मंगळवार, २९ जानेवारी, २०१३

राजगड - शोध सह्याद्रीतून ....२६/२७- २०१३


राजगड - शोध सह्याद्रीतून ....



















किती शांत वातावरण होतं. तरीही अधून-मधून वाऱ्याची गार झुळूक अंगावर येत. जणू ती वारेगुलाबी थंडी एकटक खेळत,गुणगुणत स्व:तहाशीच ...

तिने आपले बाहू सर्वत्र पसरले होते ,संपूर्ण राजगड परिसर तिने आपल्या अखत्यारीत आणले होते , तिच्या मगरमिठीतून कुणाचीच सुटका होत न्हवती , गारठलेली ती पाने फुले हि , 'सूर्य नारायणाच्या दर्शनास जणू  आतुरली होती , त्याकडून मिळनाऱ्या कोमलतेच्या उबेसाठी ...

 पण अजून तसा बराच अवधी होता.
राजगडचं रूपं काळोखात हि कस लक्ख उठून दिसत होतं , शेवटी स्वराज्याची ती राजधानी,  आपल्या शिवबाजी , इथल्या रयतेची राजधानी, जिथे आपल्या राजाचं २५ वर्ष वास्तव्य होतं.
जिथे अनेक सुख दुखाचे प्रसंग स्व:तहा ह्या किल्ल्याने पहिले , इथल्या मातीने अनुभवले , इथली प्रत्येक वास्तू त्याची साक्ष देत आजही , अजूनही खंबीरपणे उभी आहे , ते पाहूनच उर भरून येतो , कुतूहल जागं होतं , अभिमान वाटू लागतो , खरच भाग्यवान आहोत आपण इथल्या मातीत आपला जन्म झाला.
हे सर्व अनुभवत होतो मी राजगडवर ,तिथल्या मातीत..

तन-मन हरवलं होतं राजगडचं रूप न्ह्याहाळत , स्व:ताहाशीच कुजबुज करत होतं ते , तेवढ्यात माझ्या वहिनीचा मंजुळ स्वर कानी पडला , डोक्यापर्यंत घेतलेली चादर अलगद उचलून बाजूला सारून पाहिली नि तोच घड्यालाकडे लक्ष गेलं , सकाळचे साडे सात होत आले होते.
पुन्हा एकवार घड्याळाकडे पाहू लागलो , डोळे चूळबळू लागलो . तेंव्हा आपण कुठे आहोत ह्याची जाणीव झाली.
अजूनही राजगडाची ती सोनेरी क्षणे मनातून नि नजरेतून हलत न्हवती. रात्री उशिरा घरी परतलो होतो नि जेवून-खाऊन तसाच झोपी गेलो होतो, राजगड वर घालवलेले ते सर्व क्षण आठवतं ...

मागच्याच वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राजगडला जाऊन आलो होतो.
त्या आठवणी ताज्या असतानाच पुन्हा राजगडला जाण्याचा योग आला... तो रश्मीमुळे, ..
तिच्या ''शोध सह्याद्री '' ह्या तिने स्थापिलेल्या अन ''छत्रपती शिवाजी महाराज '' ह्यांच्या जयंती वेळी सुरु केलेल्या छोट्याश्या पण महत्वाची कामगिरी त्यातून बजावणार्या ग्रुप मुळे .

खास , येणारया पिढीसाठी - शाळेतल्या मुलांमध्ये आपला हा गौरवशाली 'गड - कोट - किल्ले' ह्यांचा इतिहास , त्यांच्या मना मनात रुजवावं , किल्ल्याचं महत्व पटावं , त्यातून मिळणार्या प्रेरणेतून , त्यांच स्वतःच उज्ज्वल भविष्य घडावं हा ह्या '' शोध सह्याद्रीचा'' मुख्य उद्देश ...
आणि म्हणूनच माझं जाणही तितकंच निश्चित होतं .


























त्या निरागस लहान मुलांमध्ये मिसळणं , त्यांच्याशी संवाद साधणं  , त्यांच्या निरागस प्रश्नांना उत्तर देणं ' त्यांना आपला हा गौरवशाली गड-कोट-किल्ल्यांचा इतिहास समजावून सांगणं, ' हे मला अनुभावायचं होतं.
आणि ते सगळ पूर्ण झालं ,  ''शोध सह्याद्रीचे '' २ दिवसाच्या आखलेल्या ह्या राजगड मोहिमेत ...
त्याबद्दल मनापासून धन्यवाद आपल्या सर्व टीम ला ...

राजगड ट्रेक दरम्यान माझ्या मनावर आपला छाप उमटवून गेलेले काही क्षणांचे मी इथे वर्णन करणार आहे :-
१) वर दिल्या प्रमाणे लहान मुलांमध्ये मिसळणं खरच खूप वेगळा आनंद असतो, त्याचं ते निरागस मन आपल्याला आपल्या बालपणीच्या आठवणीत नकळत घेऊन जातं.
त्यांच्याशी संवाद साधताना ,त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांना कळेल अशा भाषेत समजावून सांगणं खरच खूप कठीण असतं ,प्रत्येकाला ते जमतच अस नाही...

ट्रेक दरम्यान अशी अनेक निरागस प्रश्न कानावर पडली. त्याच उत्तर त्यांना समजेल अशा शब्दात सांगण्याचा मी माझ्यावतीने तसा पूर्ण प्रत्यत्न केला .
आपण ज्यावेळेस आपल्याकडील ज्ञान इतरांना देतो, आणि देत असता त्यांच्या चेहऱ्यावरचे ते समाधानी भाव , ज्यावेळेस निरखतो  , त्यावेळेस मनात  स्फूर्ती निर्माण होते , मनं अधिक उत्साहाने टवटवीत होवून बहरले जाते.
माझं मनही असंच बहरलं .....त्या वातारवणात ........

विशेष म्हणजे परतीच्या वेळी ट्रेकबद्दल घेण्यात आलेल्या,  आप आपल्या प्रतिक्रिया देत असता केल्या गेलेल्या त्या कौतुकाने :-) विषेच आभार ....संपदाचे , माझ्या बहिणीचे :))

२) निसर्ग हा एकमेव असा मित्र आहे कि त्याच्या सानिध्यात असता तो इतर विचार 'जे मनात नेहमीच धूडगूस घालत असतात ' , त्यांना तो त्यावेळेस तरी आपल्या आजुबाजूस फिरकू देत नाही.
एका आगळ्या-वेगळ्या धुंदीत आपल्याला तो घेऊन जातो. एका वेगळ्या लयात आपल्याला तरंगत ठेवतो. एक वेगळी सफर घडवून देतो.  त्यात असतो असतो फक्त आनंद ...आनंद नि आनंद ..
नि जीवनशिक्षण जे पाठ्य पुस्तकातून कधीही मिळत नाही.
ते त्याच्या सानिद्ध्यात आल्यावर ,त्याच्याशी एकांतात सवांद साधता मिळून जातं.

दुपारची वेळ , माचिवरल्या पद्मावती मंदिर मागे असंच काही क्षण आजूबाजूचा निसर्ग , त्यातील निर्जीव सजीव घटकं,  नजरेत उतरवतं,  एकटक त्या तटबंदी जवळ बसून होतो.
बाजूला काही अंतरावर माकडांची टोळी त्यांच्या मस्तीत गुंग होती.  त्यातील एक कुटुंब माझ्या अगदी समीप येउन बसलं. घाबरलं नाही. मी हि आपला जागचा उठलो नाही. बस्स त्यांना निरखून पाहू लागलो.
प्रेमाने ...
ते चौकट कुटुंब , त्यातलं ते चिमुकलं पिल्लू , आईच्या अंगा खांद्याशी लगट करत होतं.
कधी आपली भूख भागवतं होतं...
किती गोजिरवानं नि छानसं पिल्लू होतं ते..

काही वेळेत टुनटुन उडया मारत ते आईपासून दुरावलं नि तटबंदी वरून बागडत बागडत , आपल्या इतर बांधवांकडे जावू लागलं. आई अन तिची सावली सोबत असली म्हणजे , कसली काळजी नि काय ...
क्षणभर वाटलं ,ते सगळे क्षण आपल्या कॅमेरात बंदिस्त करावेत. पण म्हटलं , नको ..ते आपण आपल्या नजरेतच सामावून घ्यावं ...कायमचं...!

दुसऱ्याच  क्षणी निळ्याशार आकाशात त्या काळ्या निळ्या इवल्याश्या पाखराची ती उंच झेप मनाला भरारी देत होती.पाली दरवाज्याचा भक्कमपणा , बालेकिल्ल्याच ते रांगड रूप , त्याच ते सौंदर्य अन निळेशार आकाश मनाला उजळवून टाकत होतं.
दुपारच जेवण उरकून सुवेळा माचीकडे जातेवेळी , डुबा खुणावू लागला.
नजरेत येऊ लागला. तसं  गो. नि दांडेकरांची '' वाघरु'' नि त्यातील ते क्षण '' तिथल्या उंच झाडी वर वाघरुसाठी बांधलेले मचाण'' तो सारा प्रसंग डोळ्यासमोर नाचू लागला.

पुढे नेढे जवळ , त्या नेढेतून त्या वाघरू च क्षणात नाहीस होणं, हे सगळे त्या कादंबरी मधले प्रसंग एक एक करत आठवू लागले. मन भारावू लागले. आणि त्या भारावलेल्या स्थितीतचं आम्ही , मी पुन्हा पद्म्वती मंदिरकडे परतू लागलो.

सूर्य हळू हळू मावळती कडे झुकू लागला. तशी रात्रीच्या जेवणाची लगबग सुरु झाली.
संपदा , सिद्धेश , सुशील , सुशांत , रश्मी , यतीन , भरत , प्रणीत सर्व एकमेकांना  मदत करत होते.
जेवण तयार करण्यास मी हि अधे मध्ये इतर कामांना हातभार लावत होतो.

अशातच सूर्य देवता मावळतीकडे केंव्हाच लुप्त झाले होते.  पण त्यांची ती सोनेरी तांबूस रूप मी माझ्या कॅमेरात नि नजरेत बंदिस्त केली होती.
































रात्रीच गडद छाया हळू हळू गडावर आपलं विस्तार करू पाहत होती. तरीही पौर्णिमा असल्याकारणाने , चंद्र देवतेच्या शीतल प्रकाशित छायेत गड न्हाहून निघालं होतं.

काही वेळ त्या ढगांशी लपाछुपिचा खेळ खेळणार्या त्या चांदोबा कडे टकमक पाहत असता, एक विचार मनात तरळून गेला.
मनं म्हणू लागलं , 'आता पर्यंत कित्येक क्षण ह्याने आपल्या स्मरणात ठेवले असतील ...
कित्येक महत्वाचे प्रसंग , इथला इतिहास आपल्यात सामावून घेतला असेल न्हाई !
मन असंच काहीसं  कुजबुज करत होतं.
काही गोष्टींशी जुळवणी करत होतं अन त्याचबरोबर वेळ हि पुढे पुढे सरत होती.

जेवण आता  तयार झालेलं , चुलीवरल्या जेवणाची अन ते तयार करताना केल्या गेलेल्या मेहनतीची चव,
अन तो खमंगच इतका स्वादिष्ट होता कि त्यानेच मनं आणि उदर दोन्हीही तृप्त झाले.


काही वेळेतेच जेवण उरकून सगळे (बच्चे कंपनी विशेष करून ) थकले भागलेले असल्याने ते हि झोपी गेले ,
मी हि आपली चादर पायापासून डोक्यापर्यंत घेत झोपी गेलो.
पण रात्रीची ती गुलाबी थंडी अंगावर चादर घेतली असता हि अलगद स्पर्शून जात होती.
मनाची हुरहुरी वाढत होती.सर्वत्र शांतता नांदू लागली.
पद्मावती मंदिर बाहेर कुणा एका दोघांचा आवाज हळुवार कानी पडत होता.
अशातच एका क्षणी , एका कसल्यातरी मोठ्या आवाजाने सगळं वातावरण ढवळून निघालं .
सगळं एकाकी  शांत झाल्यासारखं  भासलं. कुणास ठाऊक काहीतरी विपरीत घडलं असावं असा एक विचार मनाशी स्पर्शून गेला. पण नंतर म्हटलं बाहेरील मुले काहीतरी दंगा मस्ती करत असावी.
असो...

घड्याळाचे काटे वर्तुळाकार फिरत फिरत एकमेकान जवळ येतं  अन पुन्हा दुरावतं असा एकंदरीत  त्यांचाखेळक्रम चालू होता.  त्यांच्या त्या खेळ - खेळा मध्येच पहाटेचे ६ वाजले होते.
अजून हि तसं उजाडलं न्हवत. पण थंडीने मात्र झोडपलं होतं.

त्या गारठ्यात पद्मावती तलावाजवळ गेलो नि त्यातल्या थंडगार पाण्याने (अर्थात बॉटल ने पाणी भरून मग ) हाता तोंडावर पाणी शिंपडले. काही वेळेतच रात्रीचा उरलेला भाताचे फोडणी भात करून नि चहा पाणी घेऊन आम्ही सगळे संजीवनी माचीकडे निघालो.

संजीवनी माचीकडून मग पाली दरवाज्याकडे , अन तिथून पुन्हा पद्मावती मंदिराकडे ,
प्रत्येक ठिकाणी रश्मी , संपदा , यतीन , प्रीतम , आपल्याजवळील असलेली माहिती, लहान मुलांपर्यंत पोहोचवत, त्यांना ते समजावून सांगत ....माझाही त्यात थोडाफार हातभार असे ,
मन तेंव्हा साहजिकच अधिक फुलत, कारण आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्यांना देण्यात जो आनंद असतो , त्याच काय नि कसं वर्णन करावं  ....असो

दुपारचे २ वाजले होते. परतीचा मार्ग जवळ येत होता , वेळ हि अशी गोष्ट आहे कि कधी कुणासाठी थांबत नाही. 
झाली परतीची वेळ झाली , निघण्याची घाई झाली , राजगड , राजगड , राजगड ...
 हे २ दिवस कसे त्वरित निघून गेले , कसे भुर्रकन उडाले ते कळलेच नाही , राजगडचं ते राजवैभव , तिथल्या प्रत्येक वास्तूतलं सौंदर्य नजरेत बंदिस्त करून आम्ही निघालो पुन्हा परतीच्या वाटेला ...

पण खरंच राहवत न्हवतं ..' कुणीतरी माझ्या पायाला साखलदंड बांधा रे '  
म्हणजे मी इथला जागचा हलणार नाही. 
मनात एकप्रकारे अशी आरडाओरड सुरु होती. 
पण त्यावर इलाज न्हवता. चोर दरवाज्याने आलो तसंच पुन्हा त्याच वाटेने गुंजवणे कडे निघालो. 
काही तासातच गुंजवणे गावात पोहोचलो हि ...

गावात पोहोचताच  तिथल्या हापशी वर हातपाय धुतले  नि पुढे शिवरायांच्या प्रतिमेचे मनोमन दर्शन घेतले आणि शाळेजवळील पटांगणात उभा राहिलो .
तेवढ्यात समोरून एक आजीबाई काठी टेकवत टेकवत हळुवार थरथरत्या अंगांनी माझ्या बाजूला येउन बसली.चेहर्यावर असंख्य त्रयस्त छटा , सुरकुत्या लांबूनच दिसत होत्या.

तुम्ही ह्याच गावाचे का ? ह्या प्रश्नाने मी बोलण्यास सुरवात केली.

हो रे बाबा, इथलेच..
काय सांगू , दोन तीन दिवसापासून  ताप थंडी , उलट्या चालू आहेत.
डॉक्टर कडे गेले होते.  २०० रुपये घेतले.
आपला हातावरची पट्टी दाखवत थकल्या आवजात त्या आजीबाई बोलत होत्या.

मरण पण येत नाही रे बाबा , सुनेकडे लाह्या मागितल्या दिल्या नाही.
मुलाकडे पैसे मागितले दव्यासाठी ते दिले नाही.  मरण पण येत नाही रे.. नाही येत...
स्वतःशीच बोलल्यागत हळुवार थरथरत्या ओठाशी त्या पुटपुटत होत्या.

बाबा दहा रुपये मिळतील का ?
त्यांनी माझ्याकडे वळून पाहिलं , मिळतील ह्या अपेक्षेने ,
पाकिटात किती पैसे शिल्लक होते हे मलाच ठाऊक न्हवतं.
मी  माझं पाकीट बाहेर काढलं नि जी नोट हाती आली ती देऊ केली.
ते देताना त्यांच्या चेहऱ्यावरील ते भाव बघण्यासारखे होते.
त्यांनी मला मनोमन आशीर्वाद दिला.  त्यांचे चरणस्पर्श करून त्यांचा निरोप घेऊन मी आमच्या टीम सोबत चार चाकी वाहनाने परतीच्या मार्गी लागलो.

मनात तेंव्हा एकाच विचार घोळत होता.
का म्हणून अशी वागतात लोक ? आपल्या आई - वडलांशी ?
म्हातारपणं हेही देवानेच दिलेली देणगी , ती पुढे आपल्यालाही मिळणारच ?
काही क्षण विचारांचं चक्र तेजीत चालू होतं.

एका क्षणी मन म्हणालं , परिस्थिती नि वेळ हीच मुळात माणसाला त्याच्या सहनशक्तीला , त्याच्या विचार वृत्तीवर , त्याच्या तना मनावर , आघात करत असते ...अन त्यानुसार बदल हा घडत असतो.
हाच निसर्ग नियम ............
गाडी ने वेग घेतला तसा राजगड नि त्या सगळ्यां आठवणी मनाच्या एकां कप्यात बंदिस्त झाल्या.....

संकेत य पाटेकर
२९.०१.२०१३
मंगळवार
















शनिवार, २० ऑक्टोबर, २०१२

कुलाबा - सर्जेकोट अन भरतीची लाट (३० सप्टेंबर २०१२, रविवार )





माणसाने कितीही प्रगती केली ...तरी त्याला ह्या निसर्गा पुढे मान झुकवावी लागतेच ..हतबल ह्वावेच लागते. 
दुसरा पर्याय हि नसतो आपल्याकडे त्याच्या त्या भव्य दिव्य शक्तीपुढे ... ह्याचा प्रत्यय काल आम्हास आला.  
पूर्ण तयारीनिशी कुलाबा किल्ल्याकडे आम्ही सगळे रवाना झालो. 
पहाटे ७ ची गेट वे वरून फेरी बोट पकडून ..

सकाळच्या तांबड्या - सोनेरी कोवळ्या उन्हातून ....त्या तरंगातून ..सागरी फेसाळ लाटातून ...
मांडावा बंदरात ..अन तिथून त्यांच्याच बस ने पाऊन तासात रस्ताय्च्या दुर्तफा असलेल्या नारळी पोफळीच्या बागेतून थेट अलिबाग....मनात त्या बळकट अन ऐतिहासिक किल्ल्याचे ते रूप साठवून ... 
छत्रपती शिवराय , छत्रपती संभाजी महाराज , मराठी आरमार प्रमुख ..दर्यासारंग ..कान्होजी आंग्रे ....ह्यांच्यासारखे आदर्श व्यक्ती आणि त्याचे ते महान कार्य डोळ्यात साठवून...

आम्ही अलिबाग एसटी स्थानका जवळ आलो अन तिथून १०- १५ मिनटे पायी चालण्या नंन्तर अलिबागच्या त्या समुद्र किनारी येऊन थांबलो . 
आमच्या पैकी दोघेजण निलेश अन स्नेहल ह्यांनी सकाळी आठ वाजताच बाईक ने डोंबिवली हून अलिबाग गाठले होते . २ तास ते तिथे आमची वाट पाहत कंटाळून गेले होते.

आम्ही पोहताच त्यांना हायसे वाटले असावे ह्यात शंकाच नाही ....
स्नेहल चा चेहरा तर प्रेमळ रागाने फुगला होता. थोडं बोलन अन निलेश अन स्नेहल शी थट्टा मस्करी झाल्यावर  किल्ल्यावर जाण्यासाठी म्हणून मी समुद्रकिनारी नौका /होड्या कुठे दिसते का ते पाहू लागलो. 

भरतीची वेळ होती त्यामुळे आम्हाला काही पायी किंव्हा टान्ग्यानी जाता येणार न्हवते. 
नजर आपुसकच मग इकडे तिकडे नौकेच्या शोधार्थ समुंदर किनारी झेप घेऊ लागली . पण कुठेच काही दिसेना. 
ना नौका ना नौका धारक ....नाविक...

तिथल्या स्थानिक लोकांना विचारले असता त्यांनी म्हटले ''तुम्हाला ओहोटी शिवाय किल्ल्यात जाता येणार नाही' दुपारपर्यंत ते पाणी निस्तरेल ..हळू हळू ..तेंव्हा तुम्ही पायी जावू शकता अथवा टान्ग्यांनी . होड्या बंद आहेत.

त्याचं ते वाहणारे शब्द ऐकून ...मनात विचारांचं चक्री वादळच फिरू लागल. ...मन सैरा वैरा झाले.
इतक्या सारयांना इतक्या दूर वर मी जो ऐतिहासिक किल्ला पाहण्यास घेऊन आलो .... 
ते न पाहताच पुन्हा माघारी फिरायचं ...ह्या एका विचारांनीच ...मन कस स्तब्ध झालं.

आता पुढे काय ??
म्हणून सगळ्याचं एकमत होणे गरजेच होत . त्यासाठी पटा पटा एकमेकांच मत जाणून घ्यायला सुरवात केली .
नि काही मिनिटातच मुरुड जंजिरा करायचे हा एकजुटीचा ठराव संमत झाला. 
अन जराही वेळ न दवडता आलो त्या मार्गी पुन्हा फिरलो ...

तसं ह्या मोहिमेला निघतेवेळी मनात ठसवुनच निघालो होतो, की आपण पोहचु त्यावेळेस नक्की भरती ही असणारच , ट्रेकक्षितिज च्या कुलाबा किल्ल्याविशायी दिलेल्ल्या माहितिपत्राताही त्या खाली शेवटी त्यानी तिथि आणि वेळ लिहली आहे,
किल्ल्यात जाण्यासाठी सोयीस्कर ओहोटीच्या वेळा
तिथी वेळ तिथी वेळ
प्रतिपदा ४:०० ते ६:०० अष्टमी ९:०० ते १२:००
द्वितीया ५:०० ते ७:०० नवमी १०:०० ते १२:३०
तृतीया ५:३० ते ८:०० दशमी ११:०० ते १३:००
चतुर्थी ६:०० ते ९:०० एकादशी११:३० ते १४:००
पंचमी ७:०० ते ९:३० द्वादशी १२:०० ते १५:००
षष्टी ८: ०० ते १०:०० त्रयोदशी१३:०० ते १६:००
सप्तमी ८:३० ते ११:०० चर्तुदशी १३:०० ते १६:००
पौर्णिमा / अमावस्या १४:३० ते १७:००

हे सर्व माहीत असता , आम्ही निघालो , कुलाबा अन सर्जेकोट पाहण्यासाठी , का .... तर वाटल होत की अलिबागाचा किनारा ते किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ख़ास होड्या-नौकेच्या सेवा असतील. 
तसेच काही वर्षापुर्वी माझा मित्रही कुलाबा किल्ला पाहून आला होता आणि त्यावेलेस ही भरती असल्याने तो होडीनेच किल्ल्यात जावून आला होता.

म्हणून निशंक मनाने आम्ही कल्याण- ठाणे - गेट वे - मांडवा करत अलीबाग च्या ह्या किनार्या पर्यंत आलो होतो .
पण इथे आपल्यावर मनात साठवलेल सगळ चित्र पालटल होत. 
म्हणून वेळ हातातून निसटण्याआधी आम्ही मुरुड जंजिरा करायचे ठरवले.
अन त्यासाठी एखादी चारचाकी वाहन कुठे मिलते का म्हणून रस्त्याने चालता चालता चौकशी करू लागलो .

सुरवातीला एक टमटम वाला दिसला त्याने अलीबाग - मुरुड -जंजिरा - अलीबाग चे १५०० रुपये होतील असे सांगिलते. त्याला काही कारणास्तव आम्ही नाही म्हटले अन पुन्हा दुसर्या वाहनाच्या शोधार्थ बोलत चालत निघालो.
आमच्या पैकी दोघे निलेश अन स्नेहल बाईक ने होते . 
त्यांनी पुढे जावून एक तवेरा बद्दल चौकशी केली नि आम्हाला लगेच तिथून कॉल केला .

तवेरा होती त्यामुले मस्तपैकी आराम के साथ जाण्यास मिळणार होते . पण जाउन येउन १९०० रुपये होतील असे त्याने म्हटल्यावर खरच मुरुड जंजिरा करायच का ??.हां मुद्दा पुन्हा उपस्थित झाला .

कारण खर्च वाढत होता. त्यात वेळही फार कमी होता. जाउन येउन ५ ते ६ तास होणार होते . 
नि आताच इथे ११:१५ झाले होते .शेवटची सायंकाली ६:१५ ची मांडवाहुन अपोलो लौंच होती . 
तिने आलो त्या मार्गी पुन्हा घरी परतायचे होते.
मग काय पुन्हा एकदा ...ठराव पास झाला. नि जे पाहण्यासाठी आलो होतो. 
तो कुलाबा किल्ला पाहुनच जायचे असे मनी पक्की केले. पण त्यासाठी आम्हाला दुपार पर्यंत तिथे थांबायला लागणार होते, ओहोटी पर्यंत ...तेंव्हाच कुठे तिथे जाण्यास मिळणार होते.

आता घड्याल्यातळा छोटा काटा ११ वर तर मोठा काटा ६ वर स्थिरावला होता. म्हणजेच साडे अकरा वाजले होते .दुपारी दोन ते तीन पर्यंत तरी जाता येणार न्हवते. त्यामुळे मिळालेला इतका वेळ काय करायचे हां एक नवा प्रश्न उपस्थित झाला....नि त्या प्रश्नाला थोड्याच वेळात उत्तर देखिल मिळाले.

बिर्ला मंदिर - अलिबागपासून चार चाकी वाहनाने साधारण १ तासाच्या अंतरावर
रेवदंडा साळाव ही खाडी पार केली की,
डाव्या बाजूला दोन कि.मी. अंतरावर बिर्ला उद्योग समुहाने बांधलेले संगमरवरी आदित्य बिर्ला गणेश मंदिर आहे . या मंदिरात गणेश मूर्ती व्यतिरिक्त अंबामाता, शिवपार्वती, राधाकृष्ण व सूर्यदेव यांच्या मूर्ती आहेत.
मंदिरात प्रवेश करतेवेळी मात्र आपल्या सोबत आणलेले मोबाईल फोन , कॅमेरा आता नेण्यास बंदी आहे.

साधारण १२:३५ मिनिटाने आम्ही मंदिराच्या प्रवेश द्वाराशी पोहोचलो . नि दर्शन वगैरे घेऊन ...काही वेळ त्या शांत ठिकाणी त्या वातावरणात तसेच बसून राहिलो.

मंदिर - मनात चैतन्य निर्माण करणार , चेहर्यावर प्रसन्नता आणणार अन शांत वातावरण असणार ठिकाण. 
अशी माझी मंदिराविषयी व्याख्या आहे. खरच खूप छान वाटत तिथे ..त्या शांत वातावरणात.
काही वेळ आम्ही तिथे तसेच बसून होतो ...

निलेश बाईक ने आला असल्यामुळे त्या प्रवासामुळे तो फारच थकला होता . त्यामुळे तो तिथेच काही वेळ शांत पडून होता . वेळेचे बंधन असल्यामुळे नि कुलाबा किल्ला पाहायचं असल्याने आम्ही तिथून काही वेळेतच निघालो .

दुपारचे १ वाजून गेल्याने पोटात कावळे सुद्धा ओरडू लागले होते. भूख लागली होती..साऱ्यांना ,
त्यामुळे जे काही सोबत आणले होते जेवणाचे डबे ते पटा पटा बाहेर पडू लागले .
कुणी थेपले चटणी , टोमॅटो चटणी , ठेचा, अस काय काय आणल होत. 
स्नेहल ने स्वतहा ने बनविलेला केक आणला होता.त्यामुळे कसं पोटभर जेवण झाल . 
पोट तृप्त झाल त्या जेवणाने...

जेवण उरकल्यावर थोड्या वेळेतच सगळ्यांची एकत्रित अशी एक छानशी छबी घेऊन,
आम्ही आमच्या पुढील अन महत्वाच्या ठिकाणी म्हणजेच कुलाबा किल्ल्याच्या दिशेने निघालो.
निलेश अन स्नेहल ह्याना घरी वेळेत पोहचायचे असल्याने कुलाबा किल्ला कडे न येता ते परतीच्या मार्गी लागले.

आमच्यामुळे सकाळी २ तास त्याना थांबावे लागले . ते हि आम्हा सोबत कुलाबा किल्ला पाहण्यसाठी आले होते. 
पण वेळेअभावी ते न पाहताच बिर्ला मंदिरा पर्यंत आम्हा सोबत करून तिथूनच पुन्हा माघारी फिरले.
वाईट त्याच गोष्टीच वाटत होत . त्या दोघांना तो ऐतिहासिक किल्ला पाहता आला नाही...माझ्यामुळे ....
भरती -ओहोटीच्या लाटांमुळे ................

असो ..तर बिर्ला मंदिरं करून जेवण उरकून आम्ही उरलेले ७ जण तवेराने सुसाट निघालो .
मध्येच एका वेडसर गाडीवाल्याने आमच्या तवेराला ओव्हर टेक करून ...
मधेच त्याच्या वाहनाचा वेग कमी अधिक करत ...तर कधी रस्ताच्या उजवीकडून डावीकडे , डावीकडून उजवीकडे गाडी वळवत काही मिनिटे पुढची जाण्याची वाट अडवून धरली. 
त्यामुळे आमच्या ड्राइव्हर काकांचा रागाचा पारा वाढीस लागला. नि मग काय चोर - पोलिसांचा खेळ सुरु व्हावा तसा ... त्याला चांगलाच धडा शिकवावा ह्या हेतूने काकांनी पाठलाग सुरु केला .

एकमार्गी रस्ता असल्याने दोन्ही दिशेने वाहनांची ये जा सुरु होती ...त्यात काकांनी इतर वाहंनाना ओव्हर टेक करत त्या गाडीला धुंडाळत त्याच्या पुढे जाऊन त्याला चांगलाच धडा शिकवण्याच्या हेतूने गाडीचा वेग वाढवला. 
तसं मनात धस्स होऊ लागले ... नि सगळ्यांनी '' '' जावू द्या ओ काका ...राहू द्या ''कुठे मागे लागताय '' उगाच काहीतरी भलत सलत व्हायचं'' अस म्हणून काकांचा राग थंड करू लागलो.

गाडीचा वेग नि काकांचा राग थोडा कमी झाल्यावर रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या नारळी - पोफळींच्या बागेवर नजर खिळवत आम्ही साधारण दुपारी २:३० पर्यंत अलिबाग समुंदर(समुद्र) किनारी पोहोचलो.
अलिबाग- बिर्ला - अलिबाग ...तवेराचे ८०० रुपये आम्ही काकांना देऊ केले.
नि किनार्यावरच्या त्या वाळुच्या कणा कणावर पाय रोवीत ...ठसे उमटवीत ...आम्ही मौज मस्तीत किल्ल्याच्या दिशेने जावू लागलो. ओहोटी असली तरी समुद्राचं पाणी थोड्याफार प्रमाणात साठलेलं असतंच . त्या
तून डुबुक डुबुक आवाज काढत आम्ही सर्जेकोट ठिकाणी येऊन पोहचलो.











































५ बुरुजांच अन भक्कम तट बंदीचा हा छोटेखानी किल्ला आजही वयाच्या ३६१ व्या वर्षी सागराच्या प्रचंड लाटांचा 
तडाखा खात ,आपल्या इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभा आहे.



जून १६८१ साली ह्या किल्ल्याच बांधकाम संभाजी महाराजांच्या अखत्यारीत पूर्ण झाल.
छत्रपती शिवरायांनी १६८० साली कुलाबा किल्ला बांधण्यास सुरवात केली. 
 पण त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज ह्यांनी ह्या दोन्ही किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले.

सर्जेकोट बांधण्याचे कारण .......
(शिवाजी महाराज आपल्या आज्ञापत्रात म्हणतात, ‘‘किल्ल्या जवळ डोंगर(पर्वत) असल्यास तो सुरुंग लावून फोडावा आणि शक्य नसल्यास त्या डोंगरावरही किल्ला बांधावा‘‘. यामुळे मुख्य किल्ल्याला संरक्षण मिळते. अन्यथा शत्रु बाजुच्या मोक्याच्या जागेवर मोर्चे लावून किल्ला जिंकून घेऊ शकतो. आज्ञापत्रातील महाराजांच्या या आज्ञेप्रमाणेच बहुतेक संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्या जवळील खडकावर सर्जेकोट किल्ला बांधला.
यापूर्वी १६७९ साली खांदेरी बेटावर किल्ला बांधताना जवळच असलेल्या उंदेरी बेटाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सिद्दीने उंदेरीचा ताबा घेतला व त्यावर किल्ला बांधला व मराठ्यांना कायमची डोकेदुखी झाली. कदाचित ह्या घटनेपासून बोध घेऊन सर्जेकोट व त्याला कुलाबा किल्ल्याशी जोडणारा दगडी सेतू(कॉजवे) संभाजी महाराजांनी बांधला. - ट्रेकक्षितीज सौजन्याने )

सर्जेकोट पाहून झाल्यावर ...आमची पाउल कुलाबा किल्ल्याच्या दिशेने त्या बांधलेल्या सेतूवरून पुढे पुढे सरू लागली.
अन किनाऱ्यालगतच्या एका भव्य अन मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन थबकली .
किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोर, हत्ती, हरण, कमळ, शरभ अशी शिल्पे कोरलेली आहेत.
मुख्य प्रवेश द्वारातून आत शिरताच दुसऱ्या दरवाज्याचे काही अवशेषच फक्त आपल्या नजरेस पडतात . त्यातून पुढे प्रवेश केला कि ५ रुपयाच तिकीट काढल्यावर मग किल्ला पाहण्यास निघायचे .



कुलाबा किल्ल्याचा इतिहास :
(अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटरवर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती. ‘‘ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र‘‘ हे शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे मोक्याच्या बेटांवर त्यांनी किल्ले बांधले व जुने बळकट केले. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला. त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा किल्ला केंद्र होता. ४ जुलै १७२९ रोजी कान्होजी आंग्रे ह्यांचे कुलाबा किल्ल्यावर निधन झाले. १७७० मध्ये पिंजरा बुरुजापाशी लागलेल्या भयंकर आगीत किल्ल्यावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली. १७८७ मध्ये लागलेल्या दुसर्‍या आगीत आंग्य्राचा वाडा नष्ट झाला. २९ नोव्हेंबर १७२१ रोजी ब्रिटीश व पोर्तुगिजांच्या संयुक्त सैन्याने अलिबागवर ६००० सैनिक व ६ युध्दनौका घेऊन हल्ला केला, पण त्यांचा त्यात सपशेल पराभव झाला.

वैज्ञानिक प्रयोग : दुर्ग बांधणी
शिवाजी महाराजांनी दुर्ग स्थापत्यात अनेक प्रयोग केलेले आहेत. त्यापैकी एक येथे पहावयास मिळतो. हा दुर्ग बांधतांना दगडाचे मोठे मोठे चिरे नुसते एकमेकांवर रचलेले आहेत. दोन दगडांमधील फटीत चुना भरलेला नाही. त्यामुळे समुद्राची लाट किल्ल्याच्या तटाच्या भिंतींवर आपटल्यावर पाणी दगडांमधील फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर कमी होतो.

किल्ल्याला एकूण १७ बुरुज आहेत. चार टोकांना चार, पश्चिमेला ५, पूर्वेला ४, उत्तरेला ३ व दक्षिणेला १ बुरुज असे आहेत. बुरुजांना पिंजरा, नगारखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारुखानी अशी नावे आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर, डाव्या बाजूने गेल्यास भवानी मातेचे मंदिर लागते त्याच्या समोरच पद्मावती देवीचे छोटे व गुलवती देवीचे मोठे मंदिर आहे. पुढे गेल्यावर डाव्या हाताला वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष दिसतात. डावीकडची वाट हजरत हाजी कमाल उद्दीनशहा दरबार ह्यांच्या दर्ग्याकडे जाते. परतीच्या वाटेवर डावीकडे आंग्य्रांच्या वाड्याचे अवशेष दिसतात.

किल्ल्यावर अजुनही लोकांचा राबता असलेले सिध्दीविनायकाचे मंदीर आहे.

गणेशमूर्ती संगमरवरी असून तिची उंची दीडफूट आहे.१७५९ साली राघोजी आंग्रे ह्यांनी सिध्दीविनायकाचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. मंदिराच्या प्राकारातच उंचवट्यावर उत्तरेस मारुतीचे व दक्षिणेस शंकराचे मंदिर आहे.

