गुरुवार, ३० जानेवारी, २०१४

रतनगड - प्रवास कालचा अन आजचा..


वार शनिवार २ तारीख , फेब्रुवारी महिना , वर्ष २०१३ , थंडीचे दिवस.
पहाटे ६ वाजले होते त्या दरम्यान कल्याणला शिवाजी चौकात वाफाळलेला चहा घेऊन आम्हा १० जणांचा समूह अगदी मोठ्या उत्साहात रतनगड च्या ओढीने ...गाणी वगैरे म्हणत ..ट्रेक साठी रवाना झाला.
त्याच दिवशी आमचा इंजिन, अनवट वाटेचा वाटकरू ...' लक्ष्मन उर्फ बाळू ' दा ह्याचा वाढदिवस.
त्यामुळे ट्रेक ला जाण्याचा उत्साह हा आणिक द्विगुणीत झाला. किल्ल्यावर जाताना केक वगैरे घेऊन जावू ...
अन वाढ दिवस हटके साजरा करू असे एक एक विषय बाहेर निघू लागले.
अशातच कल्याण मागे पडलं ...अन शहापूर गाठलं.

पोटाची खळगी भरावी म्हणून न्हाहारी साठी एका हॉटेल मध्ये उतरलो. मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. अन तासाभराच्या आताच पुन्हा इगतपुरी मार्गे रस्ता धरला.
आम्ही ६ जन मारुती रिट्झ मध्ये आणि उर्वरित चौघे दुचाकी वर ..
मस्त रमत गमत गाणी म्हणत प्रवास सुरु होता.एव्हाना शहापूर च्या पुढचा रस्ता गाडीने धरला होता .
पण त्याचवेळेस एकाकी वीज तड्कावी अन सर्वत्र भयान शांतता पसरावी तशी शांतात पसरली त्या फक्त एका call ने ..
फोन कडाडला, ते थरारक बोल कानी घुमले ...

संकेत Accident , Accident , थांब थांब .........

रक्त बंबाळ झालेला तो आणि त्याची ती किंकाळी ......
शहापूरच्या एका हॉस्पिटल मध्ये मित्राच्या पायाला डॉक्टर टाके मारत होते.
ते करत असता त्याच ते मोठ्यानं विव्हळण अजून आठवतंय ...
ते चित्र अजूनही तसंच नजरेसमोर उमटतं आणि अंग पुन्हा शहारतं ...!
कमरेपासूनचा खालचा भाग , डावा पाय त्याचा पूर्णतः सोलून निघालेला .
हायवे वर बाईक चालवत असता हा अपघात घडला . पण नशिबाने जीव वाचला . 
एका सोबत दुसर्याचा हि ....
त्यामुळे रतनगडचा तेंव्हाचा प्लान तिथेच रद्द करावा लागला . त्यानंतर तीन एक महिने तरी मी कुठे बाहेर पडलो नाही .
अपघातात सापडलेला मित्र जवळ जवळ ७-८ महिन्यांनी पुन्हा पूर्ववत झाला. त्यावेळेस सोबत असलेलेल्या मित्रांची हि फार मदत झाली .



ह्याच गोष्टीला आता वर्ष होणार होतं , म्हणून पुन्हा रतनगडचा बेत आखला . अन त्याप्रमाणे निघालोही ...
ठाणे - मुंबई - नवी मुंबई येथून आम्ही सहा जण आणि उर्वरित तिघे पुण्यावरून असा ९ जणांचा आमचा ग्रुप तयार झाला . शनिवारी पहाटे १२:१० च्या अमृतसर एक्सप्रेस ने आम्ही निघालो .
मी , आमचा इंजिन लक्ष्मन उर्फ बाळू दा , सिद्धेश घाडगे , तेज , अनुराग , आणि प्रनिल . अशी आमची तुकडी प्रवासाला निघाली.जाताना एक्स्प्रेसच्या सामान्य डब्यातून आमचा प्रवास होणार होता , त्यामुळे जरा शंकाच निर्माण झाली कि जागा मिळेल का ?
निदान उभ राहायला तरी , कारण कळसुबाई चा प्रवासी अनुभव गाठीशी होता .
तेंव्हा कसा तो प्रवास केला होता ते आमचं आम्हालाच माहित.... असो

तर म्हटलं आता आत शिरण्यास तरी जागा मिळेल का ? पण ज्यावेळेस ट्रेन फलाटावर आली अन फलाटावरील प्रवासाची संख्या जेंव्हा नजरेस पडली तेंव्हा म्हटलं चला जागा मिळेल अन त्याप्रमाणे ती मिळाली हि ....
आज पहिल्यांदा असा निवांत बसून प्रवास करत होतो.
आयुष्य हा एक प्रवासच आहे म्हणा , कधी धका धकिचा , संघर्षाचा तर कधी सुखकर असा ...
आमचा हा प्रवास मात्र सुखकर असाच होता .

ठाणे ते इगतपुरी ह्या प्रवासाने आम्हाला सारी सिनेसृष्टी फिरवून आणली. त्यात मग हिंदी तारके तारका ,मराठी कलाकार , महेश मांजरेकरापासून , भरत जाधव , भाऊ कदम ह्यांच्या पर्यंत ...सार्यांची भेट घडली. त्यातच कुणाला किती मानधन मिळतं , कशा प्रकारे मिळतं , कशासाठी मिळतं ह्याची सारी माहिती आम्हास मिळाली.
२ तासाच्या त्या प्रवासात नवा गडी प्रवासी भेटला त्याच नाव ' किरण' .
बॉलीवूड अभिनेता सनी देओल ह्याचा अकाउनटन्ट. त्यामुळे प्रवासात अजून रंगत आली. हा प्रवास यादगार ठरला तो त्यामुळेच ..
जाता जाता एकमेकांच मोबाईल नं . घेत आम्ही त्याला निरोप दिला . अन तो त्याच्या वाटेने त्याच्या गावी भुसावळ ला रवाना झाला.

इगतपुरीच्या फलाटावर गाडी थांबली अन आम्ही पायउतार झालो. तेंव्हा रात्रीचे अडीच वाजले होते. अजून पुष्कळ वेळ होता .
पहाटे ५ ची एसटी होती. इगतपुरी एसटी स्थानकातून , पुढचा प्रवास त्या एसटीनेच होणार होता शेंडी गावापर्यंत. त्यामुळे गप्पांच्या दुनयेत आम्ही स्वतःला झोकून दिले.
अन बरोबर साडेचारच्या टोल्याला आम्ही इगतपुरी डेपोच्या दिशेने वाटचाल सुरु केली .
अन गप्पांच्या ओघात एसटी स्थानकात पोहोचलो हि ..

ठरल्या वेळेप्रमाणे एसटी हि ५ ला न येता आळस करत १५ मिनिटे उशिराच दाखल झाली .
ते हि अंगभर शिडकावलेल्या पाण्याचा थेंब जराही न पुसता ,,, इतकी घाई ...
सर्वत्र पाहावं तर आसनावर पाण्याचे थेंबे थेंबे तळे साचलेले , ते पुसण्याची तसदी त्या एसटी कर्मचाऱ्यानी घेतली नाही .
एसटीला न्हाउ घातले पण बसण्याचा जागा तश्याच ओल्याचिंब...
पहाटेची थंडी आणि त्यात हे ..अस .., थंडीचा आस्वाद घेतला तो असा ......

