सोमवार, १६ जून, २०१४

पाऊस - सह्याद्रीतल्या कडे-कपारीतला

पाऊस - सह्याद्रीतल्या कडे-कपारीतला.. 
जर तुम्ही सह्याद्री वेडे आहात . तर पाउस म्हणजे काय हे वेगळ्या शब्दात काही सांगायला नको .
कारण पाऊस म्हटला कि लगेचच डोळ्यासमोर उभ राहतं ते सह्याद्रीचं विहिंगमय मनवेडं रूप.
स्वतःच अस्तित्व हि भुलवनारं. तना - मनात चैतन्याचं नवं सार पसरवणारं
स्वर्ग म्हणजे काय ? ह्याचं साक्षात अनुभूती देणारं.
जर तुम्हाला खऱ्या अर्थानं पाउस अनुभवायचा असेल तर सह्याद्रीतल्या ह्या दऱ्या खोऱ्यातून मुक्तपणे भटकावं . 
अगदी एखाद्या उनाड मुलासारखं स्वच्छंदी मनानं. तो एक वेगळा अनुभव ठरतो. 
तो वारेमाप उधळणारा अंगअंग झोंबणारा बेभान वारा . त्यात भर म्हणून काय तर टपोरया सरींचा मारा .उंचच उंच कडे कपाऱ्यातुनी धोधो बरसणारे शुभ्र धवल धबधबे .
सह्याद्री माथ्यावरून दिसणाऱ्या वेड्या वाकड्या वळणदार नद्यांचा पाट - ओढे.
तो उन- पावसाचा लपाछुपीचा खेळ अन अशातच आकाशी अवतरलेला सप्तरंगाचा फुलोरा ,
अन हिरवाईने सर्वत्र नव्याने फुललेला साज. सगळं कस डोळ्याचं पारणं फेडणारं.

हिरवा शालू परिधान केलेली हि आपली लाडकी धरित्री . आपल्याला अमाप सुख देऊन जाते .
लेकरांच्या मनाची घालमेल बहुदा तिला समजत असावी . मायेच पांघरून सदैव आपल्या भोवती गुरफटत ती आपल्या आनंदासाठी सदैव टवटवीत - प्रसन्न अन तयारीतच असते.

पावसाळचं हे सह्याद्रीचं रूप खरंच वेड लावतं .
ट्रेक ला निघताना एसटी महामंडळाच्या लाल डब्याच्या प्रवास आठवणीत राहतो .
घाट माथ्यावरचा वळणा वळणाचा काळाभोर डांबरी नागमोडी रस्ता , पावसाच्या सरींनी नुकताच स्वछ न्हावून निघालेला अन त्यावर असलेली पांढरी रेघ आपल्या मनात आनंदाची वलयांकित छाप उमटवून जाते. डोंगर दरयामध्ये फुललेली सोनकीची पिवळसर फुले मनावर प्रसन्न्तेचा साज चढवत राहतात .
खेड्या पाड्यातील चिखलमय रस्ते. कुठेशी साचलेलं डवलभर पाणी अन त्यात मुद्दाम उडी घेण्याचा मोह कधी कधी आवरता हि येत नाही. मन अगदी लहान होवून जातं अशावेळी .
हरिश्चंद्र गड चा माझा अनुभव इथे द्यावासा वाटतो .
खिरेश्वर गावातून आम्ही वाट काढत खिंडीतून आम्ही माथ्यावर पोहोचलो.
माझ्या सोबत माझा मित्र होता . पाउस अन वारा इतका बेभान झालेला त्यावेळेस कि समोरच काहीच दिसत न्हवतं . आपण नक्की कुठवर आलो आहोत हे हि कळत न्हवतं .
उलट वारा वेगाने आम्हाला मागे सरत होता . पाउस अन वारा ह्याचाच काय तो अमंल सुरु होता .
बाकी चिडीचूप शांतात . आम्ही काही वेळ त्याच ठिकाणी स्थिर राहिलो .
तेवढ्यात पांढरया धुक्याची दाट चादर डोळ्यासमोर चटकन बाजूला सरली . अन साक्षात हरिश्चंद्रेश्वराचं ते पवित्र मंदिर डोळ्यासमोर उभ ठाकलं . त्याने तन- मन अगदी भक्तिमय झालं.
देवाने जणू आमचा पुढचा मार्ग खुला केला .
अन आशीर्वाद देऊन पुन्हा क्षणात तो अदृश्य झाला . धुक्याची दाट चादर आपल्यावर ओढवून .
क्षणाचा तो खेळ खरा मात्र मनाला एक वेगळा अनुभव देऊन गेला .

पावसाळी प्रबळगड हि असाच काहीसा वेडा पिसा .
घनदाट झाडींनी वेढलेल्या प्रबळगडावर एकदा तरी पावसात भेट जरूर द्यावी.
धो धो बरसणारा पाउस , वेडा बेभान वारा आपल्याला रोखून ठेवतो .
घनदाट अन शुकशुकाट असणाऱ्या त्या झाडी झुडपातून पावसांच्या सरींचा मारा अंगावर घेत मार्ग काढताना एक वेगळाच अनुभव येतो.
तिथेले कोसळणारे शुभ्र धवल धबधबे तर मनाला भुरळ घालतात.
अन भिजण्याचा मोह आवरता येत. नाही .
पावसाळी सह्याद्रीचं हे रूप नेहमीचं मनाला वेड लावतं.
अन म्हणूनच एकदा का पाऊस सुरु झाला . कि ट्रेकर्स मंडळींना वेध लागतात ते आपल्या लाडक्या सह्याद्रीचे .
तसा सह्याद्री प्रत्येक ऋतुत आपल्याला खुणावत असतो.
त्याच वेगळेपण प्रत्येक ऋतुत वेगळ असतं .
पण तरीही पावसाळचं त्याच रूप काही औरच . मनाला भुरळं घालणारं .
©संकेत य पाटेकर

१६.०६.२०१४

पाणिनी मासिकात प्रसिद्ध झालेला हा लेख...




प्रचि. १
प्रचि. २

प्रचि. ३

प्रचि. ४

प्रचि. ५
प्रचि. ६
प्रचि. ७
प्रचि. ८
प्रचि. ९
प्रचि. १०
प्रचि. ११
प्रचि. १२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: