शनिवार, १३ ऑगस्ट, २०१६

गर्द वनातील त्रिकुट _ महिपतगड _सुमारगड आणि रसाळगड





नभा नभातुनी 
दऱ्या खोऱ्यांतुनि   
गर्जितो माझा सह्याद्री ...!!

दिशा दिशांना 
साद घालूनी 
पुलकित होतो सह्याद्री ...!!!
    
मी निसंर्ग प्रेमी आहे अन सह्य वेडा हि..अन  म्हणूनच  सह्याद्रीत वारेमाप भटकताना मी स्वतः असा विरून जातो . प्रेरित इतिहासाची अन भौगोलिक दुनियाची सांगड घालत. 
तर कधी ह्या सृष्टी सौंदर्याने  नटाटलेल्या निसर्गाशी एकरूप होतं त्याच्याशी हितगुज करतं  ...
महिपतगड _सुमारगड आणि रसाळगड हि अशीच आमची एक सुंदर, गर्द वनातलि त्रिकुट मोहीम ...चार मित्रांसमवेत, ३ दिवस  अनुभवलेली . 
चला तर मग त्या अनुभवाची शिदोरी तुमच्या पुढे उघड करतो ...





















२०१५ , नोव्हेंबर  सरला ,  डिसेंबर महिना उजाडला .  सालाबादप्रमाणे  इंग्रजी महिन्याच्या वर्षा अखेरीस , सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात भटकंती करण्याचे आमचे स्वप्नं मनी वेध घेऊ लागले . 
कुठे जायचं ह्याचा  ठराव पास  झाला . हळूहळू एकेक माहिती जमा  होऊ लागली. 
त्यावर मित्रांची बैठक झाली. काय , कस जायचं ह्यावर चर्चा रंगली . वेळ खर्चाचा अंदाज मांडला गेला. 
जाण्यावर अन तारखेवर शिक्कामोर्तब झाले.     
अन पाठीवर ओजड अशी  सक्क लादून , आम्हा ४ मित्रांची फौज ३१ तारखेच्या रात्री कोकण कन्या च्या संगतीने  खेड च्या प्रवासाला  वारेमाप निघाली. गर्द  वनातील त्रिकुट  सर करायला. 
त्याच नाव  महिपतगड _सुमारगड आणि रसाळगड .  

(दहिवली तून ....बेलदार वाडीत येत असता ..टिपलेला फोटो ...)



















रत्नागिरी जिल्ह्यातल्या  खेड तालुक्याच्या पूर्वेस , साधरण २०-२५ किमी दूर, सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर अशी  उभी असलेलेली हि गर्द वनातील डोंगर रांग ..म्हणजेच महिपतगड _सुमारगड आणि रसाळगड . 


















नित्य नेहमी सह्याद्रीत वणवण भटकणारे  अन वेग वेगळ्या वाटा  धुंडाळनारे  ट्रेकर्स मंडळी इथे हमखास भेट 
देऊन जातात.   पण इतर  कुणी इथे फिरकत नाही . अपवाद काय तो रसाळ गडाचा. कारण तिथपर्यंत आता थेट गाडी रस्ता झाल्याने , पायथ्याशी वाहनं हि नेता येतात .  त्यामुळे जाणं येण सहज सोपं  अन आरामदायी झालं आहे . किल्ला हि म्हणावा तसा छोटेखानी पण देखणा  असल्याने  इथे पर्यटकांचा ओघ तसा अधून मधून होतच असतो. . आम्हाला  आमच्या ट्रेकची सांगता ह्याच  रसाळ वाणी  किल्ल्यांनी करायची होती. म्हणून आम्ही थोडी वेगळी वाट धरली. 
मुळात इथे येण्याआधीच आमचा तसा प्लान ठरला  होता . 
भले खेड पासून रसाळगड - सुमारगड  - महिपतगड ,असा दुर्गक्रम असला तरी आमची सुरवात 
महिपतगड पासून होणार होती . त्यासाठी दहिवली हे महीपत गडाच्या पायथ्याचे गाव गाठायचे होते. 
तेथून सुमारे  साडे तिन तासाची उभी चढणीची पायपीट  आम्हाला बेलदार वाडीत घेऊन जाणार होती. 
बेलदार हि साधारण पंधरा एक घरांची मिळून असलेली टुमदार वाडी. येथून किल्ला गाठण्यास साधरण पाऊन एक तास लागतो. 
 दुसरी एक वाट  म्हणजे   वाडी जैतापूर (मांडवा ) मार्गे  ,  सरळ सोपी वाट ..येथून हि बेलदार वाडीत पोहचता येते. आता तर येथून अर्ध्यापर्यंत गाडी रस्ता आला आहे . त्यामुळे येथून जाणे म्हणजे  वेळेची अन शारीरिक उर्जेची बचतच म्हणावी लागेल. 