बरोबर साडे सहा वाजता हलत डुलत वेड्या वाकड्या वळणाने आम्ही शेंडी गावात पोहोचलो. तेंव्हा हळू हळू काळोखावर प्रकाशाचा अंमल सुरु होत होता . धुक्याची दाट चादर मात्र अजूनही तशीच पसरली होती. त्यामुळे गरमागरम चहाचा घोट घ्यावा असे मनोमन वाटत होते.
जिथे उतरलो तिथेच एका कोपरयाला चहाची टपरी होती . त्यामुळे थंडीने भरलेली हुडहुडी त्याने पार निघून गेली.
पुढे गरमागरम चविष्ट कुरकुरित अश्या कांदा भजीवर ताव मारला. अशातच एक नवी गोष्ट कळली. त्या भजीवाल्या काकांकडून ते म्हणजे
' गुगल भजी '
आजवर कांदा भजी , बटाटा भजी , मुग भजी , पालक भजी इथपर्यंत मला नाव ठाऊक होती.
अन त्याचा आस्वाद हि मध्ये मध्ये घेत असतो म्हणा . पण ...गुगल भजी हा काय प्रकार आहे बुवा ?
काही कळेना ? गूगल वर बघा म्हणजे कळेल ..., इतकं मी ऐकल . बंस (म्हणजे किती फ़ेमस भजी आहे बघा हि ),,, हीच भजी आमच्या इथे जास्तकरून खपते .
अस त्यांनी सांगितले .
म्हटल ठीक आहे रविवारी येता येता चाखून बघू त्या भजीची चव . आणि काय प्रकार तो .
तुम्ही कधी खाऊन पहिले का अशी भजी ? वा अस नाव तरी ऐकल आहे का ? असल्यास सांगा बर ..
कळू द्यात जरा ...

शेंडी गाव हे तसे प्रवरा नदीच्या काठावर वसलेल . भंडारदरा धरणाच्या भिंतीजवळच ..
येथून रतनवाडी हे (रतनगडच्या पायथ्याच गाव) रस्ता मार्गे वीस एक किलोमीटर अंतरावर आहे .
येथून जाण्यासाठी जीप ची सोय होते. तसेच होडीची सफर हि करता येते , पण तिची वेळ सध्या दुपारी १२ ची आहे . अन पाण्याची पातळी कमी असल्याकारणाने ती प्रवासी बोट आपल्याला रतनवाडीच्या खूप आधी म्हणजे जवळ जवळ चार एक किलोमीटर पुन्हा चालत जावे इतपत आपल्याला आणून सोडते. त्यामुळे तिने जाण्याचा आमचा मनसुबा तिथेच वीरघळला.
आम्ही शेंडी गावात उतरलो तेंव्हा ' राजू काळे ' हे तिथलेच स्थानिक असलेल्या काकांची भेट झाली .
अन त्यांची स्वतःशीच चार चाकी होती . त्यामुळे योग्य ते भाडं ठरवून(१३०० रुपये जावून येउन ) आम्ही रतनवाडी कडे मार्गीस्थ झालो .त्या अगोदर भंडारदराच निसर्गरम्य परिसर पाहून घेतला नजरेच्या तीक्ष्ण धारेनी ..मनाच्या गाभाऱ्यात...कायम स्वरूपी ..





साधारण ९ च्या आसपास , चढण उतरणं करत , वेडी वाकडी वळणे घेत , डोंगर दर्यांच्या कुशीतून आम्ही रतनवाडीत प्रवेश केला . अन एक एक करत गाडीतून उतरलो .
तोच समोर प्रशस्थ अशी पुष्करणी नजरेस पडली. आणि एका बाजूस अमृतेश्वरच सुरेख सुबक अस कोरीव मद्निर .त्याच कळसा पासून पायथ्यापर्यंतच दर्शन .
ते सगळ पाहून मन भक्तिमय झाल्याशिवाय राहत नाही . मनोमन देवाचा धावा ( जप )सुरु होतं .

मन त्यातच गढून जातं .


दूर वरूनच आम्ही सर्वांनी शिवाच दर्शन घेतलं. कारण माघारी येताना मुबलक वेळ मिळणार होता .
त्यामुळे अधिक वेळ न दवडता पाच दहा मिनिटातच आम्ही ट्रेक ला सुरवात केली.
चालता चालता समोरच सह्याद्रिच रांगड रूप मनास भुरळ घालत होतं .
डावीकडून सुरु झालेली डोंगर रांग त्यामधून डोकावणारा कात्राबाई कडा मधोमध रतनगड आणि त्याच्या उजवीकडे खुटा.....अन त्यापुढे अंतर अंतर सोडून उभे ठाकलेले एक एक डोंगरकडे ...हा सर्व निसर्गाचा अविष्कार ...बस्स, अजून काय हवंय...

पायाखालची माती तुडवत तर कधी दगड धोंड्यातून मार्ग काढत ,
कधी प्रवरेला समांतर अस चालतं तर कधी तिचं सुखलेल पात्र व्याकूळ नजरेन पाहतं ,
मनात तिच्याविषयी, तिच्या पावसाळी रूपांच खळखळत मनोचित्र रेखाटत ,
रानावनातून , उन सावलीच्या स्पर्शाची सुसंगत ...
मोकळा द्रीघ श्वास घेत , कधी धापा टाकत ..क्षणभर विश्रांतीचे क्षण मोजत पुढे मार्गीस्थ होत होतो .
मजल दरमजल करत पुढे सरकत होतो .
पुढे वाटेत एका ठिकाणी हरिश्चंद्र गड अन रतनगड ला जाणारी पायवाट फुटली .
तिथला लोखंडी फलक तशी माहिती पुरवीत होता .त्या बाजूला न वळता ह्या बाजूला वळा म्हणजे रतनगडच्या माथ्यावर पोचता येईल तुम्हाला बाळांनो ,,,,अस जणू पटवून सांगत होता . उजवीकडची वाट हि रतनगडला तर सरळ जाणारी पायवाट धरली तर सिधा हरिश्चंद्र गडला . असा तो दुहेरी संगम होता .
तिथून काही पाउलं पुढे टाकली अन धापा टाकत एका विशाल खडकावर निद्रिस्त झालो काही एक मिनिटे .
आमचा सिद्धेश एका वर्षाने ट्रेकला आला होता , म्हणून त्याचा वेग हि काहीसा मंदावला होता .
पण उत्साह मात्र आहे तसाच दांडगा होता . तरतरीत ......टवटवीत .
काही वेळ आम्ही तिथे विश्रांती घेतली अन पुन्हा ताजेतवाने होतं पुढचा मार्ग अवलंबला .
तोच एक दोन मिनिटातच अनेकानेक ब्लोग मधून वाचलेल्या त्या लोखंडी शिड्यांचं दर्शन घडलं.


तेंव्हा मनातल्या आनंदाला पाझर फुटलं ते वाहू लागलं. बिन्धिक्त ओरडू लागल.
अरे मित्रहो , बघा आपण आलो , येस...येस पोहोचलो ....बस्स आता अवघे काही मिनिटे......

आता पोहोचणार ह्याच भावनेने मन किती उचंबळून येत. आनंदाचा प्रवाह वाऱ्यामाफीत ओसंडत वाहत.
दोन लोखंडी शिड्या चढत आम्ही गणेश दरवाजा गाठला .


त्यातून आत प्रवेश करत , गणेशाच्या प्रतिमेला वंदन करत,, पुढची शिडी गाठली . अन त्यावरच्या दगडी पायवाटेने वर किल्ल्यावर प्रवेश केला.
वर जाताना डावीकडची वाट हि दुसर्या दरवाजातून, अग्नीबाण सुळका नजरेत सामावत , कात्राबाईचा मनोवेधक कडा न्हाहाळत आजापर्वतचा उंच माथा निरखत , राणीच्या हुड्या येथून नेढ्या कडे वळत होती.
तर उजवी कडची वाट त्या दोन गुहेकडे .जिथे आजचा आमचा मुक्काम होणार होता .

