नाशिक म्हटलं कि सर्वप्रथम
डोळ्यासमोर काय येत असेल तर' सह्याद्रीच्या ह्या' मनाला भुरळ पाडणाऱ्या विलोभनीय
पण अजस्त्र अशा रांगा ...मग ती रांग पूर्व पश्चिमला कलनारी कळसुबाई - त्र्यंबक
रांग, वा अंजठा- सातमाळा रांग असो , वा उत्तर दक्षिण अशी बागलाण कडून सुरु होणारी
सेलबारी डोलबारी रांग असो मनाची घौडदौड सतत इथे धुमसत घालत राहते .
सह्याद्री तसा सदैव साद देतच असतो फक्त आपल्याला थोडी उसंत हवी असते
ह्या रोजच्याच धावपळीतून बस्स ती एकदा मिळाली कि मग पाउलं फिरकू लागतात .
आपल्याच ह्या दुर्गम दुर्ग वाटेने ...कडे कपार्यातून...नवी जिद्द ,नवा उत्साह घेऊन ...नव्या पायवाटा धुंडाळत ...
आपल्याच ह्या दुर्गम दुर्ग वाटेने ...कडे कपार्यातून...नवी जिद्द ,नवा उत्साह घेऊन ...नव्या पायवाटा धुंडाळत ...
काही दिवसापूर्वीच असाच एक योग जुळवून आला असं म्हणण्यापेक्षा तो योग
जुळवून ला अस मी म्हणेन , २८ जून ला , १५ जनाचा ताफा घेऊन आम्ही हरिहर च्या
वाटेने निघालो ...
हरिहर / हर्षगड नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक रांगेतील हा एक पोलादी गड
. साधारण ३० किलो मीटर अंतरावर वसलेला .पायथ्याच गाव निरगुडपाडा , गावात पायउतार
होताच त्याच राकटपण मनाला भुरळ न पाडावं म्हणजे नवलच . त्याच भव्यपण
काळोख्या रात्री हि उठून दिसत . बस्स थोडं चांदण हवं
पहाटे ३:४५ च्या आसपास आम्ही गडाच्या पायथ्याशी म्हणजे निरगुडपाडा
गावात पायउतार झालो .तेंव्हा सर्वत्र काळोख दाटलेला. कोंबडा आरवल्याची अजून हि वेळ
झाली नव्हती.
त्यामुळे गावातले कुणी एक व्यक्ती बाहेर फिरकताना दिसत न्हवती . तसं
अजून हि आमच्या चौघांमध्ये शीत युध्द सुरु होत . चौघ म्हणजे कोण ? तर
मी अन माझी बहिण संपदा , मित्र यतीन आणि ड्राइव्हर काका आंम्ही
शाब्दिक लढत लढत होतो .
नक्की पायवाट कुठून आहे ? नक्की कुठून आपल्याला जवळ पडेल ? येथून
कासुर्ली गाव किती अंतरावर आहे ? त्यासाठी मागे जावे लागेल कि पुढे ? कि येथूनच
जायचं ?
असे ना ना प्रश्नांचा भडीमार अगदी हलक्या आवाजात खेळकर मनाने
एकमेकांवर करत होतो . शेवटी ' आहे त्याच ठीकान्याहून पुढे निघायचे ' असा ठराव पास
करत ,
शाळेच्या आवारात निवांत शांततेत आम्ही थोडा विसावलो. .
काळोख्या रात्रीच सौम्यपण मनाला तसं ताजतवानं करत होतं . उत्साही मन
पहाटेची आस धरून होतं
ह्या किल्ल्याचं तसं खास वैशिष्ट्य म्हणजे उभ्या सरळसोट कातळात
खोदलेल्या त्या पायऱ्या. आणि त्याच आम्हाला इथपर्यंत घेऊन आल्या होत्या . त्यामुळे
कधी एकदा पायवाट
धरतोय अन झपझप पाउलं टाकत त्या पायरयांना स्पर्श करतोय अस झालं होतं
.
गडाचा इतिहास सांगायचा झाला तर ...
हरिहर किल्ला अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात होता. १६३६ साली
शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला. मात्र नंतर
याचा ताबा मोगलांकडे गेला.
पुढे १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात
मोलाची भर घातली. ८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बरखान याने हा किल्ला
जिंकला.
शेवटी १८१८ मध्ये हा गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून
घेतला.
प्राचिन काळापासून महाराष्ट्रातील बंदरात उतरणारा माल अनेक घाट
मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. यातील त्र्यंबक रांगेतून जाणार्या गोंडा
घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर- भास्करगड यांची उभारणी करण्यात आली
होती.
