रविवार, २६ जून, २०१६

'सह्याद्रीतली माणसं '


























मनात खूप सारे विचार आहेत. जे शब्दबद्ध करायचे आहेत . कृतीत उरतवायचे आहेत.

त्यातलंच हे एक ...म्हणजे 'सह्याद्रीतली माणसं '
हा एक स्वतंत्र लेख ..जो लवकरच घेऊन येतोय माझ्या ब्लॉग वर ...

तसं आजवर सहयाद्रीच्या ..दऱ्या खोऱ्यानिशी वावरताना , आड अडगळ ठिकाणी , कुठश्या वळणाशी , खूप माणसं भेटलीत. साधंसच जीवन जगणारी पण माणूसपण मनात ठासून धरलेली . 
मायेचा पंख सदैव उघड ठेवणारी ,
कधी देवदूतासारखी धावून आलेली , 
कधी अनोळखीपणाचं शाप मोडत आपलेपणचा बंध जुळवून मायेचा पांघरून धरणारी...... 
मनमिळावू माणसं....!

मग त्यात देवगिरीच्या शोभा मावशी असो , जेवणासाठी आग्रह धरणारी , 
स्वतःचा डबा देऊ करणारी आणि निरोप घेता घेता , आता येताना जोडप्यानीच या हं ! 
असं आपुलकीने म्हणणारी ...
किंव्हा चकदेव च्या रानावनात राहणारे आजी आजोबा असो , तहान भूक म्हणून जाता ....
ताकाच पातेलंच समोर ठेवणारी,
मोरे काकांसारखी नितळ स्वभावाची माणसं असो , वाट दावंनारी वा घरात आसरा देणारी . किंव्हा
ऐन संध्याकाळी हडसर करून झाल्यावर ....
जेवणासाठी आग्रह धरणारी आणि रायगडापासून हडसर ची रीतसर माहिती पुरवणारी , काका काकी असो , वा मोटारसायकल बंद झाल्यावर दुकान बंद असूनही मदतीस धावून येणारी ...
तिथलीच माणसं ..

लवकरच घेऊन येतोय ...
************************************xxxxxxx****************************************

''सीताराम काका'' 

चहुबाजूनी किर्रर्र अश्या रानवाट्यांनी आणि बिबट्यासारख्या श्वापदांनी  वेढला गेलेला महिपतगड  आणि त्याच गडाच्या पायथ्याशी वसलेली टुमदार अशी बेलदारवाडी..
तिथले हे काका 'सीताराम काका'' 
महिपतगड ( बेलदारवाडी  ) सुमारगड ते रसाळगड, ह्या आमुच्या त्रिकुट मोहिमेला ह्यांची साथ सोबत मिळाली. आणि म्ह्णूनच आमची हि मोहीम यादगार ठरली.
तिन्ही गड सर करता आले. अनुभवता आले.

महिपतगड सुमारगड ते रसाळगड हे अंतर पायी ..साधारण ८ ते नऊ तासाचं आहे .
(तुम्ही कोणत्या गतीनं वावरता  त्यावर ते अवलंबून आहे )
किर्रर्र जंगलातून ..माकड झेप घेत ,वाटा धुंडाळत , तोल सांभाळत आणि पाण्याच्या साठा योग्य तितका वापर करत , इथून वावरावं लागत . ते हि सूर्य अस्ताला लागनाच्या आत ...

काका सोबत होते म्हणूनच आमची  हि मोहीम यशस्वी  ठरली आणि आम्हाला रसाळगडच्या अभूतपूर्व  
 सोहळा म्हणजेच जगबुडीच्या खोऱ्यातलं देखणं  सूर्यास्त बघायला मिळाला .
इथूनच आमच्या ट्रेकची सांगता झाली.

सह्यादीच्या अंगाखांद्यवर बागडणारी  अशी माणसं सोबत असली म्हणजे ...
ट्रेक यादगार होणारच ...
- संकेत य. पाटेकर 
                                                                                                                                                                             


************************************xxxxxxx****************************************

ज्याच्याकडे कॅमेरा , त्याच्या कडे हास्य आनंदाची कुपी .....
ठाणाळे गाव _एक क्षण हास्याचा  _
निरोप देताना ..टिपलेला क्षण


************************************xxxxxxx****************************************

मल्हारगडचे  आजोबा ...



सह्याद्रीच्या कडे कपर्यातुनी मनमुराद वावरताना ..आपला विविध अंगी घटकांशी संबंध येतो. 
त्यात महत्वाचा एक घटक म्हणजे तिथला 'माणूस' ...

दळणवळणाच्या सुखसोयी अपुऱ्या असताही , तृप्त असणारा .. 
समाधानाची मिश्किल, हास्य रेषा चेहऱ्याशी झळकावत मुक्तः कंठे जीवन व्यतीत करणारा...
 हा साधा सरळ , मनमिळाऊ आणि कष्टाळू माणूस .., 
आपल्या खोपटी वजा घरात काही असो नसो , पण याथोच्छित आदरतिथ्य करणारा.. 
या बसा, चहा घ्या, जेवून जा , अस म्हणत सुवासिक गप्पा मारणारा ..
त्यात दंग होणारा हा माणूस ..
.............................पाऊस हाच त्याचा मायबाप ..
त्यावरचं त्याच सारं गणित जुळलेलं . म्हणूनचं व्याकूळ आणि आशावाळ नजरेने ...
 आकाशी त्या मेघ राजाला तो खुणावत असतो. बरस रे ...बरस ..आता तरी..
पण त्याची हृदयवेडी हाक त्यापर्यंत पोहचते का ? 