आमच्या सोयीप्रमाणे आम्ही दोन्ही गुहा व्यावस्थित पाहून घेतल्या . तसे पहिले तर आम्हीच प्रथम गडावर पोहोचलो होतो , इतर कुठला हि ग्रुप अजून तरी आला न्हवता . त्यामुळे कुठे मुक्काम करायचं ते सर्वस्व आमच्याच हाती होतं.
दोन्ही कडच्या गुहा निरखून आम्ही आमचा मुक्काम मोठ्या गुहेत न ठेवता , छोट्या गुहेत रत्ना देवीच्या मंदिरात करायचं ठरवलं.
कारण मोजून आम्ही ९ जण , त्यामुळे त्यात माऊ शकत होतो. अन ती गुहा हि स्वच्छ नि साफ होती .
त्यामुळे पाठीवरल्या Sack आम्ही एका बाजूला ठेवत खांद्यावरच भार कमी केल.
त्याआधी आम्ही मोठ्या गुहेजवळ पोटपूजा उरकून घेतली होती .

मग पाण्याच्या सोयीसाठी म्हणून तिथे उपस्थित असलेल्या काकांकडे पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून चौकशी केली.

दर शनिवार रविवार ट्रेकर्स मंडळीसाठी धान्याचं भार आपल्या डोक्या खांद्यावर उचलत दोन ते अढीच तासाची पायीपीट करत ते गडावर मुक्कामास येतात.
त्याचं नाव ' नथु झडे' पायथ्याच्या रतनवाडीचे. आपल्या पत्नीसमवेत त्यांचा इथे मुक्काम असतो दर शनिवार - रविवार . आपल्या सारख्या ट्रेकर्स मंडळींसाठी , त्यातूनच त्यांना दोन पैसे मिळतात .

त्यांच्याकडे चौकशी करता , गुफेच्या वरचं पाण्याची टाकी आहे अस कळलं अन मग त्यासाठी रिकाम्या बॉटल्स हाती घेऊन आम्ही आठ मावळे (एकास गुहेची निगा राखण्यास म्हणून ठेवून घेतले . कारण माकडांचां उपद्रव फार मोठा तिथे .. ) हनुमान दरवाज्यातून त्यावर असलेले शिल्प न्हाहाळत किल्ल्याच्या दक्षिण टोकाला आलो. तेंव्हा समोरच्या त्या दृश्याने मनाला एक सुखद धक्का दिला.




शब्द नकळत बाहेर पडले ..... अप्रतिम ..... ..केवळ अप्रतिम ..... !

निसर्गाने स्वतःला इतकं सुंदर बनविल आहे , कि त्यापुढे कुणीहि लुब्ध होईल . ठार वेडा होईल.
त्यापुढे आपलं सर्वस्व बहाल करण्या इतपत .
सौंदर्याचे , प्रेमाचे अन प्रेमजीवनाचे धडे गिरवायचे ते त्याच्याकडून ..
गर्व नाही हो , कोणत्याच गोष्टीचं , जे आहे ते इतरांत वाटून टाकायचं , देणं फक्त ते जाणतं.
पण त्याच्याही मर्यादा काही तो आखून आहेच . नाहीतर माणूस नावाचा प्राणी लुट करयाला तत्परच असतो म्हणा .





असो तर निसर्गाच ते सौंदर्य मनात साठवत आम्ही राणीच्या हुड्या कडून वर आलो. 
अन गुहेच्या समांतर वर रेलिंग लावलेल्या ठिकाणापासून चालू लागलो. थोड्याच पुढे स्वच्छ नितळ पाण्याचं टाकं लागल. त्याच्या शेजारीच एक शिवलिंग होतं . 
त्याच दर्शन घेत , पाण्याच्या टाक्यातून एक एक बॉटल भरत पुन्हा गुहेकडे निघालो.

गुहेत पोहोचलो तेंव्हा सिद्धेश हाती काठी घेऊन उभा होता .माकडांनी त्याची झोप उडवली होती .
त्यामुळे दारातच तो काठी हाती घेऊन ठाण मांडून होता .