काही क्षण आपल्या आयुष्यात असे असतात . कि जा म्हटलं तरी जात नाही .
कधी कधी हि ' वेळ' आपल्यातला ' संयमीपणा ' अगदी तोलून तपासून पाहते .
कधी कधी हि ' वेळ' आपल्यातला ' संयमीपणा ' अगदी तोलून तपासून पाहते .
पावणेचार वाजता आम्ही येउन सुद्धा वेळ पुढे सरकत न्हवती . अस वाटावं
कि वेळेने आज मौनव्रत धरलंय , पुढे सरकायचचं नाही . असा तिचा ठाम निर्णय असावा .
तर असो धारण चार ते साडे चार दरम्यान एक भली मोठी बस , तिच्या
पाठोपाट दुसरी मिनी बस शांततेला छेदत खुर्खुर आवाजात रस्त्यालगत येउन पोहचली .
शाळेलगत भिंतीच्या बाजूला तिने आसरा घेतला साधारण ७० ते ८० च्या
आसपास चा एक ग्रुप त्या दोन बसमधून हरिहरच्या भेटीस आला होता. त्यामुळे आमच्या
मनाची घाई अजून वाढली होती.
एका वेळेस एकच व्यक्ती जावू शकेल अश्या हरिहरच्या त्या खड्या पायऱ्या
. अन हा ८० जणांचा ताफा , एकदा का सुरुझाला . तर एका व्यक्तीस एक मिनिट धरला तरी
८० मिनिटे लागतील हो . तितका वेळ आपण ताटकळत राहायचं का ? . छे छे
..अजिबात नाही .
मनातच मनाची समजूत घालत , वेळच गणित मांडत . आम्ही पहाटेच्या अंधुक
प्रकाशाची आतुरतेने वाट पाहत होतो .
टौर्च २-३ जण सोडून , अन सांगून हि इतर कुणी आणल्या न्हवत्या .
त्यामुळे थोडा वेळ वाट पाहणं आम्हास क्रमपात होतं. त्याशिवाय पर्याय न्हवता . पण
मनाची घौडदौड आम्हाला शांत बसून देत न्हवती .
शेवटी घडाल्याचे काटे सव्वा पाच वर स्थिरावल्यावर त्या अंधुक प्रकाशात
आम्ही ट्रेक ला सुरुवात केली .सुरवातीला मळलेल्या पायवाट लागली. पुढे नांगरलेली
जमीन दिसत होती.
त्यामुळे पायवाट मधेच लुप्त पावत मधेच उगवत . हरिहर धुक्याच्या
पुंक्ज्यात अजूनही स्वस्थ पडून होता. कुणी तरी आपल्या भेटीस येत आहे, ह्याची
पुसटही कल्पना त्याला नसावी .
निद्रिस्थ अवस्थेत तो आपला शांत पहुडलेला . धुक्याची दुलई अंगावर
चढवत . पण त्याच ते हि रूप मनाला
चैतन्याचं नवगंध अंतरंगात पसरवत होतं. उत्साहाला कसं उधाण आलेलं.
अन त्याच उत्साही मनाने एक एक
पाऊलं पुढे टाकत पाउलवाटा धुंडाळत आम्ही गडाकडे आगेकूच करत होतो. समोरच फ़निचा
डोंगर अन त्यावर रूढ झालेला नागाच्या फणा काढल्यागत असलेला इवलासा सुळका दुरूनच
साऱ्यांच लक्ष वेधून घेत होता.
एव्हाना प्रकाशाच्या डोळस छटा हि सर्वत्र उधळण घालू लागल्या होत्या .
निळ्याशार आकाशात पक्षी पाखरं मुक्तपणे विहार करू लागले होते . त्याचं संगीतमय
स्वर
मनाला एक तालबद्ध लयात धुंद करत होते. सगळ वातावरणाच कसं आल्हादायक
होतं. भारलेल्या अवस्थेत ..
आणि अशातच काही पायवाटा दुभंगल्या गेल्या अन व्हायचं तेच झालं.
चुकीच्या वाटेने निघालो .
पण म्हणतात ना ट्रेक दरम्यान वाटा चुकण्याची मजाच काही और असते. त्याशिवाय
ट्रेक यादगार तरी कसा होणार , पण एक मात्र आहे ह्यात आपण ठरवलेल्या वेळेची घडी
मात्र साफ विस्कटते.
आयुष्याची पायवाट हि अशीच कधी आपण चुकतो. अन एक वेगळ्या पायवाटेवर
येउन ठेपतो .
