करून घेतली.


कुंडलिका ....























आणि एकमेकांकशी  चालता बोलता  पंधरा ते वीसेक मिनिटात , आम्ही एसटी स्थानकात दाखल  झालो .  पुढील पाच एक मिनिटात घोसाळगड मार्गी (मुरुड - भालेगाव ) जाणाऱ्या एसटीने ,

वळणावळणाच्या त्या हिरवाईने घेरलेल्या दाट  घाटवाटातून, (आंब्यांचे कलम , तंटामुक्त गाव  पाहत  ) आम्ही अर्धा तासात  घोसाळगड च्या पायथ्याशी पोहोचलो .  समोरच हिरवाईने वेढलेला सुंदरसा छोटेखानी किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आम्हाला साद देत होता. 
क्रमश : 

--------------------------------------------------------------------

कुडा लेणी ...
 





 


 

वेबसाईट : रोह्यातील मुसाफिरी – किल्ले घोसाळगड आणि कुडा लेणे

रवळ्या जवळ्या - मार्कंड्या अन...

रवळ्या जवळ्या वरील मंतरलेली रात्र अन मार्कंड्या च अध्यात्मिक महात्म्य... 

(रवळ्या जवळ्या पठारावरून , किल्ले जवळ्या कडे प्रस्थान करताना , नजरेत भरलेला राजबिंडा असा देखणा धोडप किल्ला ...)




नाशिक हे माझं सर्वात आवडतं ठिकाण ,
ते त्याच्या उंचच उंच अश्या कातळकोरीव रौद्र भीषण पण तितक्याच सौन्दर्यपूर्ण अश्या सह्य कड्यांमुळे, ऐतिहासिक तसेच पावित्र्य अश्या अध्यात्मिक महतीमुळे..
गेले दोन दिवस अश्या ह्या आपल्या सह्य मंदिरात आम्ही मुक्काम धरून होतो.
रवळ्या जवळ्या पठारावरील लुकलुकणाऱ्या असंख्य तारका समूहा सोबत , त्या नभो मंडळात , गूढ अश्या शांत वलयात अनुभवलेली/ मंतरलेली ती रात्र , कदापि विसरता येणार नाही. 
तारका समूहांच ते पांघरून अंगावर घेऊन निजनं किंव्हा नजर उघडी ठेवत नक्षत्रांच ते देणं अनुभवणं ह्यासारखं सुख नाही.
भर दिवसा अन सांज समयी , रवळ्या जवळ्या वरील गूढ वलय, तो सौम्य(आनंद देणारं) थरार , त्या वास्तू अन एकूण रम्य असा सभोवताल... मन अगदी प्रसन्नतेत खळखळत होतं.

वणी दिंडोरी/ कांचंनबारी ची लढाई मनाच्या तळघरात दौड करत होती.
भेटलेले गावकरी ,अध्यात्मिक गुरू , त्यांच्या सोबत जुळलेली आपलेपणाची नाळ, अन सप्तशृंगी मातेचं दैवी वलय मनाला एक आगळं वेगळं वळण देत होतं.

नाशिक ची सौन्दर्य सृष्टी अन ऐतिहासिक , अध्यात्मक दृष्टी हि अंतःकरण उजळून देणारी आहे.
महिपत सुमार रसाळ ह्या त्रिकुटा नंतर ह्या वर्षाअखेरीसच हे त्रिकुट आमच्या साठी अविस्मरणीय असंच ठरलं.
मित्रावळ , मित्रावळातील संघटन अन प्रेम असंच चीरतरुण राहो...
लवकरच इतर फोटोस अपलोड करेन, अन विस्तृत असं (ब्लॉग) लिहेनच...

    
     (मार्कंड्यावरून ...सप्तशृंगी दर्शन ..)
























वेबसाईट : रवळ्या जवळ्या – मार्कंड्या अन…