एव्हाना एक ग्रुप गडावर मुक्कामास आला होता. आणि त्यांचा भोजनाचा जंगी कार्यक्रम सुरु होता .
इथे मुद्दाम जंगी म्हणतोय कारण मद्याचा पेला त्या प्रत्येक जणांकडे होता . आणि तेच ते ढोसत होते .
११ जणांचा तो ग्रुप ,,, केवळ पिकनिक म्हणून मौज मस्ती साठी अन दारू ढोसण्यासाठी आला होता .
ते सर्व पाहून काहीतर करावं बोलावं ह्या उद्देशाने मी त्यांना विनंती केली.

हा आपलं ऐतिहासिक ठेवा आहे. अन अशा ठिकाणी दारू वगैरे ,,, प्लीज अस पुन्हा कधी करू नका .
त्यातल्या एकाने उत्तर दिलं. ते हि पेंगत पेंगत..

'' दादा , इथली माकडे ना , माकडे आम्हाला त्रास देतात खूप म्हणून प्यालो आम्ही "
काय म्हणावं अशा लोकाना . आणि अशा बेवड्यांच्या नादी लागून तरी काय उपयोग .
उलट आपलाच दिवस खराब जायचा . 
त्यामुळे तेवढी ती एक प्रेमाने विनंती करून आम्ही गड फेरीस बाहेर पडलो.


ते नेढ्याच्या दिशेने ...


अन इथेच त्या नेढ्या पाशी ते थरार नाट्य घडलं. ज्याला आम्ही सर्व साक्षी होतो .
कारण ते नाट्य आमच्या भोवतीच आमच्या संबंधित घडलं होतं.

ते इथे काव्यशब्दरूपात मांडत आहे . पुढे सविस्तर सांगेनच ...कारण Picture अजून बाकी आहे बॉस

माकडाला आली लहर ..नि त्याने केला कहर ...

गेलो होतो सर सर , अतिवेगवान चाल करून
उंच होता नेढा तो , म्हटलं विसाऊ तिथे क्षण तरी
तेंव्हा दिसला तो पहारेकरी , दम दाटी करू लागला
का आलात इथे तुम्ही ? आता नाही तुमची खैरात खरी
होती जागा अरुंद , तिथे सारेच आता थबकलो
चिंचोळ्या त्या जागेवारती आम्ही सारे अडकलो
एक सीडे दरी मोठी , एक side उंच कडे
जागा नाहीच कुठे , आता पळती भुई कुठे
आला तो रुबाबातच , अन दम दाटी करू लागला
निमूटपणे उभं राहण्यातच शहाणपण आमचा जाहला
काय आहे जवळपास , ते चपापू लागला
हात वर उगारू , तर सुळे दाखू लागला
हिम्मतच होईना आमुची म्हटलं काय करायचं ते कर बुवा
निमूटपणे उभ राहण्यातच आमचा तो जीव खरा
जे जे होते समीप ते , ते ते त्याने पहिले
माकडाचे असे रौद्र रूप पहिल्यांदा आम्ही जाणले
सुटलो कसे बसे , कसे बसे उतरलो ,
माकडाचा विषय मोठा , त्या विषयातच गुंतलो
भूख हि असे वेडी पीसी , तिथे प्रत्येकजण हतबल होतो
माकडाचं काय राव माणूस पण कधी राक्षस होतो

२० मिनिटाचा खेळ तो , खेळ जिवावरचा होता खरा ...
पण शिकवून गेला आम्हांस जीवनाचा एक धडा... 
______________________________________________________________________________
मावळती सप्तरंगी छटा तना मनाला स्पर्शून डोंगर दर्यांच्या कुशीत एव्हाना निद्रिस्थ झाली होती. 
सूर्य नारायणाने आपल्या परंपरेनुसार वर्षा वर्षानुसार सुरु असलेले त्याचे मंगलकार्य आज हि यथेच्छ पार पाडत धरणी माईची रजा घेतली होती . उ
द्या पुन्हा नवं आशेचे सकारात्मक किरणे सोबत घेऊन..परतण्यासाठी ...इथल्या लेकुरवाल्यांसाठी...
आम्ही तेंव्हा रत्ना देवीच्या गुहेमध्ये रात्रीच्या जेवणाच्या खटपटीत आप आपल्या sack मध्ये डोकावत जे हाती येईल ते साहित्य बाहेर काढत जेवणाच्या तयारीस लागलो होतो.