हीच कळ ह्या आजोबांच्या हृदयातून हि पाझरली . बोलता बोलता ....
यंदा पाऊस नाही .... 

मल्हारगड उतरतेवेळी, निवांत एका ठिकाणी, हे आजोबा विसावलेले दिसले . 
नाव - श्रीकांत काळे - सोनोरी गाव .. तेंव्हा त्यांच्याशी मन मोकळेपणाने संवाद साधला तो क्षण ..

सह्याद्रीत भटकताना हि माणसं नक्कीच भेटतात . 
कधी स्वताहुन ती आपल्याशी संवाद साधत आपलंस करून जातात, तर कधी आपल्याला त्यांच्याशी संवाद साधत त्यांना आपलंस करावं लागतं . 
खूप काही मिळतं हो ..., आशीर्वादासही ..

- संकेत य. पाटेकर 
०८.०९.२०१५ 

************************************xxxxxxx****************************************

गावाकडची माणसं ..
सांकशी (बळवली ) गावातील पाटील काका ...




























पनवेल नजीकचा सांकशीच्या किल्ला अन निसर्गातील अद्भुत कलेचा कलात्मक नजराणा पाहून अंतर्मुख होवून आम्ही परतीच्या मार्गी लागलो.
घनदाट वृक्षराजी , कधी मोकळं माळरानं , कधी पक्षी पाखरांची मंजुळ शिळ 
कानी गुळवत, 
फुला फुलांचे रसपूर्ण ताटवे , रसिक मनाने न्हाहाळत , कधी डोईवरी आभाळातल्या पांढर्या पुंजक्याकडे कुतूहलाने एकाग्र होत , तांबड्या लाल 
माती च्या मळवट पायवाटेने वळवळण घेत आम्ही बळवली गावा नजीक आलो . तेंव्हा 
ह्या पाटील काकांची भेट झाली . बळवली गावचेच हे पाटील काका ..

मनमिळावू मनाचे अगदी , गर्भ श्रीमंत माणूस , 
चालता बोलता , केवळ ५-१० मिनिटांची क्षणभराची झालेली, आमची काय ती ओळख..त्याला त्यांनी आपलेपणाची जोड दिली . अन निरोप घेत असता राहवलं नाही म्हणून 
काहीतरी घेऊनच जा असा आग्रह करत हि झेंडूची फुले हाती दिली.

४० लिटर दुधाची रोजची विक्री , आंबे , चिकू ची झाडे , वविध भाज्यांचे मळे, आपल्यात जमिनीची मशागत करत, वेगवेगळे त्यात प्रयोग करत ...
'बासमती तांदलाच पिक घेऊन पारितोषिक मिळवणारे हे काका , आपल्या ह्या जमिनीवर 
त्याचं फारच प्रेम. त्याबद्दल पुढे काही गोष्टी हि सांगितल्या. 

जमिनी विकून शहरात येणारे लोक , होणारी वृक्ष तोड , सरकारची वृक्ष लागवड आणि फसगत ..इत्यादी गोष्टींवर ते भर भरून बोलले . अन जाता जाता ..

इतक सगळ आहे , अजून काय पाहिजे? या पुन्हा , आलेत तर, अस हास्य मुद्रेने 
म्हणत ते त्यांच्या मार्गी अन आम्ही आमच्या मार्गीस्थ झालो . 

गावाकडची अशी हि माणसं ..
साधी भोळी , उदार मनाची ... हृदयात घर करून जातात कायमची ...
ट्रेक ला गेल्यावर अश्या लोकांचा क्षणभरासाठी सहवास लाभतो . पण तो उरतो 
आयुष्यभरासाठी आठवणीत ....
अश्याच आठवणीतल्या गाठोड्यातून ...

- संकेत य. पाटेकर 
२७.०३.२०१४


************************************xxxxxxx****************************************

देवगिरीच्या 'शोभा' मावशी ..






आता पुन्हा याल ते एकत्रच जोडीने या, बर का ? (म्हणजे लग्न करून बायको सोबत )
देव तुम्हाला सदा हसत ठेवो. 
जाता जाता मावशीचा आशीर्वाद आणि तिचे प्रेमळ शब्द
मनाशी बिलगून आम्ही ...
आमच्या परतीच्या मार्गी लागलो.
देवगिरी किल्ल्याला निरोप देत २ दिवसाची आमची हि संभाजीनगर (औरंगाबाद) सफर.... आता पूर्ण होणार होती.
जवळ जवळ पाऊन ते एक तास , आम्ही देवगिरी किल्याच्या बालेकिल्ल्यावर स्थित,
' पेशवेकालीन गणेश मंदिराच्या ओट्यावर, ' त्या शांत वातावरणात ....
स्वभावाने अगदी मोकळ्या मनाच्या , शांत तितक्याच बोलक्या असणारया शोभा मावशीची बोलण्यात अगदी दंग झालो होतो . 
त्याही मन मोकळेपणाने आमच्याशी बोलत होत्या . स्वतःबद्दल तसेच इथला इतिहासाबद्दल मुक्त कंठाने आम्हास सांगत होत्या. 