पण तो हि एक आयुष्याच्या शिकवणीचा भाग असतो . तो शिकून पुन्हा आपली पायवाट शोधत पुढे निघायचं बस्स...
पण तो हि एक आयुष्याच्या शिकवणीचा भाग असतो . तो शिकून पुन्हा आपली पायवाट शोधत पुढे निघायचं बस्स...
साधारण ७:२५ ला आम्ही एका उंच
सोंडेवर आलो. येथे शेंदूर फासलेल्या काही देवांची मांदियाळी होती. मधोमध त्रिशूल
...
हरिहर चा उभा कातळकडा अन त्यात खोदुन काढलेल्या त्या पायऱ्या येथून
स्पष्ट्य दिसत होत्या . येथूनच पुढे स्वर्गरोहनचा आम्ही आनंद घेणार होतो.
' मेल्यावर स्वर्ग दिसतं ' अस म्हणतात . पण आपल्या सह्याद्रीतल्या
कुठल्याही गड किल्याच्या वा शिखराच्या माथाय्वर जा ..किंव्हा दर्याखोर्यातुनी भटका
...
स्वर्ग , स्वर्ग म्हणजे तरी नक्की काय? हेच का ते ? अशी अनुभती आल्याशिवाय राहणार नाही .
स्वर्ग , स्वर्ग म्हणजे तरी नक्की काय? हेच का ते ? अशी अनुभती आल्याशिवाय राहणार नाही .
सर्वत्र पसरलेली धुक्याची दुलई , त्यातून डोकावणारे पहाडी उंच कडे ,
अंग अंग भिडणारा बेभान वारा . त्याच तालमय संगीत , धरणी मायेने प्रेमाने पांघरलेली
हिरवी शाल, कडे कपार्यातुनी धो धो उधळणारे शुभ्र धवल धबधबे ....आपल्या नेत्र
कड्यांचे पारणे फेडते.
वाटतं इथेच घर करून राहावं कायम .........पण घरची वाट पुन्हा पकडावीच लागते.
वाटतं इथेच घर करून राहावं कायम .........पण घरची वाट पुन्हा पकडावीच लागते.
ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो , तो क्षण अगदी जवळ आला
होता.
त्या खोदीव पायरया आम्हाला जणू आव्हान देत उभ्या होत्या. सोबत उनाड
वारा हि चिडवायला तप्तर होता .
कलावंतीण सुळक्याची मात्र इथे आठवण आल्याशिवाय राहत नाही . पण इथल्या
प्रत्येक पायरीला उजव्या डाव्या बाजूला आधारासाठी म्हणून खोबण्या आहेत. त्यामुळे
मनातली भीती कुठेशी पळून जाते.
पण पायऱ्यावरून एक एक पाउल टाकताना मिळणारा आनंद काही औरच असतो. उनाड
वारा आपल्याला प्रत्येक पाऊलावर आपली पीछेहाट करत असतो. त्यातच आपण गडाच्या
पहिल्या प्रवेश द्वारा जवळ येउन पोहोचतो. येथून समोरील विहन्ग्मय दृश्य मनाला भुरळ
पाडते. प्रवेश द्वारातून पुढे येताच उजव्या हाती आपल्याला शेंदूर फासलेल्या
गणेशाची प्रतिमा दिसते . त्याला वंदन करून , एखाद्या गुहेतून चालावं तसा अनुभव घेत
पुढे चालत राहायचे . पुन्हा नागमोडी वळण घेत खोदीव पायर्यांच्या संगे आपण गडाच्या
अंतिम दरवाजाजवळ येउन पोहोचतो. येथून पुढे माथ्यावर आल्यावर ...घुंगावनारा वारा अन
सभोवतालच दृश्य आपलां थकवा क्षणात दूर करतो.
येणाऱ्या पायवाटेच्या दिशेने पाहिल्यास समोर फनीचा डोंगर त्याच्या
पाठी उतवड (ह्या रांगेतला उंच शिखर ) आणि बाजूला भास्कर गड आपले दर्शन घडवून देतो.
पूर्वेकडे चालत गेल्यास , समोरच ब्रह्मा पर्वताचं तेजपुंज रूप मनाचा
हर एक कोनाडा उजळून काढतो त्याच्यापुढे कापड्या , अन भक्तिरसात कायम मग्न असणारा
ब्रम्हगिरी खुणावू लागतो.
वाटेतून पुढे सरकताना , पाण्याच्या काही टाक्या लागतात . पुढे एक
तलाव अन तळया काठी हनुमानच मंदिर , बाजूला छोटस शंकराचं मंदिर दिसतं.
