शनिवार, १२ एप्रिल, २०१४

भटकंती सिंधूदुर्ग जिल्ह्याची - भाग ३

प्रवासातील ठळक गमती जमती :-

२१ तारखेची ती रात्र ,वार गुरुवार , घरातून बाहेर पडलो, ते तीन चार दिवसाचं संसारिक ओझं पाठीशी बळकावतच . ठाणे ते सिंधुदुर्ग ह्या दूरच्या प्रवासासाठी . ठराविक रसरसत्या , घुमशान अश्या मित्रांच्या सोबतीनं . निलेश, राज , हेमंत , स्नेहल, सुशांत , स्वप्नील आणि अभिजीत अश्या ह्या मित्रजोडीन सोबत .
ऐरवी स्वताच्या कामात गुंतलेली पण तरीही अधून मधून केंव्हातरी वेळेत वेळ काढून भेटणारी ,भेटता गप्पांच्या ओघात वाहून घेणारी . ध्येयाने पछाडलेली . भटकंतीची ओढ असलेली . प्रेमाने एकजूटलेली हि मित्र मंडळी पुन्हा एकत्रित आली ३-४ दिवसाच्या ह्या आनंदमयी यात्रेसाठी .

निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला हरवून घेण्यासाठी , ऐतिहासिक बळकट अश्या स्वराज्यातील किल्ल्यांचा इतिहास जवळून अनुभवण्यसाठी , मालवणी भाषेची चव चाखन्यासाठी ,कोकणातली मनाला भुलवणारी हिरवळ पाहण्यासाठी (माझ्या प्रिय मित्रांनो कृपया इथे वेगळा अर्थ धरू नये ) . ह्या सर्वातून आनंद अन प्रेरणेच नवं अंकुर तना मनात रुजविण्यासाठी .

तर आम्ही निघालो ...चार पायी वाहनातून, ८ +१ ( वाहन चालक ) मित्रांच्या समूहाने ... कोकणातून कोकणाकडे ...
सारे मित्र एकत्रित जमले कि गप्पांना , थट्टा मस्करीला कसा अधिक उत येतो . त्याने प्रवासाला एक वेगळीच रंगत चढते हे म्हणायला हरकत नाही . संपूर्ण प्रवास तो आठवणीत राहतो तरीही त्यातल्या त्यात काही रोचक असे क्षण ठळक पद्धतीने आपल्या स्मृतीशी जोडले जातात ते कायमच ... .

कालांतराने त्यातून हास्य विनोद घडतात काय ...नि त्या आठवणीने अंगाला शहारे येतात काय ....

असो ..तर आमचा हा प्रवास हि असाच झाला आठवणीचा झुल्यात झुलान्याजोग .

काही मोजके क्षण :-

पहिला दिवस -
कणकवली पासून ...आमची गाडी पुढे धावू लागली आणि धावता धावता तिला पोलिसांची धाप लागली.
तब्बल एक नाही दोन नाही तर सहा वेळा पोलिसांनी जागोजागी अडवलं . कुठून आलात ? कुठे निघालात ? हे ते चौकशीचा अन तपासणीचा सत्र, .. आचारसंहिता लागू ना, निवडणुका ज्या जवळ आल्या आहेत . ह्यातच आमचा अधिक वेळ गेला . काका , मामा करून वेळ काढून घेतला , तरीही आखलेल्या पुढच्या प्रवासीवेळेचा खोळंबा व्हायचा तो झालाच .

* भोगावेच्या नितळ सागरी किनार्याकडून होणारा मावळता सुर्यकिरणोत्सव , त्याच्या विविध नयनरम्य रंगीत छटा. ना ना म्हणता , अवघ्या काही मिनिटासाठीपूर्वी .
धावत पळत आलो म्हणून पाहता आल्या. हे त्यातल्या त्यात विशेष....

पण त्या आधी आम्ही उतरलो होतो ते मित्राच्या काकांच्या घरी ...झारप ह्या ठिकाणी ..
नारली पोफळींच्या बागेत , विवध वृक्ष वेलींच्या छायेत, रस्त्याच्या अगदी कडेला निवांतपणे विसावलेल ते टुमदार छोटस पण प्रशस्त अस एकुलत एक घर , आणि घराला घरपण देणारी ती गोड माणस.
वर्षातून दोन वेळा पिक देणारी भातशेतीची जमीन , गाई वासरं , दगडांच्या अनेक चीरांनी गोलाकार होतं. पाण्याचा नितळ फुगवटा पियासाठी खणलेली ती विहीर .
सारच रम्य ...

ह्यात विशेष सांगायचं तर दोन गोष्टी :-
१) - हि आमुच्या पुरत सीमित ठेवतो
२) काकांनी - काकींनी आमच्यासाठी बनवलेली रुचकर , चवदार अशी मिसळ . त्यांचा आदरतिथ्य .