त्यांची हि तिसरी पिढी . नाव - शोभा खंडागळे . 

सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ ते सवा सहा वाजेपर्यंत ते बालेकिल्ल्यावर स्थित पेशवेकालीन '' गणेशाची'' भक्ती भावाने पूजाअर्चा करतात .
येणाऱ्या भाविकास साखरेचा प्रसाद देऊन, दमलेल्या थकलेल्या मनास पाणी देऊन त्यांच मनशांत करतात . 
त्यांची विचारपूस करतात अगदी मनोभावे .
अगदी कधी कुणास स्वतःसाठी बनवून आणलेला जेवणाचा डबा देखील ते प्रेमाने देतात . 
खाऊ घालतात . 
त्यांची गणेशावर खूप श्रध्दा . . जे काही आहे ते त्याच्या आशीर्वादाने असे ते समजतात. 
येणारे भाविक देवापाशी श्रद्धेने जो काही पैका ठेवतील तो त्यांचा पगार . 

दौलताबाद गावातच त्याचं  घर आहे. 
त्यात त्यांची सासू , तीन मुले - त्यांची सून- नातवंड असे सारेजण एकत्रित राहतात. 

साऱ्यांच नेहमीच चांगल चिंतनारया मावशी स्वभावाने अगदी मोकळ्या मनाच्या आहेत. 
आणि अशा मोकळ्या मनाच्या बोलक्या व्यक्ती क़्वचितच भेटतात आपल्या जीवन प्रवासात... 
- संकेत य. पाटेकर 

************************************xxxxxxx****************************************

वेरूळचा ' शाहरुख ' 





अहो सर घ्या ना ? १२० रु. फक्त ....
बघा तुमच्या गर्ल फ्रेंड ला होईल . गर्ल फ्रेंड साठी तरी घ्या हो......
नको नको म्हटले तरी तो माझा पिच्छा काही सोडत न्हवता . 
नाव विचारले तर म्हणे 'शाहरुख ' 
हेअर स्टाईल वरून तर तसा तो शाहरुखच वाटत होतां.....
असो त्याच्या चेहर्या वरच हास्य मात्र अगदी निखळ होतं.त्यात स्वार्थपणा अजिबात नव्हता .

सांजवेळ होती , सहा वाजून काही एक मिनिटे झाली होती . कैलाश लेणे पाहून नुकताच गेट बाहेर पडलो . 
आणि तिथल्या एका स्थायिक फेरीवाल्याने गाठलं. 
हाती मार्बल ची सुंदर पेटी आणि हत्तीचे कोरीव काम केलेले ती सुबक मूर्ती . 
त्याने दाखवायला सुरवात केली . आणि मी सहज म्हणून ह्याचे किती असे प्रश्न करू लागलो . 
आणि त्याने त्यावर लगेचच उत्तर द्यायला सुरवात केली . ह्या पेटीचे २५० रुपये , ह्या हत्तीचे २०० रुपये. 
ते ऐकून मी नकारार्थी मान फिरवली . खरं तर ती नक्षीकाम केलेली सुंदर मार्बल पेटी घेऊसी वाटत होती. 
पण २५० रुपये जरा जास्तच वाटत होते .

कुठे हि बाहेर जाताना मग तो ट्रेक असो किंव्हा पिकनिक ठरवलेल्या पैशात सर्व भागवायच किंव्हा शक्यतो कमी खर्च करायचं .ह्यात मी नेहमीच प्रयत्नशील असतो . 
कुणास ठाऊक कुठे आणि कशी पैशाची गरज भासेल ? ते काही सांगता येत नाही ना ?

तरी हि काही गोष्टी अशा असतात कि मनाचा मोह काही केल्या आवरत नाही . 
नाही नाही म्हणता त्याची किंमत कमी करून , ती सुंदर नक्षीकाम केलेली मार्बल पेटी मी औरंगाबादची आठवण म्हणून विकत घेतली . आणि पुढे चालू लागलो. 
तोच पुन्हा एक इसम पुढे येत त्याजवळ असलेली अजिंठा वेरूळची पुस्तके आणि काही CD's विकत घ्या असे विनवू लागला . त्याला नाही म्हटल . आणि पुन्हा पुढे चालू लागलो. 
आणि तोच समोर उभा राहिला तो शाहरुख . शाळेतल्या मुलांच्या वयाचा ...
हेअर स्टाईल तर अगदी शाहरुख सारखीच. बोलन मात्र अस्सल मराठी...,तिथल्या स्थानिक भाषेतलं.