येथूनच पुढे पुढे चालत गेल्यास ती घुमटाकार इमारत दिसते . इमारतीच्या
डाव्या उजव्या अंगाला पाण्याच्या काही टाक्या आहेत अन एक तळ आहे . त्यातलं
पाणीपिण्या योग्य आहे. येथूनच सभोवतालच पहाडी दृश्य मनाला घायाळ करत . निसर्गाच्या
त्या सौंदर्य रूपाचा पुरेपूर आनंद लुटायचं अन परतीच्या मार्गाला लागायचं.
गडावर पाहण्यासारखं फारस तसं काही नाही. माथा निमुळता असल्याने १
तासात गड फेरी पूर्ण होते.
परतीचा मार्ग...
गडावर सर्वप्रथम आमचाच प्रवेश झाल्याने आम्ही गडफेरी करून
निघण्याच्या तयारीला लागलो. साधारण सव्वा नव च्या आसपास आम्ही परतीच्या वाटेला
निघालो. अन गडाच्या माथ्यावरल्या अंतिम दरवाजाजवळ येउन पोचलो. एव्हाना इतर ग्रुपचा
काही ताफा गडावर येउन पोहचला होता .
तरी हि कित्येक संख्येने अजून त्यांच्या एका पाठोपाठ अश्या रांगा
लागल्या होत्या .
साधारण १२०-१५० च्या आसपास त्यांची संख्या नक्कीच असावी. इतकी भरभरून
ट्रेकर्स मंडळी आली होती. त्यात काही नवखी होती . काही धापा टाकत वर येत होती.
बहुतेक तर गुज्जू च दिसत होती. एका वेळेस एकच अश्या पद्धतीने त्या पायर्या
चढायच्या अन उतरायच्या असल्याने . आम्ही वरच खोळंबून राहिलो. कारण ह्या मंडळीचा
इंजिनच्या शेवटचा डब्याचा अजून काही पत्ताच न्हवता.
जवळ जवळ पाउनतास आम्ही वरच अडकलो. मग मात्र सटकलो.
येताना चुकीच्या वाटेने आल्या कारणाने परतीची वाट आम्ही नेहमीचीच
रुळलेली पकडली . अन पाउने अकराच्या सुमारास निरगुड पाडा टाकेहर्ष गावी येउन
पोहोचलो.
येथून पुढे त्रंबकेश्वर ला जायचे असल्याने फार वेळ न दवडता आम्ही
त्रंबकेश्वर मार्गी निघालो.
साधारण तासाभरात आम्ही तिथे पोहचलो.
समोरच ब्रह्मगिरी चा अजस्त्र डोंगर खुणाऊ लागा होता . पण त्याच्या वर
जाण्या इतपत वेळ आम्हा जवळ न्हवता .
देव दर्शन घेऊन २ तासात आम्हाला निघायचे होते. नुकताच १२ चा टोला
पडला होता. अडीच पर्यंत येथून निघणे भाग होते.
त्रंबकेश्वर धार्मिक स्थळ असल्याने आणि १२ ज्योतिर्लिंग पैकी एक
असल्याने भाविकांची येथे सदैव गर्दी असते. आजही होती.
अन म्हणून देवाचे दर्शन घेण्या पूर्वी आम्ही 'रांगेचे ' दर्शन
घ्यावयास आधी गेलो. आणि भली मोठी रांग पाहता तिथेच थोडा वेळ थबकलो. २-३ तास रांगेत
उभे राहूनही शिवशंकराचे दर्शन मिळणे कठीण होते. ' पैसे देऊ करून दर्शन घ्यायचे
न्हवते.' दर्शन घेण्यासाठी हि हल्ली शोर्ट कट युक्त्या वापरतात लोक .
तश्या पाट्या लावलेल्या असतात भोवताली. २०० रुपये . ह्या बाजूने
...३०० रुपये ह्या बाजूने...
' देवाच दर्शन हि हल्ली पैशाने विकत घेता येतं. इतपत पैशाने मजल
मारलेय .
माणसं एखाद्या गरजूला पैसे देणार नाहीत . पण देवळात मात्र पैसे
टाकतील . मग ते रुपयापासून २०० ते १००० ..लाख रुपापर्यंत असो.
मनात श्रद्धा अन भक्ती भाव असला म्हणजे झाला . माझं देवळात जाण्यामागे
एक कारण असतं .
तिथल्या वातावरणात एक गंध दरवळत असतो चैतन्याचा . अन तो मन एकाग्र
करण्यास अन प्रसन्न्तेचा प्रसाद देण्यास एकप्रकारे मदत करत असतो.