मंदिरासमोर चिरेबंदी बांधणीची गोड्या पाण्याची पुष्कर्णी आहे. पुष्कर्णीच्या पुढे तटा पलिकडच्या दरवाजातून बाहेर गेल्यावर स्वच्छ पाण्याची विहीर आहे. या विहिरीला आत उतरायला पायर्‍या आहेत.

दुर्गाच्या दक्षिण टोकाला असणार्‍या दरवाजाला धाकटा दरवाजा / यशवंत दरवाजा / दर्या दरवाजा म्हणतात. या दरवाजावर गणपती, गरुड, मारुती, मगरी, कमळे, वेलबुट्टी यांची नक्षी कोरलेली आहे.

दरवाजालगत कान्होजींची घुमटी व द्वाररक्षक देवतेचा शेंदुर फासलेला दगड आहे. किल्ल्याच्या तटात गोदीचे अवशेष आहेत. तेथे नवीन जहाजे बांधली जात व जूनी दुरुस्त कली जात असत. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत.

किल्ल्याच्या उत्तरेला चाके असलेल्या २ तोफा आहेत.

तोफांच्या चाकांजवळ तोफा बनवणार्‍या कंपनीच नाव कोरलेल आहे ‘‘ डाऊसन हार्डी फिल्ड, डाऊ मूट आर्यन वर्क्स, यॉर्कशायर, इंग्लंड ", व वर्ष आहे १८४९. किल्ल्याच्या दक्षिण दरवाजातून सर्जेकोटला जाता येते.
(ट्रेकक्षितीज सौजन्याने )
























































असा हा ऐतिहासिक किल्ला पाहून .....मनात भरून ...डोळ्यात साठवून ...कॅमेरात बंदिस्त करून आम्ही आमच्या परतीच्या वाटेला निघालो .
अलिबाग ते मांडवा बस ने , मांडवा ते गेट वे अपोलो लौंच ने ..रात्रीच्या त्या शांत सागरी लहरीतून ....
आठवणींचे ते क्षण पुन्हा पुन्हा आठवून ...

संकेत य. पाटेकर
१०.०९.२०१२


पदरगड ची ती रात्र .....

 पहाटे ४ वाजता मी ..सिद्धेश.. दीप्ती ..भूषण आणि उज्वला त्या जंगलातून गणेश मंदिरा त जाण्यासाठी निघालो. जंगलातले ते वातावरण सुन्न करणारे होते .....आजूबाजूला कुठेच वस्ती नाही ..
खांडस हे गाव ते हि पाऊन ते १ तासाच्या अंतरावर.. . ..
जंगलातून चालत असताना ..पाला पाचोळ्याचा कुर्र कुर्र आणि रात किड्यांचा किर्र किर्र आवाज घोंगावत होता. काही अंतर पार करतोच तेच वर थोड्या अंतरावर कुणीतरी असल्याची आम्हाला चाहूल लागली ती त्यांच्या Tourch च्या झोतांनी .

इतक्या रात्री ..त्या काळ्या कुट्ट अंधारातल्या जंगलात आम्ही फक्त ५ जन आम्ही तिघे मुले आणि त्या दोघी ......
मनात क्षणभर भीती पसरली . पुढे जावे कि नाही ...रात्रीच्या त्या काळ्या कुट्ट अंधारात काहीच दिसत न्हवत . आणि वर कोण आहे तेही काही कल्पना येत न्हवती ....
थोडा वेळ तिथेच थांबून आणि आम्ही पुन्हा मागे फिरण्याचा निर्णय घेतला ..आणि आलो त्याच मार्गी एका फार्म हाउस च्या गेट ठिकाणी निवांत भिंतीला टेकून बसलो . आणि मग भूता गोत्यांच्या गोष्टी नां चेव आला आणि त्या निरव आणि भयावह शांततेत ..भूषण .आणि .उज्वला .....एक एक गोष्टी रंगवू लागल्या .....
काही वेळ गेला आमच्या त्या गोष्टी चालूच होत्या ...आणि तेवढ्यात पुन्हा एका Tourch चा प्रकाशाचा झोत आमच्या दिशेने पडू लागला . आणि पुन्हा सगळे एकदम शांत ...चूपचाप ...

तो झोत हळू हळू अधिक अधिक जवळ जवळ येऊ लागला आणि मग एका एकी गुडूप ......
क्षणभर कळेनास झाल ...काय झाले ते ...नि एकाकी एक व्यक्ती गेट च्या आतून आम्हाला डोकावून पाहून लागली . ..................

मनात नां ना विचार येण्या आधीच त्यांनी कुठून आलात ..इथे का बसलात ...आत तरी यायचं ना ...मी जातना तुम्हाला पाहिले . वगैरे वैगरे बोलू लागले .
आणि सर्वांनी त्यांच्याशी मन मोकळे केले . ते काका तिथे च असतात ....त्या फार्म हाउसवर ...रखवाली करत .

त्यांच्या शी बोलून ....नन्तर मग थोडे उजेडल्यावर आम्ही पदरगड साठी पुढे मार्गीक्रमण केले.
ट्रेक ला येण्या आधी पुस्तकात वाचले होते ....त्या जंगलात अनेक ट्रेकर्सना लुटण्याचे प्रकार घडले आहेत .
पण त्या काकान कडून कळल कि ते १० वर्षा पूर्वी ......आता नाही .
असा हा अविस्मरणीय क्षण -पदरगड
- संकेत —


सिद्धगड भीमाशंकर - एक विलक्षण ट्रेक अनुभव


इंग्रजी नवीन वर्षाची सुरवात आमच्या ह्या ट्रेक नि झाली .
१-२ जानेवारी २०१२ . हे ते दोन दिवस ...कधीही न विसरू शकणार असे.
ट्रेक ला आम्ही फक्त ४ जण.. यतीन , रश्मी , संपदा आणि मी ..म्हणजे दोन मुले आणि दोन मुली.
२ दिवसाचा अन एका रात्रीचा हा ट्रेक .
फक्त चौघे जण पण तरी हि हा ट्रेक खूप विलक्षण ठरला.
अनेक आठवणी दडल्यात ह्या ट्रेक मध्ये . खूप काही अनोख घडल खूप काही अनोख पाहिलं , खूप काही अनोख न रंजक अस ऐकल , प्रत्यक्ष अनुभवलं.
त्यातील काही आठवणी तुमच्या समोर पेश करत आहे .

१) हरवलेली ती वाट ............
सिद्धगड ...पुस्तकात वाचलं होत . घनदाट झाडी मुले इथे वाट चुकण्याची शक्यता अधिक असते , त्यामुळे कुणी तरी वाटाड्या सोबत असण चांगलच.
आमच्या पैकी यतीन ...३ वर्षा पूर्वी सिद्धगडला येऊन गेला होता . त्यामुळे त्याला वाट साधारण माहित होती.
सकाळच्या पारी एसटी ने आम्ही नारिवली गावात उतरलो नि एका माउशीकडे गडाकडे जाणारी वाट विचारून त्या दिशेने त्या मार्गी पुढे सरू लागलो,
वळणदार वाटेने लाल मातीत पाउलान्चा ठसा उमटवत . कोवळी सूर्य किरणे अंगावर घेत आम्ही निघालो. असा बराच वेळ निघून गेला ...आम्ही चालत राहिलो ..चालत राहिलो ..अन एकाकी पुढे वाट गडप .

एकाच फांदीला जसे अनेक छोट्या छोट्या फांद्या फुटाव्यात तसेच एका वाटेला १-२ वाटा दिसू लागल्या . मागे पुढे मागे पुढे करत आम्ही पुन्हा त्याच वाटेवर येऊ लागलो ...बराच वेळ गेला वाट सापडेना.