* तेरेखोल चा किल्ला ..., किल्याचा केलेला हॉटेल ...
किल्ल्याला भेट देणारे तिथले विदेशी पर्यटक ( कपड्यांचा ह्यांना नेहमीच तोटा असतो बहुतेक, कमीत कमी कपड्यात वावरत असतात इथे ....गोव्याची हद्द जी सुरु होते ). असो अतिथी देवो भव !

* तेरेखोल च्या आसपासच्या वृक्ष दाटीत दर्शन देणारा होर्न बिल .

* रेडीचा गणपती मंदिर , गणेशाची भव्य दिव्य सुबक अशी मूर्ती
* आरवली चा वेतोबा मंदिर, त्याला देत असलेला चपलेचा नवस

आणि माझा बंगला - मधील चविष्ट रुचकर अस पोटतृप्तीचं ढेकर देणार जेवण . विशेष करून सोलकढी...

* आठवणीत राहणार अस खास :-
पहिल्या दिवसाचं पहिल्या रात्रीच झणझणीत खमंग अस जेवण .
आमटी भात स्पेश्यल ..
जे आमुच्या प्रिय मित्रांनी बनवल होतं . प्रेमाने बनविलेल जेवण होतं खर ..पण नाका तोंडातून , कानातून , कानामागून गरम पाण्याच्या वाहत्या धारा वाहू लागल्या होत्या. (मित्रांनी हे मनावर घेऊ नये, नाहीतर माझ्या मनावरची पकड ढिली व्हयाची .)
पण तरीही रेन्गालेली ती चव काही जिभेवरून हटत नाही आहे .

दुसरा दिवस ....
लक्षात राहील अस
१) मालवणचा परतीतला नौकेतला तरंगमय प्रवास आणि आया मावशींच्या जपमाला .
त्यात सागरी जलधारांनी भिजलेला मी ...अन त्यातून घडलेला विनोद .
२) सिंधू दुर्ग किल्यातील शिवरायांच्या बोटा पायंचे ठसे . जे पहिल्यांदा पहिले . दुसर्या भेटीत .
(किल्यांवर एक वेगळा भाग लिहिणारच आहे . तेंव्हा सांगेन )

३)देवबाग मधली - WATER SPROTS ACTIVITY
जेट स्की राईड , बनाना राईड , बम्पर राईड...
ह्यात बनाना राईड...मध्ये साफ पाण्यात बुडालो . नाका तोंडात ते खारं पाणी गेल .
वाचवायला हि कुणी आले नाही . फार उशिरा कुणा एकाच लक्ष गेल . म्हणून नशीब ...
कुणा एकाच म्हणजे निलेश ह्याच .......
नाका तोंडात पाणी गेल्यावर मदतीचा हात द्यायला आला. मित्र मित्र राहिला नाही तो तेंव्हा . दगा दिला त्याने .त्यामुळे ....माझा त्याच्यावरचा रोष कायम राहील .
हा रोष जाण्यासाठी त्याने पुढील ट्रेक चा अथवा पिकनिक चा माझा खर्च स्वतः हा करावा .

* WATER SPROTS नन्तर ....भानजी पडा ह्या निवास स्थानी ..रात्री
अचानक वीज गेल्यावर ..होणारी धीर गंभीर शांतात आणि त्या शांततेच भंग करणारी
कंठेतली ती स्वर किंकाळी...संकेत संकेत संकेत ..संकेत ...

अजून बर्याच गोष्टी आहेत ..लिहित राहिलो तर लेख बरंच मोठा होईल . त्यामुळे इथेच संपवतो .
एक झोप उडवणारी आठवण सांगत...

*पहिल्याच रात्री ठाण्यातून ..प्रवास सुरु झाल्यावर गाडी पनवेल च्या पुढे आली . आणि
गाडी च्या POWER स्टेरिंग चा ताबा गाडीच्या DRIVER कडून आमच्या मित्राकडे आला . स्वताहून तो ताबा घेतला त्याने .
आणि गाडी क्षणातच रस्त्याने धावू लागली . अशी धावू लागली .. .....कि झोपी गेलेल्याचा डोळा नन्तर उघडा तो उघडाच राहिला . पार झोपच उडाली साऱ्यांची...
नंतर रीतसर त्याने ताबा होता त्याला दिला . तेंव्हा कुठे सारे निवांत झाले.

असो तर ह्या झाल्या गमती जमती..... कुणी हि मनावर घेऊ नये . मी हि घेत नाही .
आता भेटू पुढच्या भागात ...


आपलच संकेत उर्फ संकु .
०४.०४.२०१४
भटकंती सिंधू दुर्ग जिल्ह्याची - भाग ३






























*हि सर्व क्षणचित्रे माझ्या मोबाईल द्वारे टिपलेली आहेत.