माकडांचा हैदोस एव्हाना थोडा कमी झाला होता . ते हि त्यांच्या घरट्याकडे निघून गेले असावेत. 
कारण हळूवार अंधाराचं साम्राज्य चहु दिशेला आपलं बाहू पसरत होतं.

काही तासापूर्वीच नेढ्यात घडलेलं थरार नाट्य मात्र अजूनही मनाशी खेळत होतं . कधी त्यात हसू असे तर कधी भय ...अन जर तर च्या गोष्टी . जर काही अपघात घडला असता तर ...., 
कुणाच्या जिवाच बरेवाईट झालं असत तर ..मनाचं मनाशीच द्वंदसार सुरु होतं .

दुपारी ४ च्या सुमारास आम्ही आमच्या सर्व sack त्या काकांकडे ठेवतं नेढ्याच्या दिशेने निघालो.
गणेश दरवाजातून आत , पुढे राणीच्या हुड्याला उजवीकडे ठेवत , पाण्याच्या टाक्यांन कडून मळलेल्या वाटेने ...भव्य दिव्य कडे पाहत . निसर्गाच साजेरं रूप न्हाहाळत. ..पायाखाली गवतांच्या पाती तुडवत ...
कोकण दरवाजाकडून पुढे ...... ...पुढे .....अन पुढे....

वाटेत पाण्याच्या काही टाकी दिसल्या अन त्या पुढे काही अंतरावर एक भुयार..
अशा भुयार , पेब चा किल्ला , मृगगड ह्या ठिकाणी हि पहिल्या आहेत . 
अशा भुयारात जाणं म्हणजे एक प्रकारच धाडसच म्हणा . हाती टोर्च घेऊन , त्या चिंचोळ्या जागेतून आत शिरते वेळी मनाची पार थरथराट उडते .
एकीकडे मन घाबरत तर एकीकडे पुढे काय आहे ? ह्याची उत्सुकता मनास एक प्रकारे बळ प्राप्त करून देते .
पण ते बळ फार काल टिकत नाही . कारण त्या चिंचोळ्या वाटेतून चटकन मागे फिरणं शक्य होत नाही .
पाउल जशी पुढे पडतील तशीच मागे फिरकावी लागतात. 
त्यामुळे एखाद आणीबाणीचा प्रसंग उद्भवलाच तर ..........विचारूच नका ..... एक प्रकारे भीतीच ती ...

