बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८

ताहुली'च्या वाटेवर ...


अजस्त्र रूप धारण केलेला हा आपुला  'सह्याद्री' त्याचं हे 'रौद्र' पण तितकंच 'वडीलधारी रूप'  मनाशी  एकदा का पांघुरलं गेलं की,  त्याची 'सांगता' हि आपल्या शेवटच्या श्वासाशीच,  हे  ठरलेलंच.
जिव्हाळ्याचं हे नातंच असं सह्याद्रीचं  अन आपलं,
म्हणूनच
पाऊलं वळततात ती,
आपणास पुजणीय अश्या ह्या 'सह्यदेहाकडे' ..
शिवप्रेरीत ह्या अफाट कातळ कोरीव 'सह्यसख्याकडे' बेलाग- बुलंद ह्या 'सह्यरुद्राकडे ' सृष्टीच्या ह्या कलात्मक रंगसाधनेतुन...तिच्याच उबदार घन सावलीत,
अनवट कुठल्याश्या वाटेतनं.. सुखाची एक एक पाऊलं टाकत..

प्रति 1 



तर , बरेच दिवस होऊन  गेले..कुठे काही जाणं न्हवतं.  भटकणं न्हवतं.
मित्राचे फोन खणखणू लागायचे,
''अरे चल ..मी...अमुक तमुक ह्या ठिकाणी उद्या निघतोय , येतोस... ? ''
इच्छा असूनही , काही कारणास्तव मग मुद्दाम टाळाटाळ करायचो ,
म्हणावं तर भटकंती ही तात्पुरती खंडित केली होती. काही एक कारणास्तव ,
पण म्हणतात ना..एकदा का ह्या 'सह्य रुद्राचं  शिवरूप'  मनात साठलं कि पाऊलं हि आपसूक पुढे होतात..धावू लागतात ..
उंच कड्या ह्या  कपाऱ्यातून , राकट सह्या वेढ्यातून .. पानपाचोळ्या रानवनातून... सृष्टीच्या ह्या हास्य तरंग गीतासोबत ...घुंगवत्या गंधित वाऱ्यवानी.. मनाच्या उनाड अवस्थेतून ..समाधिस्त अवस्थेकडे ..

प्रति 2 

 ताहुलीची वाट सुद्धा अशीच धरली . निळाईला गवसणी घालणाऱ्या सुळक्यांवर , सराईतपणे चढाई मोहीम करणाऱ्या मित्राचा 'दुर्ग' भूषणचा  कॉल आला. संवाद साधला गेला.
आणि तेंव्हाच वेळ काळ ठरवून ...रविवारच्या मुहूर्ताला शिक्कामोर्तब करत आम्ही ठरल्या दिवशी ताहुलीच्या दिशेने वाटचाल करू  लागलो.
जवळ जवळ ..तीन चार वर्षाने हा गडी पदरगड सारख्या मोहिमेनंतर पुन्हा भेटणार होता .
आणि त्याचबरोबर इतर जुने सवंगडी , ज्यांच्या समवेत मी सह्याद्रीच्या खुल्या मोकळ्या आसमंतात मुक्तपणे विहार करू लागलो त्ये....लक्ष्या उर्फ  बाळू दा ..आमचा पहिला इंजिन,  किशोर ..आणि मिलिंद उर्फ मिळू ....
हि सारी मंडळी ..सह्य सोबती... ह्या त्या नात्यांनी बांधलेली जोडलेली  , आता फारशी मोहिमेला येत नाहीत. पण त्यांच्या येण्याने आज नवा हुरुप आला होता . आनंद  देहबोलीतून ...मनातून आणि संवादातून  अविरत असा तणतणत होता.
त्या  आनंदातच ...गप्पांचा हास्य पट मांडत  आम्ही कल्याणहून ..खाजगी वाहनाने (काळी पिवळी omani- 400 /-मात्र जाण्याचे ) ताहुलीच्या पायथ्याची पोहचते झालो.

प्रति 3 
  प्रति 4

ताहुली :
कल्याण -  मलंगगड  मार्गावर ...अर्धा तासाच्या  धीम्या  वेगवान प्रवासानंतर ..कुशवाली गावाच्या  भोवताली पसरलेला मुळात हिरवाईने साज शृंगार केलेला आणि कड्या बेचक्यातून फेसाळ शुभ्र रंगाचा वाहता , निथळता आनंद  देऊन  मनोमन सुखावणारा मखमली असा डोंगर. गड नाही.
माथेरान हि त्याची भाऊबंदकी
तिथपासून सुटावलेली कातळ धार .... अजस्त्र कड्या कपारीचा देखणा नजारा.. आपल्यापुढं ठेवत  इथवर विसावलेली आहे.
पेब उर्फ विकतगड ,  नाखिंड - चंदेरी म्हैसमाळ  ...मलंगगड ..हि ती सोनसाखळी...
  

 साधारण साडे आठ वाजता ..शहरीवलयापासून दूर ..कल्याणहून तेरा पंधरा  किमीच्या अंतरावर  निसर्गाने उधळलेल्या रंगसाधनेतून .. आम्ही कुशवालीत प्रवेश केला.
साधारण दोनशे अडीचशे वस्तीच हे नंदनवंन...(तिथल्याच  एका काकांच्या  सांगण्यावरून ) निसर्ग सौन्दर्यान नटलेलं खेडं , भात शेती करून  तसेच शहरी नोकरी पत्करून , आपलं जीवनरथ चालविणारे  इथले गावकरी.

त्यांच्याच नेहमीच्या पायवाटेवून ....ताहुलीचा  मागोवा घेत ..आम्ही पुढे मार्गीस्थ झालो.
निसर्गाने फुलविलेल्या ,  सजवलेल्या तसेच गंधाळलेल्या अवीट क्षणांचा आनंद घेत...
 - संकेत पाटेकर
  
प्रति 5


प्रति 6


प्रति 7
 प्रति 8


 प्रति 9
 प्रति 10

प्रति 11                                                                                                                                                                  





















प्रति 12

ताहुलीच्या उंचीवरून दिसणारं  बदलापूर शहर ...





 प्रति 13
























 प्रति 14

- संकेत पाटेकर

सहभागी सदस्यांची  नावे :
१. भूषण
२. लक्ष्या उर्फ बाळू द
३. किशोर
४. मिलिंद
५. विकास
६ . मी आणि इतर दोघे 

जाण्यास लागलेला वेळ : कुशवली गावापासून  ...साडे चार तास ..(माथा -  मठ )


महत्वाची टिपणी : निसर्गात जात आहातच तर त्याचं कौतूक करायला हि नक्कीच शिका. त्याला समजून घ्या. त्याकडून बोध  घ्या  शिका. आयुष्यभर उपयोगी पडेल.

उगाच आपल्याजवळच कचरा तिथेच सोडून आणि निव्वळ मौज मस्ती साधून ..ह्या सृष्टीचा आणि मानवजातीचा अपमान करू नका..इतकंच. 


शुक्रवार, २९ जून, २०१८

कोथळी गड : पावसाळी जत्रा


 जवळ जवळ पाच सहा वर्षाच्या.. मोठ्या अश्या गॅप नंतर , कर्जत पासून जवळच ठामपणे उभा असलेला उत्तुंग असा पेठचा किल्ला म्हणजेच कोथळीगड, ह्या किल्ल्याला भेट देण्याचं भाग्य , मला पुन्हा एकदा मिळालं. म्हणजेच ते नव्यानं जुळुन घेता आलं.
माझे मित्र, बंधू आणि माझ्या भाच्यांमुळे... 


तसं रानवाटा सोबत , काही वर्षांपूर्वी इथं येणं झालं होतंच. म्हणूनच त्यावेळेसच्या आठवणी ही पुन्हा एकदा जागत्या आल्या.पण त्यावेळेस सारखा तो निवांतपण अनुभवता आला नाही. 

पेठ ला ...जत्रेचं स्वरूपच प्राप्त झालं होतं. 
सह्याद्रीच्या भेटीला हौशी पर्यटकांची झुंबड उडाली होती. निव्वळ आणि निव्वळ मौज आणि मस्तीसाठी.

खरं तर कलावंतीण, लोहगड विसापूर, सिंहगड, पेब , पेठ.. ह्यासारखी ठिकाणं , ही आपली स्वराज्याची बेलाग बुलंद ठाणी (भावबंद गर्दीने सध्या घुसमटत असलेली... )ह्याचा इतिहास भूगोल, निसर्ग नि जनजीवन...हे निवांतपणे.. 
आठवड्यातल्या मधल्या कुठल्याश्या वारी...
कधी भेट देऊन अभ्यासवेत वा कुतूहलाने स्वराज्य नजरेनं ते एकाकी पाहून घ्यावेत.
( तुम्ही जर खरंच सहयाद्री वेडे असाल, स्वराज्याच्या ह्या वास्तूंशीशी एक निष्ठेने असाल तर आणि तरच ...उगाच कल्ला नि गोंगाटा करण्यास इथवर येण्याचे कष्ट घेऊ नयेत. )

इतर वेळेस सर्वच ठिकाणी इथे जत्रेच स्वरूप आलेलं असतं.
हौसे नौशे सगळीच उधाणलेली असतात.
निव्वळ मौजमस्ती साठी.

त्यांना इतिहासचं कौतुक नसतं. भूगोलाशी सख्य नसतं.
निसर्गातल्या कलात्मक बाबींची नि इथल्या लहान सहान घटकातल्या सौन्दर्याचा आणि त्याच्या अस्तित्वाबद्दल रुची नसते. तशी दृष्टी नसते. 
आणि महत्वाचं म्हणजे शिस्त... नसते.आणि म्हणूनच..
जिथे तिथे..
मोठमोठ्याने सुरू असलेला कल्ला 
हिंदी गाण्याचा बाज..शिव्या व्याप...आणि ऐतिहासिक वास्तूंची सुरू असलेली ओढताण...नको ते उद्योग,
ह्यांन मन अस्वस्थ होऊन जातं. 

काल परवा हे असंच काही अनुभवलं.
जत्रेत रेटारेटीत जावं. गोंगाट करावा आणि परतावं तसंच काहीसं..

सकाळी साडे आठची कर्जत हुन आंबिवली मार्गे जाणाऱ्या एसटीने,
तास सव्वा - तासाच्या प्रवासघडी नंतर, आम्ही आंबिवलीत दाखल झालो. पाय उतार होताच, नजर वर उंचावून पाहिलं. 
जागोजाग वाहनांची (ट्रॅव्हलर, बसेस, इतर ) रीघ 
दिसत होती. परिसर त्यानंच गर्द झाला होता. 
त्यावरूनच संख्याच गणित कळत होतं. 
आधीच एसटी तील भरगच्च संख्या आणि त्यात ही ... ,
नजरेसमोर , एकूणच पुढचं चित्रं उभं होत गेलं.

गर्दीने वेढलेला कोथळीगड मुक्याने साद घालू लागला..
''अरे कुणी तरी थांबवा हे..''
त्याची ती अवस्था मनाला अस्वस्थ करून जात होती.
काय करावं...? कुणा सांगावं ? 
मन एकीकडे असं विचारांत गुंतलं असता..
हिरवाईचा हा स्पर्श आणि नटाटलेली ही जीवसृष्टी.. देहमन आनंदून नेत होती. 
वर्षाऋतूच्या सहवासात ..सृष्टीनं ही आपलं रूपडं पालटलं होतं. 
हिरवाईचा शाल पांघरूण... ही धरणीमाय आनंदाने हिंदळत होती. उत्साह त्यानंच दुणाणला होता. दुपट्टीने वाढला होता,





                                                                                 
पण तो काहीच वेळ.. 
जस जसं पुढे होत गेलो. 
आणि पेठ वाडीत पोहचलो. आणि चढाईला सुरुवात केली. तेंव्हा घोळक्या घोळक्याने सुरू असलेला कल्ला नजरेत खूपु लागला.

तरुणाई होश हरपून होती. पाऊला माग पावलांचा ठसा उमटला जात होता. एकेरी दीर्घ अशी रीघ लागली होती. 
त्यात कोणी गात होतं. कोणी गाण्यावर ताल धरून होतं. हिंदी पंजाबी गाण्यानं तर डोकं वर खुपसलं होतं. सृष्टीतल्या स्वरील सुरावटीचा गुंजनांद त्यानं लुप्त होत होता.
कुठेशी शिव्यांची भाषा सुरू होती. 
नको ते शब्द मुलींदेखत वटले जात होते. तीन चार जणांच्या त्या घोळक्यात ती मुलगी ही बिनधास्त मिसळून होती. नवल ह्याचच होतं.

अवघ्या काही वेळातच उंच सखल पाय वाटेतून, निसरड्या वाटेतून, बेचकीतून..बुरुजाजवळ येऊन पोहचलो. 
तेंव्हा समोरच्या दृश्यानं देहमनाचा राग अजून उफाळला गेला.
कधी काळी शत्रूवर नजर रोखून असलेली , काळीज धस्स करणारी तोफ, त्यावर दोघीजणी निवांत बसून गप्पा मारत...होत्या. 
त्याचं त्यांना काहीच वाटत न्हवतं.
मान अभिमान नावाची गोष्टच शिल्लक न्हवती.
'' इतिहास ठाऊक नाही, पण निदान अपमान तर करू नका रे..'' 
आमच्या पैकी 'रोहन अन मी ' दोघे पुढे होऊन दोघींना फटकारलं, तेंव्हा 'सॉरी' म्हणत त्या माघारी फिरल्या..