चेहरा कसा तर हसरा .त्याच्याकडची ती वस्तू मी नक्कीच विकत घेईन अशा खात्रीचे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव . हाती एक प्लास्टिक पिशवी , त्यात विक्रीसाठी ठेवलेलं सामान . 
मला पाहून लागलीच त्याने बोलायला सुरवात केली . हाती असलेल्या पिशवीतून एक वस्तू काढून मला त्याने दाखविली . ज्याचा मला काहीच उपयोग न्हवता . म्हणून मी सरळ नाही म्हटलं.
आणि ती वस्तू घेऊन तरी मी काय करणार होतो ? 
मुलींच्या कानातल्या त्या कुड्या . 
पण तरीही नाही म्हटल्या वर , अरे सर घ्याना घ्या ? तुमच्या गर्ल फ्रेंड ला होईल. 
अस कळकळीने तो म्हणू लागला .
माझी कुणी गर्ल फ्रेंड नाही रे ? अस मी तितक्याच स्पष्टपणे म्हणू लागलो .
अहो गर्ल फ्रेंड नाही तर बहिणी साठी घ्या ? बहिणीला होईल ?
ह्यवर मी काय बोलणार ,अनुत्तर झालो . म्हटलं चला बहिणीसाठी काहीतरी घेऊन जावू . 
आवडल्या तर नक्कीच खुश होतील . तेवढंच भावावरच प्रेम अधिक दृढ होईल . 

आणि म्हणून मी त्या कानातल्या कुड्या  त्याच्याकडून विकत घेतल्या . 
आणि तोच त्याच्या मनाची पुन्हा लगभग सुरु झाली . 
माझ्या मित्रांना तो विनवू लागला . 
तुम्ही सुद्धा घ्या ना एखादं ?

माझ्या मित्रांनी काही ते घेतलं  नाही . पण त्याची छबी मात्र त्यांनी कॅमेरात बंदिस्त केली  आम्ही .
आणि जाता जाता त्याला गमंत म्हणून  विचारल , ' फेसबुक वर आहेस का रे, बाबा  ? 
त्यातलं  त्याला काही एक कळल नाही. पण त्या बोलण्याने मात्र त्याच्या चेहरा निखळ हास्याने उमळला.   
  
असा हा वेरूळचा शाहरुख ..प्रवासात भेटलेला ..आणि मनावर स्वताचा छाप ठसवलेला . 
प्रवास खरं तर  अशा व्यक्ती रेखांनीच यादगार होतो,  नाही का ? त्यातूनच खरी संस्कृती समजते. 
राहणीमान कळतं .  पोटासाठी सुरु असलेली जीवाची  तगमग कळते. 
- संकेत य .पाटेकर 

************************************xxxxxxx****************************************

किल्ले कावनई - सुरकुत्यांचं हे देणे...




































सुरकुत्यांचं हे देणे सांगे , 
जीवनाभुवनाचे कथा सार ... 

भक्ती रस ....

त्यो महादेव हाय ना , त्याला हे बेल वाहा...लेकरांनो !!

घोटी ला उतरलो , रिकाम्या पोटात ....मिसळ पाव आणि वडे ढकलत , 6-7 जणांना सहज सामावून घेईल अश्या रिक्षांतून 8 किमी रस्ता कापत ..कावनईशी आलो. . (कपिल धारा तीर्थ ) तिथून पुढे गड महालाकडे पायवाट पकडली. तेंव्हा वाटेत हे आजोबा दिसले. 
काठी टेकत , हळूच आपल्या थरथरत्या अंगाने कुठेशी जात असावे. त्यांची आमची नजरा नजर झाली. गडाकडे चाललोय हे कळताच . त्यांनी किल्ल्यावर स्थित शंभू देवाकडे नजर फिरवली. 
मोकळ्या निरभ्र आकाशाखाली, किल्ल्यावर वास्तव्य करून असलेल्या त्या शंभू देवाशी , वयोपरत्वे त्यांना आता जाणे शक्य होत नसावं. पण त्यांच्या नजरेतील ती भक्तिसाय आम्ही पाहिली , अनुभवली, तो एक क्षण .....

त्यांनी मग हळूच आपल्या गाठोड्यातून , बेलाची पाने काढली आणि ती देऊ केली. 
त्या शंभो महादेवाशी वाहायला ...


- संकेत य .पाटेकर 

************************************xxxxxxx****************************************

एवढ्याश्या वयात ..
शनिवार  रविवार ह्या सुट्टीच्या वेळेस ..बागडायचं खेळायचं सोडून ...
सकाळचं खोपट्याबाहेर पडून , या गर्द रुणझुण झाडीत , इवलीशी जागा धरून , पावसाच्या टपोऱ्या सानिध्यात उभ्यानेच  , आपल्या माणसांसाठी आपल्या घरच्यांसाठी  दाणे शेंगा विकून हातभार लावणार हे इवलं गोंडस मन...