तर कोकण कन्याच्या सुसाट हवेशीर प्रवासाने आम्ही खेड गाठलं.   तेंव्हा २०१५ ची सांगता होऊन 
२०१६ ह्या इंग्रजी नवं वर्षाची सुरवात झाली होती. पहाटेचा अंधार मात्र अजूनही गडद रंगाने न्हाहून  निघाला होता. सूर्य नारायणाची कोवळी साज अजूनही क्षितिजाशी उधळली न्हवती. 
पहाटेचे तसे साडे पाचच  वाजले होते . पण साडेपाच च्या सुमारास सुटणारी दहिवली एसटी मात्र अजूनही गैरहजर होती. म्हणून तिच्या अनुपस्थितच  , तोपर्यंत तिथल्याच एका हॉटेल मध्ये आम्ही थोडफार खाऊ पिउ घेतलं . आणि साधारण सव्वा सहाच्या सुमारास  एसटीच  आगमन होताच , एसटी दिशेने  धाव घेतं. आत शिरकाव करत जागा   मिळेल तिथे आम्ही आसनस्थ झालो. 

तशी एसटीत तुरळकच  माणसं होती.  मुंबई  वरून काही दाखल झालेली.  आप्तजणांच्या  भेटीसाठी, कुणी कुठल्याश्या कामासाठी , आम्ही मात्र मुद्दाम वेडी वाकडी वाट करत किल्ले भ्रमंती साठी निघालो  होतो. 
बस्स अजून , काही क्षणाचा  अवधी होता.  महीपतगडाच्या दर्शनासाठी मन आसुसलं  होतं .   
साधारण १ तासाचा हा पल्ला , हा  एसटी प्रवास , आम्हाला आमच्या मुक्कामी म्हणजेच दहिवलीला घेऊन जात होता.  तिथून पुढचा पायी प्रवास ...ठरलेला. 

दहिवली  -  लहान मोठ्या वाड्यांचे मिळून असलेलं एक  गावं . 
आम्ही साधारण  सव्वा सात च्या ठोक्याला , कुडकुडतच दहिवली गावात पोहाचलो.  
तेंव्हा सुर्य नारायणाची कोवळी किरणं हि  एव्हाना भूतळावर दाखल झाली होती. 
साऱ्या सृष्टीची दिनचर्या , उगवत्या  त्या सूर्य नारायणाला जणू  वंदन करत सूर खेळू लागलेली.  
पाखरांची मंजुळ शिळ मनाशी सौख्य उजळत होती.  
हळूहळू गाढ निद्रा अवस्थेतून लोकं हि  जागे होत  आप आपल्या कामास जुंपत होते. 
कौलारू घरांच्या एकेक वाड्यांनी वसलेलं हे गाव . फारचं   देखण अन सुंदर दिसत होतं. 

दहिवली - हे म्हणावं तर  लहान मोठ्या वाड्यांचे मिळून असलेलं एक  गावं . 
इथले ग्रामस्थ म्हणजे शेलार - मोरे आणि इतर जण . दळणवळणाच त्याचं साधन म्हणजे हि  एसटी आणि  काही  खाजगी वाहन. भात इथला मुख्य पीक , वर्षभरातुन तो  एकदा घेतला  जातो. 
असं तिथल्या ग्रामस्थांकडून कळलं.   असो , 

सकाळी 7 दरम्यान आम्ही एसटीतून  दहिवलीत उतरलो . काळोख्या नजरेतून आमची आता सुटका झाली होती. प्रकाशधारा दिसू लागल्या होत्या . आभाळ कसं मोकळं होतं. गारवा फैलून होता .  एक  मोकळा श्वास घेत आम्ही इकडं  तिकडं जरा नजरानजर केली. काही ग्रामस्थ मंडळी उभी दिसली. त्यांच्याशी चौकशी करावयास म्हणून गेलो.  
किल्ल्याची वाट कोणती हो ? तेंव्हा ते आमचं बोलण ऐकून , एसटी तून उतरल्यांपैकी एकाने ..चला या माझ्यासोबत म्हणून. पथपरेड सुरु केली. 
त्यांच्या बरोबरीने  आम्ही हि चालू लागलो. चालता  चालता, एकमेकांची ओळख झाली . 
नाव  : उमेश मोरे , वरच्या शेलार वाडीतले.   मुंबईतून   शक्ती तुराच्या कार्यक्रमासाठी आज विशेष करून ह्याचं येन झालं होतं . शाहीर असल्याने त्यांचाच तो  कार्यक्रम होता. त्यांनी आयोजित केलेला. 
संध्याकाळी सात च्या सुमारास ...इथल्याच कुणा एका गावात तो कार्यक्रम ठरलेला. त्यासाठी त्यांनी  आम्हाला हि येण्याचं आमंत्रण दिलं . पण ते काही आम्हाला शक्य न्हवतं. 
महीपतगडाची ओढ अधिकच खुणावू लागली होती .  घोड्यांच्या टापांनी  पाय आता घौड दौड करू लागले होते.