आता इथून आणि ह्या पुढे काय काय पाहावं लागेल. ह्यांने धास्तीच भरली होती...
किल्ले भटकंतीला जत्रेचं स्वरूप आलं होतं.
त्यात श्वास कोंडला जात होता, तो ह्या बेलाग बुलंद सह्याद्रीचा...
स्वराज्यातील देदीप्यमान ह्या तोरण माळेचा..
वीरमरण पत्करलेल्या त्या शूरवीर नरवीरांचा..
त्या असंख्य मावळ्यांचा...अन माझ्या सारख्या एका सह्य वेड्या भटक्याचा ही...

यावे ....आणि अवघे यावे , पण ती शिवदृष्टी घेऊन...
स्वराज्य ध्वज होऊन...मावळा होऊन..,
हा बलदंड राकट सहयाद्री आणि इथला रम्य हसरा निसर्ग आणि माणूस ह्यातील दुवा साधत, स्वतःला त्यात सामावून घेत....

जय शिवराय।।।
@संकेत पाटेकर..
२८.०६.२०१८


























वेबसाईट लिंक : कोथळी गड : पावसाळी जत्रा


शनिवार, ५ मे, २०१८

दुर्गराज राजगड आणि होळीचा मुहूर्त


''तुम्ही ना मागच उतरायला हवं व्हुत....मार्गसानिला तिथून साखरमार्गे  तुम्हाला जवळ पडलं असतं.  आता इथून लय चालावं लागेल. एसटी वगैरे बी काही मिळणार नाही'' ना कुठलं वाहन ..''
एखाद उनाड कार्ट्याला थोरा मोठ्यांनी , मोलाच्या एखाद दोन गोष्टी प्रेमानं समजून द्याव्यात आणि  ते सगळं ऐकूनही त्या कार्ट्याने ,  आपल्याच अकलेचा आलेख उभा करावा , ' असं काहीस आज माझ्याबाबतीत झालं. 


गाडीने नसरापूर फाटा ओलांडला , गुंजवणे कडे नेणारा मार्गसानि  हि मागे सरला ..आणि पाबे मार्गे एसटी वेल्हेल्याकडे धावू  लागली.  गावोगावाला  जणू एक सांगावा धाडत .  
''कुणीतरी आलंय हं  ...कुणीतरी आलंय , आपलं ..आपलं   माणूस ''  

गावोगाव जोडणारी आणि माणसं बांधून ठेवणारी  हि एसटी ...मानवी भावनांचा बांध अजूनही तसाच जपून आहे. 
असो, 

दिवस  एव्हाना  वर येऊन  स्थिरावला होता .  क्षितीज  नव्या इच्छा आकांक्षाने सजलं मोहरलं होतं.   
स्वप्नं पूर्ततेच्या ध्यासाने मनाची उत्कंठा हि केंव्हाच शिगेस  पोचली होती. राजमार्ग  खुणावू लागलेला, 
रस्ते , झाडी मी माणसं , घरे,  दारे , वास्तू , सरसर मागे पडत  होती. एसटी तिच्या आवेशात गुर्मीनच  जणू   धावत होती . 

हळू-हळुवार  दूरवर उभी असलेली ती डोंगररांग नजरेच्या कप्प्यात  येऊ लागली. 
आणि एसटीच्या खुल्या चौकटीतनं , राजगडाचं ते   विस्तृत , देखणं आणि भारदस्त असं  रूप स्पष्ट दिसू लागलं . आनंद ओसंडून जाऊ लागला. 
'' राजमार्ग असलेल्या पाली मार्गाची धूळ , आपण आता  मस्तकी मिरणवणार''  ..अहा..., काय भाग्य ..काय योगायोग.. म्ह्णून हृदयाची स्पंदन जोर घेऊ लागली. 

सलग दोन वेळा...  हा तीर्थरूपी राजगड , गुंजवणेच्या  चोर दरवाजातून सर केला होता .  ह्यावेळेस तसं न्हवतं. 
होळीचा मुहूर्त साधत  ..'राजमार्ग प्रवेश दाखल होंऊ'  असा  दृढ निश्चय करूनच , आम्ही इथं दाखल झालो होतो .आणि त्यावरच पूर्णपणे ठाम होतो .  