 
 
'' निरागसता मनात भरली की देहमन हरपून जातं ''
ह्या लहानग्या पोरीला पाहताना तस्संच काहीसं झालं.
चेहऱ्याशी विलसत असलेलं हे आभाळ मोकळं स्मित... नजरेतनं झुळ झुळणारी ही निरागसता.. निथळणारं हे अजाण बोलकेपण...आणि ओठाशी हळूवार उमटणारं शब्दांचं मोहर..
पाहता...ऐकताच ,
हृदय जडलं अगदी..
कालच्या ट्रेक दरम्यान भेटलेली ही चिमुरडी..गोंडस अशी पोर,
सर शेंगा घ्या ना...?
असं येण्या- जाणाऱ्या कडे पाहून,हसऱ्या नि बोलक्या स्वरांनं आणि त्या अपेक्षित नजरेनं उभी असताना दिसली.
सकाळी , गड माथा गाठून, तो पुन्हा आम्ही उतरताना , ती त्याच जागेशी ठाम मांडून उभी होती.
रिमझिमणारा पाऊस..वृक्षराजींच्या दाटी वाटी,
दगड धोंड्याचे उंच सखल थर, भिजलेल्या निसरड्या पायवाटा, त्यात एका कोपरयात, जागा धरून,
उभ्यानेच, येणा जाणाऱ्याला न्याहाळणारं हे लहानगं मन..
दिसलं पाहिलं ...आणि द्रवलो गेलो मनातून...
खिश्यात नेमकी एक दमडी शिल्लक न्हवती.
काही आणलं देखील न्हवतं.
तिच्या कडून शेंगा घ्यायला, तिला काही द्यायला.
ती सल मनात बोचून राहिली..,अजूनही सलते ह्या मनाला..
आपण काहीच करू शकलो नाही..

आनंद होऊ शकलो नाही..
आनंद देऊ शकलो नाही..
संवेदना जरी जाग्या माझ्यात
हृदय होऊ शकलो नाही ..
- संकेत पाटेकर
२५.०६.२०१८



रविवार, २२ मे, २०१६

द्रोणागिरी - एक धावती भेट

जवळ जवळ पाच एक महिन्या नंतर कुठे एखाद किल्ल्याला मी भेट दिली .
महीपत - सुमार आणि रसाळगड नंतर ( वृत्तांत अजून तसा लिहायचा बाकी आहे ...लवकरच ते हि पूर्ण करेन  )हि अचानक ठरलेली आमची  ह्या वर्षीची दुसरी मोहीम महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर ...आखलेली .
तशी हि आमची धावती भेट ठरली .... पण परिपूर्ण अशी .
संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास , सुर्य मावळतिला झुकत असता अक्खा उरण परिसर (अगदी न्हावा शेवा  )  पिंजून झाल्यावर आम्ही ह्या किल्ल्याला भेट दिली म्हणजे डोंगर चढणीला सुरवात केली.
२ बाईक , चौघे  मित्र ...असा आमचा इवलासा चमू ..आणि ह्या सुखद आठवणी...


किल्ले द्रोणागिरी...
उरण जवळचा करंजा बेटा वरील हा किल्ला .
पाहण्या सारखा , निसर्गरम्य अगदी .. एक दिवसात होईल असा ..
पावसाळ्यात  येथे वेगळीच चमक असेल ह्यात वाद नाही.  वर्दळ तशी नाहीRestricted Area  असल्या कारणाने बहुदा तस असावं. कारण ONGC PLANT बाजूला असल्याने  दिवस रात्र इथे पोलिस पहारे असतात . त्यांच्याकडून परवानगी घ्यायची आणि थेट किल्ला  पाहून यायचं. 

किल्ल्याचा आवाका तसा फार मोठा नाही . त्यामुळे १ तासात किल्ला पाहून होतो.  उर्वरित वेळ , तुमच्याजवळ स्वतःच वाहन असेल तर आसपासची ठिकाणे पाहू शकता.   
द्रोणागिरी मंदिर , करंजा टोक ....JNPT तल्या जुन्या 'शेवा' गावाला भेट वगैरे ..वगैरे ..

किल्ल्याचा इतिहास :  
सातवहानांच्या एका शिलालेखात उरण जवळील मोर गावाचा उल्लेख आहे. सातव्या शतकाच्या प्रारंभी पुलकेशी चालुक्याने मौर्यांची घारापूरी ही राजधानी काबीज केल्याचा उल्लेख ऎहोळे येथील शिलालेखात आहे. घारापूरी या राजधानी पासून जवळ असणार्‍या उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधला असण्याची शक्यता आहे. 

द्रोणागिरी किल्ला देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात होता. इ.स.१५३० मध्येपोर्तुगीजांनी किल्ल्याची डागडुजी केली. १५३५ मध्ये अंतोनो- दो- पोर्तो या पाद्रीने नोसा-सेन्होरे, एन.एस. द पेन्हा व सॅम फ्रान्सिस्को ही चर्चेस बांधली. १६ व्या शतकात काही काळ हा किल्ला आदिलशहाकडे होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेला.मुंबई बेटाच्या संरक्षणाच्या दृष्टीने घारापूरी किल्ला, उरण गाव व उरण जवळील करंजा बेटावर असलेला द्रोणागिरी किल्ला महत्वाचा होता. १० मार्च १७३९ ला मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट व द्रोणागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून घेतला.