दहिवली गावातुनाच सरळ उजवीकडच्या हाताला वळसा घेत , 
थोडा उंचवटा चढत आम्ही पुढे सरू लागलो. उमेश मोरेंच्याच एका ओळखी ठिकाणी , आग्रहातर आम्ही चहा पान घेतलं. अन क्षणभराच्या विश्रांती नंतर  पुन्हा नव्या दमानं आमच्या  मार्गीस्त लागलो. 

दहिवली गावातून साधारण  १५-२० मिनिटाच्या पायपीटा नंतर, थोडा उंचवटा गाठल्यावर शेलार वाडी लागते.  तिथूनच पुढची पायवाट आहे . 
उमेश मोरेंनी आम्हास  एका टेकडापर्यंत मार्ग दाखवला. आणि आणि आल्या मार्गी ते पुन्हा  माघारी  परतले.  आता येथून पुढे आम्हालाच आमची पायवाट शोधावि लागणार होती. 
काही क्षण तिथेच बागा टाकून आम्ही क्षणभर  विसावलो . सभोवतालाच्या  शांततेची एकरूप होतं.   
आणि पुन्हा मार्गीस्थ झाली . 

गर्द रानातली सुकलेली पानवळ सर्वत्र  अस्ताव्यस्त  अशी पसरलेली. 
त्या पानवळी तून चालताना करकर असा नादब्रम्ह होई. तेंव्हा ह्या मातीशी  निष्ठा राखून, आपलं अस्तित्व मिटेपर्यंत झगडणाऱ्या त्या सुकल्या पानांची कथा अगदी  नव्यानेच  जन्म घेई. 
अन मनाला जगण्याचा मर्म सांगू जाई . 
निसर्गातील प्रत्येक घटक  हा तसा जगण्याचा एक मूळमंत्रच  आहे. त्याकडे डोळसपणे पाहिलं कि ते स्वतःउन उमगून येतं . 
वेड्या वाकड्या वाटे आम्ही पुढे चालत होतो . अधून मधून कुठल्याश्या पाखरांचा मंजुळ स्वर कानी पडत होतं . वाऱ्याची झुळूक हि घामजलेल्या अंगाला सुखद असा स्पर्श करून जाई....  
जणू निसर्गातील ममत्वेचा हा हळुवार स्पर्शच ... 
अंगातला क्षीण अश्याने कुठल्या कुठे निघून जात होता. 

चालता चालता आम्ही  एकमेकांशी बोलत होतो . मधेच शांत होतं होतो . निसर्गाच्या चमत्कारीत घटकांचा  कानोसा घेत. आम्ही आता एका टेकडावर येउन पोहोचलो.  महीपतगडचा  येथून विहिन्ग्मय अस दृश्य नजरेस भरलं. तासाभराची हि पायपीट खरंच सुखाचं क्षण देऊन गेली.  कॅमेरातही ते क्षण बंदिस्त करून घेतले  अन पुन्हा पायीपिट  सुरु केली. 

साधारण तीन ते साडे तीन तासाची तंगडतोड केल्यावर , चढ उतार करत आम्ही , कुठे , बेलदार वाडीत येउन पोहोचलो. 

बेलदार वाडी - हि पंधरा एका घरांची , निसर्गसंपन्न अन डोंगरांनी दरयांनी वेढलेली अशी हि डौलदार वाडी. 
तिथे शिरकाव करण्याआधी  गावाच्या वेशीवर  ग्रामस्थ शंकर पवार ह्या आजोबां ची आमची गाठभेट झाली. तेंव्हा चालता बोलता  त्यांच्यासोबतच  त्याचं घर गाठलं . 