त्यामुळे काही गूढ ते गूढच राहत. त्याचा उलगडा होत नाही . आम्हाला त्यावेळेस मृगगड च्या गुहेचा उलगडा करता ला नाही . कारण दूरपर्यंत तिचा मार्ग जात होता अन त्यास पुढे फाटे हि फुटत होते . त्यामुळे आलो तसा मागे फिरलो होतो. मात्र पेब चं भुयार आतून पूर्णपणे निरखून झालं होतं .
तर असो ...
इथे हि त्या भुयारात सर्वत्र अंधार पसरला होता . 
त्यामुळे हाती टोर्च घेऊनच त्याच्या प्रकाश झोतेत आम्ही एक एक पाउल पुढे सरकू लागलो. 
गळ्यातले तर्हेवाईक शब्द बाहेर फेकत ...
समजा कुणी एखादा वन्यजीव आत असलाच तर त्या आवाजाने ,आवाजाच्या दबक्याने बाहेर येईल . 
किंव्हा  कुणी आत असल्याची जाणीव तरी होईल . उगाच पुढे काही गोष्टी जिवावर बेतण्या पेक्षा आधी अशी खात्री करून घेतलेली बरी ....
पण पुढे कुठल्याही प्रकारचा वन्यजीव वा सरपटनारा प्राणी दिसला नाही . आत मात्र एक स्वछ नितळ पाण्याचं टाकं अन एक गुहा नजरेस पडली.  मात्र त्या गुहेतीला माती सर्वत्र उकरलेली दिसली. 
कुणा एका पक्षा प्राण्याचा वास्तव्य तिथे नक्कीच असावं. ..ह्याची ती खुण होती.
.
पुढे त्या भुयारातून बाहेर पडलो अन ट्रेक्षितीज च्या नकाश्यावर काय काय पाहिलं ते अधोरेखित करत नेढ्याकडे आम्ही वळलो,दुरूनच ते निसर्ग निर्मित नेढे लक्ष वेधून घेत होते .
समोर अलंग मदन कुलंग ची डोंगर रांग मनास साद घालतं होती तर डावी कडे साम्रद, सांधण दरी , आठवनीचं सारं पाजत मनाला ढेकर देत होती .
काही एक वर्षा पूर्वी सांधण दरी ला भेट दिली होती . तिचं अचंबित करणार निसर्ग सौंदर्य अजूनही मनास खिळवत होतं.

आकाशी स्पर्धा करता करता उंच एके ठिकाणी स्थिरावलेले ते काळेकभिन्न कातळ कडे , त्यातून दिसणारे विस्तीर्ण आकाशाचे निळेभोर छत , त्या छताखालून लहान - मोठाल्या दगड धोंडयातून , अधे मध्ये कमरेईतपत साठलेल्या थंडगार पाण्यातून मार्गीस्थ होताना सुरु असलेली तना मनाची धडपड.
त्यांतच मित्रान सोबत केलेली धम्माल अजूनही आठवत होती. टपोरया चांदणीची ती रात्र अन वायू लहरींची ती अंगाई अजूनहि कानाशी गुंजत होती. तना मनाला शिवशिवनारा गारवा अजूनही अंगात हुडहुडी भरवत होता.
सारं काही नजरेसमोरून फिरकत होतं . जणू वाटावं आताच येथून झेप घ्यावी. सदा न सदा खळखळत
वाहणारया त्या आनंदी दरीकडे ......अन विसरून जावं स्वतःला निर्सगाच्या अद्भुत
अलंकारित सौंदर्यापुढे .
शब्द असे गुणगान गात होते त्या सांदण दरीचे ..त्या अलंकारित सौंदर्याचे ..
ठाई ठाई निसर्गाचे असे चमत्कारिक रूप जेंव्हा पाहण्यास मिळते तेंव्हा स्वतःचे भान हरपून जाते . हे काही सांगायला नको .
- क्रमश :-

क्रमश :- उर्वरित भाग लवकरच ....
तुमचा ह्यावर अभिप्राय नक्की कळू द्या .....

धन्यवाद
आपलाच
संकेत उर्फ संकु .





६ टिप्पण्या:

सिद्धेश घाडगे म्हणाले...

Ek sundar pravas ek anandi vatavaran ek bhishanta ek vibhastpana ek akalpit asha anek goshtini ghadlela ratangadcha sampurn pravas ani ya pravasala uttam shabd malet mandnara sanket 1 no. Dhanyawaad mitraa.

Rahul shah म्हणाले...

Sanket Punha 1da RatanGad sar kelyachya anubhav ala. dhanyawad mitra.....(Navkari)

Unknown म्हणाले...

Chhan Lihile aahes... but me miss kela maja tyaveli rahilela adhura pravas...

Sanket Patekar म्हणाले...

Dhanyaawaad mitraho.....

Unknown म्हणाले...

Mastach re khup chaan blog lihila aahes

Sanket Patekar म्हणाले...

Dhanywaad Mitraaa....
- Sanket