( ईतिहास संदर्भ - ट्रेकक्षितीज )

उरण एसटी स्थानकाच्या अगदी समोर असणार्‍या रस्त्याने डाऊर नगरकडे चालत  गेल्यास ....आपण इथवर येउन पोहोचतो . येथून किल्ल्याला जाणारी वाट आहे. 
प्रति 1
साधारण वीस एक मिनटाची पायवाट चढत आपण किल्ल्याच्या बुरुजाशी येऊन पोहोचतो. तिथून काही पाउल पुढे  चढून गेल्यास   ...उजव्या  हाताला  पहारे चौकी लागते...पुढे ..हा प्रवेश द्वार ...तिथून आत शिरायचं.
प्रति - 2 

समोरच हि वास्तू ( चर्च ) नजरेस दिसते .....

प्रति - 3

प्रति - 4

 चर्च..
प्रति - 5
चर्च..

प्रति - 6
चर्च..आतील भाग..
प्रति - 7

ऐतिहासिक वास्तूर  व तटबंदी वर स्वतःची नाव कोरणारी महाभाग  कमी नाही आहेत आपल्याकडे..
त्याच अजून एक उदाहरण ..प्रति - 8
प्रति - 09...
प्रति - 10...

एक वेगळी रचना असलेली पाण्याची टाकी ... " गागौणी व गिजोणी "
प्रति - 9 
प्रति - 10
प्रति - 11


उरण परिसर ..देखावा  ..
प्रति - 12

.
बुरुज....
ह्या बुराजापासून पुढे ....खाली चालत गेल्यास .......मुख्य दरवाजा लागतो . 

सध्या त्याची बरीच पडझड झाली आहे.  
प्रति - 13
बुरुज....खालील बाजूने...
प्रति - 13

मुख्य दरवाजा कडे जाणारी वाट ...
प्रति - 14...

मुख्य दरवाजा ... सध्या येथून येणारी वाट बंद आहे...
प्रति - 14

प्रति - 15..
 दरवाजाच्या देवडीत विराजमान झालेले गणेश ...

प्रति - 16...
दरवाजाच्या देवडीत विराजमान झालेले गणेश ...

प्रति - 17



एकीकडे निळाशार , अथांग बाहू पसरलेला  समुद्र .....  त्याच्या संगीत लहरी (गाज ) 
एकीकडे ..मानवी वस्ती .... इमारती आणि औद्योगीकरण ...
आणि त्याच बरोबर  हि ऐतिहासिक वास्तू....
ह्याची एकत्रित सांगड घालायची. आणि पुढच्या प्रवासाला निघायचं. 

धन्यवाद ..!
संकेत पाटेकर

२२.०५.२०१६.

महत्वाची टीप : - द्रोणागिरी नावाचा कुठलासा किल्ला आपल्या येथे अस्तित्वात आहे. 
हेच तिथल्या लोकांना माहित नाही. त्यामुळे उगाच भटकायला होतं . (म्हणायला इतर नव्या गोष्टी हि पहायला मिळतात त्यामुळे ..पण ती गोष्ट निराळी ..  आपला गणिती सांगड घातलेला वेळ कुठेसा चुकतो एवढंच ..  )  

तर...
उरण एसटी डेपोच्या अगदी समोरच एक निमुळता रस्ता आहे . जो द्रोणागिरी किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. वाटल्यास उरण डेपोच्या चौकात विचारपूस केल्यास कुणी एक नक्कीच तुम्हाला  सांगेल .
पण त्यापुढे निघालात ...तर  अपवादानेच एखादा भेटायचा. 

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०१५

मल्हारगड ..



मल्हारगड ..

समुद्रसपाटीपासूनची साधरण  ११०० मीटर उंचीवर वसलेला  हा किल्ला ...  अगदी छोटेखानी पण देखणा  अन पाहण्यासारखा   आहे.  मुंबई पुण्यापासून एक दिवसात हि  करता येतो . 
फार वर्दळ नसल्याने अन ट्रेकर्स लोकांना सोडून इतरांना माहित नसल्याने (ते एकंदरीत  बरेच आहे म्हणा , नाहीतर ह्याचाही  पिकनिक स्पॉट व्हायचा   ) किल्ल्यावर निवांत मनाजोग भटकता येतं.

मराठ्यांच्या इतिहासातील, महाराष्ट्रातला  बांधला गेलेला हा शेवटचा किल्ला म्हणून ट्रेकर्स मंडळींमध्ये हा  नावाजलेला  आहे. पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख , सरदार पानसे ह्यांनी हा किल्ला बांधला. दिवेघाटावर आणि आजुबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी ...

थोरले माधवराव पेशवे ह्या किल्ल्यावर येऊन गेल्याची नोंद ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळून येते . 
तसेच तेजोमय क्रांतीची मिशाल पेटवणारे इंग्रजाविरुद्ध लढा देणारे , उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता. असा एकंदरीत ह्या किल्ल्याचा इतिहास थोडक्यात मांडता येतो. 