वेळेला खूप महत्व होतं....दुपार पर्यंत काहीही करून आम्हाला सिद्धगड करून ..
३ ते ४ तासाच्या ..सुमसाम आसपास कुठेही वस्ती नसलेल्या, निर्जन अन घनदाट जंगलातून पुढे पायपीट करायची होती.
त्यामुळे सिद्धगडावर वेळेत पोहोचण आम्हास काहीही करून बंधन कारक होत .
त्यामुळे पुढचा वेळ न दवडता आम्ही 'एक वाट' पडकून त्या दिशेने जावू लागलो.

उंचच उंच झाडी झुडपातून मार्ग काढत बराच पुढे आल्यानंतर एका धब धब्याच्या दगड धोंडांच्या दिशेने पुढे एका विस्तीर्ण कातळापाशी येऊन पोहोचलो

थोडा विसावलो नि आजूबाजूचा परिसर न्ह्याहाळू लागलो .आता वाटेने पुन्हा लपा छुपिचा डाव सुरु केला होता . वाट पुढे न्हवतीच..............तिन्ही दिशेला वाट बंद .
उजव्या हाताला मात्र ..भुसभुशीत माती ..आणि काटेरी झुडप असलेला एक उभा डोंगर आम्हाला challenge करू पाहत होता .
दुसरा पर्याय हि न्हवता . मागे फिरणे हि शक्य न्हवत .

तेंव्हा त्याचा तो challenge स्वीकारून आम्ही त्या भुसभुशीत मातीतून ....
एक एक पाउल सावधानतेने टाकत त्या काटेरी झुडपातून... अंगाला खरचटले असता ...मार्ग काढू लागलो नि अर्ध्या पाऊन तासाच्या उभ्या चढी नंतर कसे बसे विस्तीर्ण पठारावर येऊन पोहोचलो . नि श्वास मोकळा केला खरा ..........
पण इथेही पुन्हा ...उंचच उंच घनदाट झाडी, त्यामुळे समोरचा परिसरच दिसेनासा झाला होता .त्यात गवतांच्या पात्यानीही डोक वर काढल्यामुळे वाट नाहीसी झाली होती .

त्या सुमसाम निर्जन अन घनदाट झाडीत आम्ही फक्त चौघेच होतो .अन सोबत म्हणून रातकिड्यांची किर्र किर्र ....अन झाडाची काळी कुट्ट सावली
मागे वळता हि येत न्हवत . पुढे जाता हि येत न्हवत .

तशा त्या परिस्थितीत .......पुन्हा मनाचा निश्चय करून ....स्वताहाच्या संवरक्षणासाठी आणलेली छोटी हत्यार काढून आम्ही वाट शोधत शोधत एकदाचा पुढे निघालो ..... 





आणि थोडा अंतर कापताच सिद्धगडाच्या त्या दर्शनाने पुन्हा आनंदून गेलो ......
तो आनंद ओसंडून वाहत असतानाच पुन्हा एका आनंदाची त्यात भर पडली ती तिथे त्या निर्जन स्थळी भेटलेल्या त्या काकांची..............
तिथून मग खरा प्रवास सुरु झाला आमचा सिद्धगडाच्या दिशेने ......नेहमीच्या वाटेने

दुसरी आठवण
२)मनाला भेदरून सोडणाऱ्या त्या किकांळ्या आणि ती घबराट :
सिद्धगडहून भिमाशंकरला जाणारी ती जंगलातली पायवाट आणि त्या मार्गी जात असता घडलेला तो प्रसंग अजून लक्षात आहे....ताजा आहे .
आणि तेच आज मी तुम्हाला इथे कथन करणार आहे . ..सांगणार आहे .
तर मागील भागत आपण पाहिले ...कि कसे आम्ही वाट काढत काढत ...सिद्धगड च्या नेहमीच्या वाटेलां येऊन मिळालो.
तिथे ज्या निर्जन स्थळी जे काका भेटले त्यांनी आम्हाला गडावर जाणारी वाट दाखविली ...आणि ते स्वताहा काही अंतरा पर्यंत आमच्या सोबत आले .

तिथून पुढे काही वेळेतच दगडांच्या त्या राशी पार करत करत ..घाम गाळत गाळत आम्ही सिद्धगड च्या त्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो , अन थोडीशी विश्रांती घेऊन ,माझ्या डिजिटल कॅमेरातून आमच्या चौघांची एक आठवण म्हणून त्या दरवाजापाशी एक छानशी छबी घेतली .

अन पुढे सरसावलो .
दरवाज्यातून प्रवेश करत आम्ही मळलेल्या वाटेने वेडे वाकडे होत होत. मंदिरा जवळून सिद्धगड वाडीत पोहोचलो . (सिद्धगडा वरच वसली आहे ती सिद्धगडवाडी )


वाटेत आम्हास ''शर्मा नावाचा एक गृहस्थ '' दिसला 'तरुणच होता .
नुकताच तो भीमाशंकर करून कोंढवळ गावा मार्गी सिद्धगड ला आला होता आणि इथून मग गोरखगडाच्या दिशेने तो वाटचाल करणार होता.
 



एकटाच तो ....सोबत कुणी नाही . ..तरीही ३-४ दिवसाचे ट्रेक करायचा ..जंगलात रात्र काढायचा .मैलो नि मैल चालायचा ...त्याच ते धाडस खरच कौतुकास्पद होत.
घनदाट जंगलात..त्या किर्र किर्र आवजात ...निर्जन वस्तीत ...एकट्याने रात्र काढण ....म्हणजे खूपच मोठ धाडस आहे....ते चित्र डोळ्यासमोर आणताच अंगावर हि माझ्या काटा येतो .


नर्मदा परिक्रमा हि त्याने पूर्ण केली होती. त्याने मी तर भारावून गेलो होतो.
मागे मी मलंगगड ट्रेक केला होता ..''एकट्याने'' तो त्याच्याकडून मिळालेल्या त्या प्रेरणेनेच.
आमचा त्याच्याशी परिचय झाल्यानंतर तो ...त्याच्या मार्गी ..गोरख गडाच्या दिशेने निघाला.
नि आम्ही सिद्धगडवाडीत एका घराच्या मोकळ्या अंगणात ..त्या घरातील आजीला विचारून पाय मोकळे केले . नि लगेचच पाठपिशवीतील आमचे जेवणाचे डबे काढून जेवणावर ताव मारण्यास सुरवात केली.
माझ्या बहिणी बाईनी म्हणजेच संपदा ने मस्तपैकी इडली अन सोबत चटकदार चटणी आणली होती.