माणसातल्या मनावर माझी जास्त श्रद्धा आहे . देवाचा अंश मी तिथे जास्त
मानतो. अन म्हणूनच फार तर मी देवळात जात नाही. पण देव मनात नाही असा अर्थ होत
नाही.
तर असो दर्शना साठी इतका वेळ आम्हा समीप नसल्याने इतर मंदिरांच दर्शन
घेऊन , मग जेवून खाऊन परतीच्या मार्गावर कसारा दिशेने निघालो. ते हि डुलक्या घेत
घेत ...
_____________________________________________________________________________________
ह्या ट्रेक दरम्यान मनावर कोरलेले काही प्रसंग :-
खाऊ दे नाहीतर पैसे दे .
ट्रेक दरम्यान एका पायवाटेवरती ' त्या कोवळ्या चिमुरड्यांच हे वाक्य
अजूनहि त्या स्वरानिशी कानाशी गुंजतंय ..
आयुष्याच्या व्याख्या ची पुन्हा नव्याने उजळणी करत .
त्यावेळेस मनालाच ते वाक्य इतकं सरकन घासून गेलं कि खोल जखम व्हावी
इतपत ... त्यावेळेस हाती जे होतं ते देऊ केलं पण त्याने मन काही समाधानी झालं नाही
. कुठेतरी ते चित्र अन ते वाक्य मनात सळ करून राहिलंय.
कळसुबाईची ती छोटी ताई असो . पोटाच्या खळगीसाठी म्हणून भर उन्हा
तान्हात झाडाचा आडोशा पकडून ,
' दादाss दादाss ताक घ्याना ?अस म्हणत मोठ्या आशेने
बघणारी .
नको म्हणताच मागे मागे पळत येउन केविलवाण्या स्वराने
' दादा काही खायला द्याना ? म्हणत काळजाच पाणी पाणी करणारी ..वा खाऊ
दे नाहीतर पैसे दे ...म्हणणारी हि चिमुरडी .....
मनाला एक विचार देतात . अजूनही
कुणाला कुणाची तरी गरज आहे .
प्रेमाची गरज आहे , मायेच्या स्पर्शाची गरज आहे. मदतीची गरज आहे. आपलेपणाची गरज आहे.
प्रेमाची गरज आहे , मायेच्या स्पर्शाची गरज आहे. मदतीची गरज आहे. आपलेपणाची गरज आहे.
क्रमश :- पुढील भाग लवकरच ...
इतिहास संदर्भ :- ट्रेकक्षितीज , अन
http://www.marathiworld.com/bhramanti-m/hariharkilla
©संकेत य पाटेकर
०७.०७.२०१४
______________________________________________________________________________________
फोटो सूची :-
प्रचि २
हरिहर ची सुंदर पहाट ..
प्र
चि ३ एका टप्प्यावर
प्रचि ४ ..... डावीकडे दिसतोय तो फ़निचा डोंगर
प्रचि ५ ...... हरिहर ची कातळ समशेर
प्रचि ६ .....उगवत्या सूर्यबिंबाचे विलोभनीय क्षण आपल्या कॅमेरात टिपताना ..माझी बहिण
प्रचि ७ ....डोंगरा पलीकडे उभा असलेला हरिहर
प्रचि ८
प्रचि ९......हरिहर पहाडी कडा....कातळात खोदलेल्या पायऱ्या येथूनही दिसतायेत पहा
प्रचि १०....फ़निचा डोंगर आणि सभोवताल
प्रचि ५२
ह्या वेळेस भौगोलिक अभ्यावर जरा जास्त भरणा होता . म्हणून इतकी खटपट केली . आणि त्याचा फायदा हि झाला
झालेला प्रवास :-
शनिवारी रात्री प्रस्थान ...कसारा लोकल ने :-
ठाणे ठीक ११:३० कसारा १:१८
कसारा - हरिहर (निरगुड पाडा / टाकेहर्ष )- त्रंबकेश्वर मंदिर - कसारा (काळी निळी जीप ने प्रवास, ठरवून ठेवलेली )
कसारा - हरिहर - २ ते ३:४०
ट्रेक ला सुरवात - पहाटे ५:१५ , गडाचा माथा :- ८:००
९:१५ ला उतरण्यास सुरवात - पायथा निरगुडपाडा/टाकेहर्ष - १०:५०
निरगुडपाडा/टाकेहर्ष -त्रंबकेश्वर मंदिर - ११:०० - १२:००
२ तास, देवदर्शन / जेवण
त्रंबकेश्वर मंदिर - कसारा - दुपारी २:३० ते ४:००