 हे झालं इतिहासाचं अन भूगोलाचं  ..
आता आपण वर्णना कडे वळू 

शनिवार , गोकुळाष्टमी सारखा  कृष्णमयं  दिवस , त्यात अश्या मंगलदिनी , योगायोगाने जुळून आलेला  मित्राचा वाढदिवस .. अन त्यात ठरलेली आमची हि मल्हारगडची ट्रेक सफर ...,
एकंदरीत सगळा योगायोगाच ...
जवळ जवळ एक महिन्याच्या दीर्घ कालावधी नंतर सह्याद्रीत असा हुंदडण्याचा हा योग जुळून आला होता . 
हा सह्याद्री म्हणजे आमचा जिवाभावाचा सवंगडी, नवा ध्यास ..नवी उर्जा , नवी प्रेरणा , नवं तेज ..नवी दिशा..
त्याच्याच सानिध्यात त्याच्या सोबतच ह्या 'जीवनाला' ह्या 'जगण्याला' नवा 'अर्थ'लेप  द्यायचा आहे. 
हे जीवन आपलं  बहुमुल्य आहेच . त्याच सार्थक तर  झालेच पाहिजे , ना ?
सह्याद्री त्याचीच  जाणीव देतो. अन त्यासाठी नवी उर्जा हि ...प्रेरणा हि ..

तर असो ..
 (कोकम सरबत अन केक )

आठ जणांचा आमचं टाळकं  , गोकुळाष्टमी अन मित्राचा वाढदिवस  एकत्रित अन दणक्यात  साजरा करत, 
पुणे - मल्हारगड   दिशेने निघाला.  तेंव्हा मध्य रात्रीचे १ का दीड  वाजले होते. 
रस्त्याला फारशी रहदारी न्हवती. मोकाट रस्ते सुसाटलेले. 
कालोख्याचा पसारा  सर्वत्र अंधारलेला  . रस्त्या कडेला उभ्या असलेल्या, उंच इमारतीतल्या 'ऑफिस' चे  दिवे तेवढे  पेटते दिसत होते. 
सार जगं  निद्रा अवस्थेत पहुडलेलं असताना , कुणीतरी अद्यापही तिथे अहोरात्र काम करत होतं. 
निद्रा  देवतेला जागता पहारा देत  ...जीवनाचा किती हा  संघर्ष ..न्हाई ! 

असो...
गाडी हळूहळू पुढे सरकू लागली. मुंबई पुणे एक्प्रेसने  गाडी सुसाट धाऊ लागली .  तसा वातावरणात फरक जाणवू लागला. गारवा हळूहळू वाढत होता . कुडकुडनं चालू झालं होतं .

एके ठिकाणी वाफाळत्या चहाची तलफ भागविली.  अन पुन्हा नव्या उर्जेसः गाडी आणि आम्ही वेगवान झालो. थोड्या गप्पा पुन्हा  रंगात आल्या  . मस्ती गाणी सुरु झाली. 
त्यातच  मुंबई पुणे एक्स्प्रेस हाईवे सरला . आम्ही  पुणे शहरात प्रवेश केला.  

हडपसर मार्गे गाडी धावू लागली. अन हळूहळू दिवे घाटाचा  वळणा वळणाचा रस्ता आमच्या स्वागताला तयार झाला. ह्याच दिवेघाटाच्या अन आसपासच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी मल्हार गडाची उभारणी झाली होती. अन अश्या ह्या ऐतिहासिक अन पवित्र ठिकाणी ,  पहाटे पाचच्या अंधुक रात्री , आम्ही ,मलहरगड दिशेने वाटचाल करत होतो.  
मी अन निलेश आम्ही दोघेच काय ते जागे होतो. निलेश ड्राइव्ह  करत तर मी नभांगणातल्या चंद्र्कोरीच्या  शितलमय छायेत न्हाऊन घेत होतो . 
ती अर्ध चंद्रकोर अन त्या भोवताली पांढरया पुंज्क्याची ती वलयांकित रेखा , , अन त्या अंतरी लुकलुकता तारकांसमूहचा दिव्यत्वाचा  खेळ  ..
वाह,  असा क्षण मी कधी पहिलाच  न्हवता. डोळे दिपून जात होते.  एका वेगळ्याच दुनियेतुनी आपला प्रवास सुरु आहे. असा भास पदोपदी जाणवू  लागलेला . निसर्गाची किती हि अद्भुत  रूपं .न्हाई ! 
स्वतःशीच बडबडत ..वेडावून गेलो होतो . मित्रांनीही ते क्षण आपलेसे करून घ्यावेत ह्या साठी मन झगडू लागलं होतं पण सारेच निद्रेच्या स्वाधीन होते. त्यामुळे तो प्रयास मी तिथेच  सोडून दिला. अन पुन्हा त्या दुनियेशी एकरूप झालो. रात्र हि अशी ...अविस्मरणीय असते.  ह्याचा प्रत्यय पुन्हा आला. सह्याद्रीतली अशी रात्र मला नेहमीच भुलवून टाकते. 
तर असो ..