शेणा मातिनी सारवलेलं ते  कुड्याचं  घर,  फारच देखण असं .  प्रवेश करताच आजींनी अगदी आपलेपणानं स्वागत केलं .  
नुकताच शेणानं  सारवलेल ते अंगण  , .उन्हं लागू नये म्हणून केलेली बाबूंची आरास अन त्यावर फांद्या पानांनी झाकाळलेलं मांडव ....आणि मोकळ्यावळानं भिरभिरनारं उनाड वारं... अन त्यानं  होणार गुंज ..

हे पाहून अन स्पर्शून आम्ही तिथेच बैठक मारली. अन मोकळे झालो. 
तीन साडे तीन तासाचा आलेला तो  थकवा त्याने कुठल्या कुठल्या उडून गेला ते कळलच नाही. पण पोटी  भुकेचे कावळे  मात्र आग धरून होते.  तेंव्हा  त्यांना शांत करण्यास आम्ही पुढाकार घेतला. 
सोबत  जे काही आणलं होतं ते बाहेर काढलं आणि हादडण्यास सुरवात केली. 
आंबोली काय, खोबऱ्या अन  लसणीची  चटणी काय, बटाट्याची  भाजी काय , गरम गरम आजीनी दिलेली भाकरी काय , पोट अगदी तृप्त झालं हो .  

साधारण दोन तास आम्ही आजोबांच्या मोकळ्या अंगणात मुक्काम धरून होतो.  आजी आजोबांकडून जे ऐकीव (किल्ल्या विषयी इतर गोष्टी विषयी ) मिळतंय ते ऐकत होतो. 
त्यात सुमार गडाच्या  घडलेल्या दुर्घटना , त्याची कठीणाई .., जाणार बिकट वाट , महीपत गडाची पाय  वाट ..प्राणी , जंगल , मंदिर, होणारा उत्सव , ह्या त्या गोष्टीवर चर्चा रंगली. . आजी आजोबांनी जे जे ठाव ते ते त्यांनी मोकळेपणाने  सांगितले. आम्ही ते अधीरतेने ऐकून घेतलं. मनात साठवून घेतलं . 

आणि काही क्षण तिथे  निवांत पडून राहिलो. 

क्रमश : पुढचा भाग लवकरच ...सुंदरश्या छायाचित्रासहित ...
आपलाच , 
संकेत पाटेकर 

************************************************************


बेलदार (साधारण पंधरा एक घरांची कौलारू वाडी ) वाडी. 
महीपत गडाच्या पायथ्याशी वसलेलं हे एक चिमुकल गाव . गावात सहजा कुणी तरुण मंडळी दिसणार नाहीत. जे कुणी आहेत ती सगळे मुंबईत ..कामासाठी स्थायिक झालेली . त्यामुळे सगळी वयस्कर माणसं तेवढी इथे आहेत. 
आम्ही जिथे उतरलो अन विसावलो ते शंकर पवारांचं घर ...
आजीनी न सांगता मस्त गरमा गरम भाकऱ्या , चटणी , आणि जग भरून दही जेवणाकरिता म्हणून पुढ्यात ठेवले . आमच्या सोबत इतर पदार्थ होतेच , 
थेपले काय , ढोसे काय , खोबरयाची चटणी काय , पुरण पोळी काय ...पोट अगदी तृप्त झालं. ...























ते जादुई क्षण ..
महिपतगडाच्या रानावनातून जेव्हा आम्ही मार्ग काढत पारेश्वर मंदिरा दिशेन जावू लागलो. तेंव्हा झाडी- वेलींनी वेढलेल्या त्या गर्द वाटेवर एक अचंबित करणारी , कधी हि न अनुभवलेली एक जादुई घटना घडली.
हो जादुईच म्हणावी लागेल. कारण ते क्षणच फार वेगळे होते . एका वेगळ्या दुनियेत आलोय असे भासवणारे ते क्षण , ' म्हणजे एकाच वेळी, एकाच जातीचे, हजारोंच्या संख्येने रंगधवल फुलपाखरू आपल्या सभोवताली , चहु दिशा भिर-भिरतायेत.. अन आपण ते पाहून अचंबित होतोय. असे..

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या , 'कट्ट्यावर काळजात घुसली' ह्या चित्रपटातील ते गाण आहे ना एक ..
ज्यात हजारोंच्या संख्येने काजवे जमा होऊ लागतात , तसाच अगदी क्षण ..भारावून अन मंत्रमुग्ध करणारा...
अश्या काही आगळ्या वेगळ्या क्षणांनीच आमच्या ह्या मोहिमेला खरी रंगत चढली .
फुल पाखरांची ओळख म्हणावी तर ...
.मराठीत - भटक्या अन इंग्रजीत - Common wanderer..
बरोबर ???