 ''तुम्ही, मागच उतरायला हवं  व्हुत, शेजारीच आसनस्थ झालेला आजोबा पुन्हा बोलते झाले. 
शेजारी बसल्यापासून त्यांचं ...तेच सांगणं सुरु  होतं . 
राजगडला जायचं आहे ना , मग मार्गसानि ला उतरा आणि साखरमार्गे पुढे व्हा......ते जवळ पडेल.  पाबे वरून लय चालावं लागेल. एसटी वगैरे बी काही मिळणार नाही'' ना कुठलं वाहन ..,

मार्गसनी मागे सरलं  पण आम्ही उतरलो नाही. 
मूळचे , आसपासच्या गावातलेच असलेले ते आजोबा , आम्ही काही ऐकेनात म्हणून पुन्हा शांत  झाले. 
''मागे दोन वेळा तिथून जाऊन आलोय आजोबा, 'आता वाजेघर मार्गे जायचे आहे'' पायवाटेलाच येणाऱ्या एकेका  गावांची आणि तोरणा रायगडच्या आमच्या त्या मोहिमेची,  सांगड घालत मी  त्यांच्यापुढे  बोलता झालो. त्यावर,  तुम्ही इथलेच वाटताय ' असा  शेरा उमटवला.  
हा , अधून मधून फेऱ्या होतात आमच्या ...

बोलता बोलता पाबे जवळ आलं . आणि त्या संर्वांचा निरोप घेत आम्ही  एसटीतून खाली उतरलो. 
गुगल ज्ञान भंडारातून  आणि पुस्तकीय दाखल्यातून   हवी असलेली  माहिती मिळवलीच  होती.  बस्स , आता  चढाई  आणि पायपीट चा श्री गणेश करायचा  होता. 
तत्पूर्वी आसपास , आपल्या मार्गाची खात्री करावी म्हणून,  कुणी दिसतंय का ते पाहू लागलो. पण आमच्या शिवाय तिथं कुणी एक दिसेना,  
ये ते बघ , त्या काकांना विचार ? 
आमच्यातल्याच कुणी एकाने ...रस्त्या कडेला असलेल्या दुकानातल्या त्या काकांकडे बोट ठेवलं.
काका , राजगड साठी कुठून वाट आहे? 
त्यांच्याशी  संवाद  साधताना एक गोष्ट   निदर्शनास आली कि आम्ही साधारण एक किमोमीटर पुढे आलो होतो. एसटीतून उतरलोच ते एक  किलोमीटर पुढे , मूळ मार्ग  सोडून , 
आता पुन्हा माघारी .... , चला इथूनच सुरवात ट्रेकला :  मनाशीच म्हटलं .  
काकांनी शेता बांधावरून  जाण्याचा योग्य तो सल्ला दिला. 
पुढे गेलं कि पूल लागेल . तिथून योग्य वाटेला लागाल. 
काकांना धन्यवाद म्हणत आणि त्यांचा  निरोप घेत आम्ही आमच्या पायपिटीला लागलो. आता  इथून पुढे किती वेळ  चालावे लागणार ह्याचा आलेख आता पुढेच ठरणार होता. 
क्रमश : 
संकेत पाटेकर 
५/५२०१८ 







रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

भटकंती एकदिवसाची- खोपोली पाली परिसरातली


प्रयोग दुसरा....
स्वतःला सगळ्या (त्या त्या संबंधीतल्या.. ) गोष्टीच , बाजूचं ज्ञान व्हावं ह्या हेतूने केलेला हा प्रयोग ,
प्रयोग दुसरा..
सहज म्हणून शूट केलेल्या हलत्या प्रतिमा , म्हणजे व्हिडीओस , स्वतः एडिट करून , स्वतःच त्याला संवाद वाक्य देऊन, स्वतःच्याच आवजात ते (कित्येकदा पुन्हा पुन्हा ) रेकॉर्ड करून .. , योग्य ते पार्शवसंगीत शोधून, योग्य त्या जागी चिटकवून , योग्य ती सारवासारव आणि जुळवणी करत , पूर्णरूप साधने म्हणजे किती अहो, ती तपश्चर्या , ह्याचा अनुभव हि इवलीशी व्हिडीओ करताना आला. अमाप असा वेळ खर्ची लावून ..
अर्थात ....खूप काही चुका आढळतीलच ...
कारण हि सुरवात आहे.
हळूहळू आपलं पुढे जायचं आहे , शिकत शिकत...
तर सांगा बरं कशी झालेय हि व्हिडीओ ....
पुढे अजून काही घेऊन येणार आहे.
युट्युब लिंक : इथे बघू शकता. ऐकू शकता
आपलाच,
- संकेत