गाडी त्याच वेगाने  पुढे सरत होती. 
साधारण सहाच्या आसपास आम्ही सोनोरी गावात प्रवेश केला. 
दिवेघाट उतरत्या क्षणीच काही अंतरावर  झेंडेवाडी अशी पाठी दिसते. तिथूनही किल्ल्यावर जाता येते.
पण ती वाट थोडी लांबीची म्हणून आम्ही सोनोरी गावाच्या दिशेने येउन पोचलो. 
गावा आतूनच किल्ल्याशी जाण्यास कच्चा रस्ता आहे . आम्ही तिथवर पोहचलो . तेंव्हा
अंगातला आळस (झोप )आपोआप गळून पडला. Sack पाठीशी घेतली. कॅमेरा हाती घेतला.   
समोरच किल्ला खुणावू लागला ...दुसरीकडे  पूर्वक्षितिजाशी अरुणोदय...
. त्याच्या  आगमनाच्या रंग छटा सर्वत्र गंधाळू लागल्या . तसं मनोमन वंदन करत आम्ही  आमच्या दुर्ग भ्रमंतीस  सुरवात केली . 

 क्रमश :- 

 उजळूनीया आले ..


किल्ल्याच्या दिशेने   ...


















फुलोरा ..










मित्र सवंगडी ..




















एक उनाड क्लिक ..






आपल्या ईतिहासाची शोर्य गाथा ऐकवून अंगी तेजोवलय भिनवनारे हेच ते तट बुरजं , अद्यापही , तितक्याच खंबीरपणे निसर्गाच्या वादळी संकटाशी लढतायेत .







बुरुज..

आपल्या ह्या सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर , ह्या कडे कपारयातुनी , कधी हि कुठेही फिरा ..भटका , 
तुम्हाला एखादं तरी टुमदार असं राऊळ अन त्याचा कळसावर, कधी उंच आकाशी , अभिमानाने फडकत असेलली, ' भगवी पताका नक्कीच उंचावलेली दिसेल. हि सारी आपली दैवतं खरी ..म्हणून त्याच भाविकतेने नकळतपणे आपले कर हि, त्यापुढे जोडले जातात. ''श्रद्धा भाव जिथे कर जोडती तिथे''
सह्याद्रीच्या माथ्यावरील हि देवस्थाने म्हणजे .... एकांतात गवसलेल्या चैतन्याचा नवा सप्त सूर...
मल्हारगडावरील असच एक छोटसं महादेव मंदिर..


खंडोबा मंदिर..
सह्याद्रीची कड चढताना ...गड किल्ल्यातील तट बुरुजांचा , अन दरवाजांचा असा बळभक्कम नजराणा दिसला कि उर अभिमानाने नक्कीच भरून येतो . मल्हार गडावरील असाच, वर्षानुवर्ष अभिमानाने चौकी देत उभा असलेला हा.. बालेकिल्ल्याचा दणकट प्रवेश द्वार .


 मुख्य प्रवेशद्वार ..



किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा फारच देखणा अन भव्य आहे. 
त्याचीच एक छबी ... दरवाजा येथून टिपलेली...
त्यात महत्वाचा एक घटक म्हणजे तिथला 'माणूस' ...दळणवळणाच्या सुखसोयी अपुऱ्या असताही , तृप्त असणारा .. समाधानाची मिश्किल, हास्य रेषा चेहऱ्याशी झळकावत मुक्तः कंठे जीवन व्यतीत करणारा , हा साधा सरळ , मनमिळाऊ आणि कष्टाळू माणूस .., आपल्या खोपटी वजा घरात काही असो नसो , पण याथोच्छित आदरतिथ्य करणारा.. या बसा, चहा घ्या, जेवून जा , अस म्हणत सुवासिक गप्पा मारणारा ..त्यात दंग होणारा हा माणूस ..
पाऊस हाच त्याचा मायबाप ..त्यावरचं त्याच सारं गणित जुळलेलं . म्हणूनचं व्याकूळ आणि आशावाळ नजरेने , आकाशी त्या मेघ राजाला तो खुणावत असतो. बरस रे ...बरस ..आता तरी..
पण त्याची हृदयवेडी हाक त्यापर्यंत पोहचते का ? 
हीच कळ ह्या आजोबांच्या हृदयातून हि पाझरली . बोलता बोलता ....यंदा पाऊस नाही .... 
मल्हारगड उतरतेवेळी, निवांत एका ठिकाणी, हे आजोबा विसावलेले दिसले . 
नाव - श्रीकांत काळे - सोनोरी गाव .. तेंव्हा त्यांच्याशी मन मोकळेपणाने संवाद साधला तो क्षण ..
सह्याद्रीत भटकताना हि माणसं नक्कीच भेटतात . कधी स्वताहुन ती आपल्याशी संवाद साधत आपलंस करून जातात, तर कधी आपल्याला त्यांच्याशी संवाद साधत त्यांना आपलंस करावं लागतं . 
खूप काही मिळतं हो ..., आशीर्वादासही .





              गड माथ्यावरील बुरुजावरून वा अश्या दरवाज्यातून .. दूरवरचा परिसर एकटक न्याहाळनं म्हणजे .....
                                   इतिहास भूगोल ह्याचा मिलाफ ,,अन सोबत निसर्ग सौंदर्याची गोडी..
                                    गड किल्ले हे असे निवांतच फिरावेत.. पाहावेत ...समजून घ्यावेत 
                                        शान आपुला , मान आपुला ...धगधगता भगवा ध्वज ...
जय शिवराय  ..





ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद ..! 
आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळ्वा  ..
संकेत पाटेकर