चहू कडनं किर्र जंगलांनी वेढलेला.. आणि वन्य प्राण्यांची चाहूल असलेला हा महिपतगड 
(आसपासचा संपूर्ण परिसर ) ....अन त्यात राहण्याजोग एकमेव पण उत्तम अन प्रशस्त ठिकाण म्हणजे पारेश्वर मंदिर , आमच्यासाठी एक वेगळा अनुभव होता. 
एवढ्या जंगलात आम्हा चार मित्रांची मित्रावळ ...( मी , यतिन , अनुराग अन आमचं प्रेमळ कार्ट कला ;) अन ती जागृत अवस्थेतील अनुभवलेली रात्र ...केवळ अविस्मरणीय ...

बिबट्याचा अन इतर वन्य प्राण्यांचा वावर ..म्हणून आधीच बाळगलेली सावधगिरी.
रात्रीच एकट्याने बाहेर पडायचं नाही . हाती काठी असलीच पाहिजे..वगैरे वगैरे ..

मंदिरात विजेचा प्रवाह चालू असल्याने तसा काही प्रश्न न्हवता . मंदिरा समोरच विहीर, त्यामुळे पाणी हि मुबलक , तरीही साडे सात वाजेपर्यंत आम्ही जेवण बनवून अन खाऊन पिउन मोकळे झालो. आणि तसेच झोपी गेलो .
झोप म्हणावी तशी न्हवतीच कुणाला ..घोरण्याची बुलेट जी सुरु होती कुणा एकाची..त्यामुळे आसपास कुणा वन्य प्राणी फिरकला असेलच तरी तो त्या आवाजाने घाबरून पळाला असावा ...असा आमचा समज ....
पण एक मात्र होतं पहाटे ४ वाजता दरवाज्यावर जी काही टकटक सुरु झाली त्याने मात्र नजर सगळी त्या दरवाज्यावर एकवटली होती . साधारण पंधरा एक मिनिट तो आवाज सुरु होता....उजवीकडून डावीकडे ...डावीकडे उजवीकडे ...कुठला प्राणी होता देव जाणे . त्यामुळे सावध होतो .

गाव करण्यांनी तसं सांगितल होत तशी काही भीती नाही . बिबट्या दिसलाच तर तो तुमचा नशीब समजां ..























चेहरा बरंच काही बोलून जातो .....
महीपत गडाच्या पारेश्वर मंदिरात रात्र काढून जेंव्हा आम्ही सकाळी बेलदार वाडीत पोहोचलो तेंव्हा बिबट्या विषयी चर्चा सुरु होती . 
रात्री दडा धरून बसलेल्या त्या बिबट्याने एका गायीच्या वासराचा नुकताच जीव घेतला होता. 
अन त्याच्याच भाव छटा चेहऱ्यावर अश्या उमटून दिसत होत्या ....
 



राया धनगराच घर ....
बेलदार वाडीपासून ....वीस पंचवीस मिनिटाची पायपीट करत आम्ही ह्या झापशी पोहोचलो .सुंदर नितांत अन रमणीय अस हे ठिकाण , आम्ही पोहचलो तेंव्हा तिथे कुणीही न्हवते . 
राया धनगराच हे झाप . ह्यांचा उल्लेख एका ब्लॉग मध्ये वाचला होता . 
तसेच २०-२५ वर्षाच्या पुस्तकातही त्यांचा उल्लेख आहे अस त्यात नामदर्शित केल होतं. 
पण आम्हाला त्यांच्या भेटीचा योग काही जुळून आला नाही .
तेंव्हा तिथे एक छबी घेतली.
आमच्या सोबत होते ते सीताराम जाधव काका (ह्यांचा हि उल्लेख एका ब्लॉग मध्ये वाचला होता )
महीपत गडाला प्रस्थान करण्या आधी त्यांना भेटून आमच्या पुढच्या प्रवासाबद्दल त्यानं सांगितले होते.
त्यांना तशी विनंती केली होती . आमच्या सोबत येणार का म्हणून ...आणि त्यांनी लगेच हो म्हटल होत . आणि त्याप्रमाणे दुसर्या दिवशी सकाळी ते आमच्यासोबत वाट धरू लागले.