यतीन महराज ने घावन्या सारख काहीतरी पदार्थ आणले होत. (नाव आठवत नाही आता, पण खूपच चवीस्ट होत .). आणि रश्मी ने मस्तपैकी खिचडी भात . आणि अजून काहीतरी होत (ते हि आता आठवत नाही ) पण ...
सगळे कसे पोटभर जेवले . संपदाने आणलेल्या बर्यासच्या इडल्या मी एकट्यानेच फस्त केल्या. नि त्याचबरोबर इतरही पदार्थ संपवले . ....इतकी भूख लागली होती मला.. . (ह्यावरून पुढे बरेच असे गमतीचे क्षण घडले, 'जे मी तुम्हाला सांगणार नाही. 'नाहीतर बरसच माझ्या बद्दलच गुपित बाहेर पडायचं)
तर जेवण उरकल्यानन्तर काही वेळ विश्रांती करून आम्ही सिद्धगड वाडीतून बाहेर पडू लागलो.
खर तर आम्हाला सिद्धगडचा बालेकिल्ला हि सर करायचा होता ...पण वेळेच्या कमी मुळे आणि पुढे ३ ते ४ तासाची निर्जन वस्तीची जंगलातून पायपीट करायची असल्यामुळे . आणि काळोख्याच साम्राज्याचा विस्तार होण्याआधी वेळेत आमच्या स्थळी , आमच्या मुक्कामी पोहोचाण्य्साठी , वेळ न दवडता आम्ही निघू लागलो .
सिद्धगड वाडीत आम्ही पोहोचलो त्यावेळेस गावातला एकही कर्ता पुरुष गावात न्हवता. (आम्ही दोघे सोडून तसे आम्ही गावातले न्ह्वातोच म्हणा ). तर गावात शांतता होती. सुन्न करणारी ...
आमचे पाय गावातून सर सर करत बाहेर पडू लागले .....थोड्या वेळेतच आम्ही मंदिरापाशी पोहोचलो .तिथे एक दोन जण पुरुष मंडळी काम करत असताना दिसली . ...पुढे जात असता त्यांची नजर आम्हावर खिळली . आम्ही तसेच पुढे जावू लागलो आणि सिद्धगडाच्या त्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचलो.
इथून पुढे एक वाट जाते ती भीमाशंकर ला घनदाट अन निर्जन जंगलातून आणि एक वाट आलो त्या मार्गी म्हणजेच नारिवली गावात .
आम्ही भीमशंकर मार्गी निघू लागलो . आणि काही वेळेतच एका पठारापाशी येऊन पोहोचलो , तिथे काही शिल्पे आणि एक छोटास मंदिर होत . त्याच छायाचित्रण करून आणि दूरवरच ते सिद्धगडाच विलोभनीय दृश्य मनात साठवून आम्ही पावलो पाउली निघू लागलो.




वाटेतून जात असता आपला प्रवास सुखकर व्हावा यासाठी बरेच असे बाण कातळावर अथवा झाडीवर ओढीले आहेत. त्या बाणाच्या दिशेने आम्ही निघू लागलो.


आमच्या सगळ्यात पुढे यतीन साहेब होते त्यांनतर रश्मी आणि संपदा आणि सगळ्यात शेवटी मी .
असा आमचा क्रम ट्रेकच्या शेवट पर्यंत तसाच होता.
 
बराच वेळ निघून गेला .....आता घनदाट झाडीस सुरवात झाली होती ...सिद्धगड अजूनही डोक वर काढत जणू आम्हावर पहारा ठेवत होता. त्या निरव शांततेत .. रात किड्यांच्या किर्र किर्र ...अन पावलांचा चालण्याचा आवाज .आणि आम्ही चौघे मनुष्य प्राणी .....
हळू हळू पुढे कुणास ठाऊक ...मला भास होऊ लागला ..कि माझ्या मागून कुणीतरी येत आहे .
चर्र चर्र असा आवाज येऊ लागला . मागे वळून पाहिल्यास कुणी दिसत न्हवत . कुणीतरी आपला मागे लक्ष ठेवून आहे, अस सतत भासत होत,
मनात एक प्रकारे घबराटीचे सावट पसरू लागल होत. मला भास होत होता कि ...कुणी होत तिथे .....माहित नाही
संरक्षणासाठी तसं प्रत्येका कडे हत्यार होतच . ते बाहेरच काढूनच ठेवलं होत.
कुणास ठाऊक ह्या घनदाट निर्जन जंगलात काय कधी घडेल . ......आम्ही होतो तेही चौघेच . दोन मुल अन दोन मुली.
थोड्या वेळाने एक खोल दरीला वळसा घेत आम्ही थोड्या पुढे आलो नि ....त्या एका क्षणाने स्तंभित झालो.






आनंदाला उधाण आला ..............जे मी पुस्तकात वाचलं होत.(शेकरू - रणजीत देसाई ) ते प्रत्यक्षात अनुभवत होतो.
शेकरू ...खारी सारखा पण खारी पेक्षा हि मोठा असा हा प्राणी टूणटूण फांद्या फांद्यावर उड्या घेत , एका मागो माग एक असे ते दोन शेकरू आमच्या समोर झाडीच्या त्या उंच शेंडीवर बागडत मस्ती करत जात होते . त्यांच्या त्या यथार्थ दर्शनाने आम्ही सुखावलो.
आणि त्याच आनंदात पुढे जात असता ................ते क्षण डोळ्यात तरळत असता.
एका विचित्र आवाजाने, त्या किंकाळीने मन सैरा वैरा झाले . काहीच कळेनास झाल . पाउल तिथेच जागीच थबकली . श्रवण ग्रंथी अन नजरां चुहीकडे त्या आवाजाच्या दिशेने घुमू लागल्या ,
त्या कुणा मनुष्य व्यक्तीच्या किंकाळ्या होत्या , त्या किंकाळ्या त्या निरव शांततेत अजून भयग्रस्त वाटत होत्या . तो भयानक आवाज चारी दिशांना घुंगावत होता . मनाचा थरकाप उडवत होता .
दूर वर दिसणाऱ्या त्या मंदिरा जवळून तो आवाज येत होता. अस आम्ही गृहीत धरल . अन इथून त्वरित निघायला हव म्हणून ...पटा पटा पाऊल उचलू लागलो अन कोंढवळ गावाच्या दिशेने भीमशंकर च्या वाटेने त्या घनदाट निर्जन जंगलातून पुढे पुढे चालू लागलो.





काही तासानंतर आम्ही पठारावर सुखरूप पोहोचलो, इथून पुढे कोंढवळ गाव काहीच अंतरावर होत. आम्ही जात असता एक ५-६ जणांचा पुण्याचा ग्रुप आम्हाला दिसला .

सगळी वयस्कर मंडळी होती . रात्री मुक्कामी होती सिद्धगड ला आता कोंढवळ गावात मुक्कामी जाणार होती.
आम्ही हि त्याच मार्गी असल्यामुळे आम्ही त्यांच्यात मिसळून गेलो . एकमेकांची ओळख झाली अन बोलत बोलत चालत चालत आम्ही कोंढवळ गावात पोहोचलो ते साधारण सायंकाळी ६:३० वाजता .
रस्त्याततून बोलत बोलत त्या ग्रुप मधील काकांनी (पाउने तीनशे किल्ले सर केलेलं काका ) नाव आठवत नाही आता , पण त्याच्याकडून आम्हाला सर्व हकीकत कळली . जी त्या भयग्रस्त आवाजाशी निगडीत होती.
घडल होत काय ...तर गावातील सारी पुरुष मंडळी त्या मंदिरा जवळ (गावापासून जरा दूर असलेल्या मंदिरापाशी )एकत्र जमली होती ...ती शिकारी साठी ...शिकार जाळ्यात फासण्यासाठी , आणि त्यासाठी ते असे चित्र विचित्र आवाज काढत अन किंकाळत होते.
पण ते माहित नसल्यामुळे आमचा मात्र त्या निर्जन स्थळी भर जंगलात मनाचा थरकाप उडाला होता.
तर अशी हि गोष्ट ...खरी खुरी जी आमच्या ट्रेक दरम्यान घडली होती.
आणि अशा त्या क्षणांन मुळे आमचा हा ट्रेक यादगार ठरला होता. ..नि आहे .
तसं अजून बऱ्याच आठवणी बाकी आहेत . ते तुम्हाला मी नन्तर सांगेन .
धन्यवाद ...!!!!!

संकेत य पाटेकर