महीपत गड ते रसाळ गड (सुमारगड सर करून ) हे अंतर घनदाट झाडीतून वळण घेत ..
साधारण ८ ते ९ तासाच आहे . आणि ते सोबत कुणी माहितीगार असल्याशिवाय पार करण अशक्य आहे . इतक ते घनदाट जंगल आहे.
आम्हाला ह्या काकांनी पार रसाळ गडा पर्यंत पोहोचत केलं. म्हणून लवकर अन वेळेत पोहोचता आलं.
 


























सुमार गडाचा साधारण पन्नास फुटी उंचावलेला कातळ टप्पा जिथे सुरु होतो ...
तिथे क्षणभर घेतलेली विश्रांती अन ग्रुप फोटो .. 


























सुमार गडावरील एका निवांत क्षणी ..

असे निवांत क्षण मला नेहमीच हवे असतात.. 






















सुमार गडाच्या माथ्याशी ...निवांत क्षणी ...
डावीकडे दिसतोय तो मधु मकरंद गड ....
३ एक वर्षापूर्वी तिथे हि जाण्याचा योग जुळून आला होता . 
त्यामुळे जवळ जवळ हि रांग आता माझी पूर्ण झाली. अस मी म्हणेन...;) 
(वासोटा - मकरंद गड - पर्बत (हुकेलेला ) महिमंडन गड - चकदेव -रसाळ गड - सुमार गड - महिपतगड ...)























सुमार गड ....
नित्य नेहमी आपल्या सह्याद्रीच्या कडे कपारयातुनी भटकणाऱ्या भटक्यांसाठी सुमार गड तस काही अवघड नाही . पण टोकावरचा साधारण ५० फुट उंचावलेला कातळ कडा मात्र सांभाळूनच चढावा अन उतरवा लागतो .
दहिवली वरून जेंव्हा बेलदार वाडीत आम्ही पोहोचलो तेंव्हा आमच्या पुढच्या प्रवासाबद्दल गावकर्यांना सांगितले तेंव्हा त्यांनी घडलेल्या घटना आमच्या पुढे मांडल्या. आणि सावध केले .
काही महिन्या पूर्वी ..एका मुलीचा सुमारगडचा हा कातळकडा उतरत असता ..तोल गेला .
आणि तिचा हाताला बरीच दुखापत झाली . तिला गावकर्यांनी उचलून बेलदार वाडीत आणले अन तिथून मग पुढे वाडी जैतापुराला नेण्यात आले.
दुसरी एक घटना काही वर्षा पूर्वी घडली होती . त्यात बिचारा एक दगावला होता .
सह्याद्रीत भटकताना कितीही आत्मविश्वास असला तरी सावधगिरी बाळगणे जरुरीचे असते.
सह्याद्री जितका रूपसुंदर आहे तितकाच तो रौद्र रूप हि धारण करतो . तेंव्हा त्यापुढे नतमस्तक होवूनच जावे.

























सुमारगड सर करायचा असेल तर अशी अनवट वेडी वाट हि पत्करावी लागते. 
सांभाळून ..सावरून..
आमच्या अनुरागला आम्हासोबत अश्या कितीतरी कसरती कराव्या लागल्या . त्यातलाच एक क्षण ... 


























महीपत गडावरची ती मंतरलेली रात्र अनुभवून ...
आम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हात गड उतरलो अन बेलदार वाडीत येऊन पोहचलो .तिथे बिबट्याने केलेल्या रात्रीतल्या त्या हल्ल्याची ती जखमी बातमी ऐकून आणि ती गावभराची शांतता अनुभवून पुन्हा सुमारगड च्या वेलोट्या वाटेकडे निघालो. . सुमारगडाची काहीशी अवघड टप्प्यावरची ती वाट चढून किल्ला सर केला. अन दुपारच्या १२ च्या टोळ्यास ....रसाळगडला जाणाऱ्या खिंडी पाशी येऊन विसावलो . ते काही मस्तीतले क्षण ...

चार मित्र _ तीन किल्ले_महीपत - सुमार- रसाळगड मोहीम
 .. 




























''बाळांनो , शूज वगैरेच इथेच काढून जा'' 
साधारण ५० फुटी उभ्या कातळाची ती चढ , थोडी अवघड असल्याकारणाने , सीताराम काकांच्या शब्दाला मान देऊन ,आम्ही अनवाणी पायीच सुमारगडाचा संपूर्ण माथा पिंजून काढला.
सुमारगडाचा माथा तसा लहानच , त्यामुळे फारसा वेळ काही लागला नाही.
पाण्याच्या टाक्या ,मंदिरं , नितांत सुंदर परिसर , आणि काही दुर्ग अवषेश पाहून ,
आल्या त्या मार्गे आम्ही पुन्हा हळुवार उतरवून रसाळगडाच्या मार्गे लागलो.

महीपत- रसाळ ह्या खिंडीपासून साधारण दीड एक तास , उतार वळणाची रानवाट पायी तुडवत , आम्ही सुमारगडाला वळसा दिला. अन ह्या इथवर येउन पोहोचलो.
त्यावेळेस दुपारचा साधारण दीड एक वाजला होता.
सुर्य डोक्यावर आग ओकू लागलेला अन त्यात भुकेची आग पोटी उसळण घेत होती.
पण अजूनही दूरचा पल्ला होता.
त्यामुळे सटर फटर जे काही होतं. (खजूर , केळ्याचे वेफर्स वगैरे ) ते खाउन- घेऊन ....पोटाची तृष्णा थोडक्यात भागवली .
आणि एकूणच १५ मिनिटाचा हा मोठा HALT घेऊन , नव्या दमानं आम्ही रसाळगडाच्या मार्गी लागलो.

अजून काही :
साधारण ९ एक वर्षा पुर्वी , काकांच्या म्हणण्या नुसार , इथे ह्या वाटे ,सुमारगड सर करत असता. एकाने मृत्यू ओढवला होता.

त्यामुळे सह्याद्रीत कुठेही भटकताना घाई करू नका. कातळ टप्पे अन अवघड वाटा चढत असताना हवा तितका वेळ घ्या. पण सांभाळून , स्वतःला सावरून , तिथे अति आत्मविश्वास नको.

क्षणभर विश्रांती _रसाळगड वाटे....

  ...
























सुमार गडाच्या पायथ्यापासून ..साधारण अडीच तीन तासाची घनदाट रानवनातील , आडवळणाची वाट पायी तुडवल्यावर रसाळ गडाची सुंदरता दुरूनच अशी नजरेत भरली . त्याच्या नुसत्या दर्शनान आमचं थकलेलं तहानलेल मन अगदी तृप्त झालं. 
समोर दिसतोय तो रसाळगड ..त्याच मनोमन दर्शन घेत असता ....मित्रावळ आणि सीताराम काका .. 


























डागडूजी करण्यात आलेला मुख्य दरवाजा 

किल्ले_ रसाळगड ..























महीपतगडाच्या पारेश्वर मंदिरातून सकाळच्या साडे सात ते पाऊणे आठच्या सुमारास पाठीवर ओजड अशी Sack लेवून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. 

हा प्रवास तसा दमछाक करणार असणार होता . कारण साधारण आठ ते नऊ तासाची पायपीट...रसाळ गडाच्या मुक्कामी जाईपर्यंत होणार होती (अर्थात सुमारगड सर करून )त्यामुळे पटपट पाउलं पुढे सरे..

महीपत गडाच्या पायथ्याशी असलेल्या बेलदार वाडीतून जाधव काकांना आम्ही सोबत घेतलं.
अन रानावनातल्या वेड्या वळणदार पायवाटेशी संगत करत (सुमारगड सर करून ) .आम्ही साधारण दुपारच्या साडेतीन , पाउने चारच्या आसपास रसाळवाडीत पोहोचलो.
इतकी पायपीट झाल्यावर साहजिकच तिथल्याच एका अंगणात अंग टाकून ..थोडा विसावलो .
अन थोडं फ्रेश- रेफ्रेश होता , काही खाऊन पीऊन आम्ही रसाळगडच्या एक एक अश्या पायऱ्या चढू लागलो .

आजचा मुक्काम हा रसाळ अश्या ह्या गडावरच असणार होता. मावळतीच्या सोनसळी किरणांच्या स्पर्शाने मन आज भारावून जाणार होतं. त्यामुळे अंगातला क्षीण कुठ्या कुठे निघून गेला होता. मन चैतन्यानं झुलू लागलं होतं .
- संकेत
किल्ले _ रसाळगड...

























सांज संध्या ...
हे माझे आवडीचे क्षण .......मी सहसा कधीच सोडत नाही . 
टकमक नजरेने , निरव शांततेत ..क्षितिजाच्या ह्या रंग छटा पाहण अन सृष्टीचं बदलतं रूप न्याहाळण हा आगळा वेगळा सोहळाच असतो . मनाला चिरतरुण करणारा ..! 
रसाळगड वरील सांजक्षितिजाची वेळ....अन ध्यानस्थ झालेले मित्र ... 























































पहाटेचे जग ....
सांजवेळी क्षितिजाशी जसं एकाग्री मनानं पहात राहावं , ते क्षितीज रूप नजरेत साठवावं तसंच अगदी पहाटे ..तेजपुंज वलयांकित तारकांना न्याहाळत, हे सृष्टी रूप मनी वठवून घेणं हा हि एक माझा आवडीचा सोहळा..., सह्याद्रीच्या गड माथ्यावरनं अस क्षण अनुभवनं ह्या सारखं सुख नाही . 
किल्ले रसाळगड - मंदिरा समोरील दिपमाळ. 
एक सुंदर , देखणा अन नावाप्रमाणेच रसाळ असा हा किल्ला.
ट्रेक ची सांगता आमची ह्या गडाने झाली. म्हणजे ती आखल्याप्रमाणे आम्ही तशी केली . 
निरव शांततेचे पडघम सुरु असता टिपलेला हा फोटो... 




सृष्टी सौदर्य
अश्या किल्ल्यावर एक दिवस एक रात्र अनुभवायला मिळणं म्हणजे........आम्ही तो अनुभव घेतला . 
किल्ले रसाळगड _सभोवताल _जगबुडीचे खोरं...

























          उगवत्या सुर्य नारायणा सोबत सृष्टीचं हे रूपं हि कसं उजळून निघत न्हाई...!!
निसर्गाची हि अशी विविध  रूपं नकळत एक शिकवून देऊन जातात हो .. 
कसं जगावं. कसं असावं ..कसं हसावं. _रसाळ गडावरून टिपलेला फोटो_जगबुडीचे खोरं...


मी निसंर्ग प्रेमी आहे अन सह्य वेडा हि.. म्हणून सह्याद्रीत असं वारेमाप भटकताना मी स्वतः असा विरून जातो . 
प्रेरित इतिहासाची अन भौगोलिक दुनियाची सांगड घालत....
तर कधी ह्या सृष्टी सौंदर्याने नटलेल्या निसर्गाशी एकरूप होतं , 
त्याच्याशी गुजगोष्टी करत. किल्ले _रसाळगड..


झाला...परतीचा प्रवास सुरु झाला ..
रसाळगडाच्या तट बंदीवरून दूरवर नजर फिरवली तेंव्हा इवल्याश्या चिमटीत मावेल इतपत गाव नजरेस दिसत होतं. त्या गावाचं नाव निमणी ..तिथेच दुपारची १२ जी खेडला जाणारी एसटी आम्हाला मिळणार होती. 
वळणा वळणाचा रस्ता त्या गावाजवळ घेऊन जाणार होता . साधारण अर्धा पाऊन तासाची पायपीट हि होणारच होती. . म्हणून दंगा मस्ती करत आम्ही असे पळत सुटलो .
तसं आम्ही म्हणता येणार नाही.. मी  आणि अनुराग सोडता ..
कला आणि यातीनच काय ते ...;)
त्यावेळेस टिपलेला क्षण....                                                                                                                                                        




















.......एसटी आली हो 
कधी डांबरी रस्त्यावरील धूळ फेकत तर कधी , लाल मातीचा धुराडा उडवत , कधी सुसाट कधी आचके देत , बसल्या बसल्या खिडकीच्या चौकटीतून ..डोंगर दऱ्याचं अन हिरवाईच नेत्रसुख दर्शन देऊन गावो गाव जोडणारी हि एसटी ....प्रवासातील माझं एक आवडीचं वाहन...
तर असो ..

रसाळगडावरची मंतरलेली ती रात्र अनुभवून आम्ही दुसऱ्या दिवशी ....सकाळी १०:३० च्या आसपास किल्ल्याचा काही उर्वरित भाग पाहून निमणी कडे वळालो . निमणी हे रसाळगडाच्या पायथ्याच गाव. किल्ल्यावरून एक नजर टाकली कि गर्द रानावनातून वळणा वळणाची वाट आपल्या थेट निमणी गावात नेउन सोडते .
निमाणी पासून साधारण पाऊन एक तासाची पायवाट केली कि रसाळ गडाचा माथा गाठता येतो.
स्वतःच वाहन असल्यास ..वीस पंचवीस मिनिटाची बचतच ...  डांबरी रस्ता थेट किल्ल्याच्या पायऱ्या पर्यंत घेऊन जातो.

-गाव तेथे एसटी ..


तर असा हा आमचा..गर्द वनातील त्रिकुट ...

महिपतगड _सुमारगड आणि रसाळगड ...