भटकंती सिंधू दुर्ग जिल्ह्याची - भाग १

ती रात्र ....सागरी किनारयावरची ...

दाट काळोख्या रात्री , पाखरांच्या किर्र किर्रात , नारळी पोफळींच्या बागेतून मार्ग काढत , हळूच पाउला पाउलांनी गोऱ्या दामट्या रुपेरी वाळूत , पायांचे ठसे उमटवत ..अंगा खांद्यावरून वाळूचे कण कण साठवत, फेसाळणार्या किनार्यावरून पुढे मागे होतं. नजरेच्या चोर पावलांनी हर एक दिशा धुंडाळत , सागरी लाटेची ती मनवेडी, तना मनाला धडाडनारी, हृदयी स्पर्शनारी , भयाचे सावट पसरवणारी ती लहरी गाज कानी घेत , असंख्य तारकांच्या दिपोस्त्वात ..लुकलुकत्या नजरेनी निसर्गाचे ते वेगळेपण अनुभव होतो.
खरच आयुष्यातला माझां हा पहिलाच क्षण असा असेल ...जो ह्यापूर्वी मी कधी अनुभवला न्हवता.
चांदण्या रात्री साडे दहा ते बारा दरम्यान निर्जन समुद्र किनारी फेरफटका मारणं ..निवांत एके ठिकाणी बसून , गहिऱ्या हसऱ्या डोळ्यांनी निसर्गाचं ते वेगळेपण अनुभवणं .खरंच एक वेगळा अनुभव ठरतो .

निसर्गाच हे रूप नक्की पहायला हव ...कुणा सोबतीनं ..कधी एकट्यानं..
अथांग पसरलेल्या ह्या सागराचं विशाल रूप दिवसा अन रात्री खरंच वेगवेगळ असतं.
कितीसाऱ्या गोष्टी तो सांगू इच्छितो ...एकदा का त्याच्याशी समरस झाल्यावर ..
मी हि त्या रात्री निसर्गाच्या त्या रूपाशी समरस झालो होतो .

सागराची ती विशाल ' लाट' जणू आपल्याशी काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे . असा भास प्रत्येकवेळेस होत होता .पण दरवेळेस तिचा हात माझ्या पर्यंत पोहोचत न्हवता . हृदयी धडाडी भरवनारा आवाज तो काय कानी गुंजत होता तीतकाच ?
काय बर सांगायचा असेल तिला ? इतके वर्षी ना वर्षो सोबत राहून ..
सागराच्या अंतकरणाच्या , मनाला पिळवनारया गोष्टी तर नाही ना ?
विशाल म्हणून घेताना स्वतःच्या अंत करणात कितीसार्या गोष्टी तश्याच दडपून राहिल्या असतील ?
त्या उघड करायच्या तर नसतील ना
?
हे मानवांनो सागराला हि अंतकरण आहे ......ह्याची कुणी दखल का घेत नाही . हे तर ओरडून सांगायचं नसेल ना ?
प्रश्ना वर प्रश्न पडत होते . पण उत्तर मिळत न्हवती .
सागराचं अं:तकरण जाणण्याइतपतं माझं मन विशाल नाही . मोठं नाही. त्याच्या सारख वीशालत्व येण्यासाठी बरंच काही सहन कराव लागेल. प्रसंगी कठोर राहावं लागेल.
वर्षो न वर्षो तो सार काही पाहत अनुभवत स्वतःला तो घडवत आला आहे.
मला हि अनुभवाचे दाखले घेत असंच मनाचं विशालत्व प्राप्त करून घ्यावं लागेल. तेंव्हा कुठे काही कललेल. उमगेल .
मी स्तब्ध झालो. ....प्रश्नाची घडी हळुवार निस्तरत होती.

सागरी लाटांची ती आगेकूच सोडली तर सारच शांत होतं .
घोंगावनारा वारा काय तो अधून मधून स्पर्शून जाई . त्यात वेळ हि अशीच पुढे सरकून जाई .
नजर अशीच एका दिशेला वळली .
पूर्वेकडून दाट झाडीमागून चंद्र अलगद वर डोकावतं सृष्टीच ते चांदणं रूप आपल्याच शितलमय प्रकाशाने अधिक तेजोमय करत . इथलं जीवन चक्र जणू न्हाहाळत होतं.
त्याच साजिर गोजिर रूप मनाला प्रसन्नता बहाल करत ..मनाला एक प्रकारे चकाकी आणू पाहतं.

खरचं हि सृष्टी किती अद्भुत अन रहस्यमय आहे न्हाई . तितकीच त्याची सौन्दर्याता हि ..
मनाला भुलवणारी ...हर्षनारी...रोमांचित करणारी ...

विचारांचे पडघम चालूच होते .

ह्या चंद्रासारख शांत , पण तरीही आपल्या सौम्य शीतल प्रकाशानं , इतरांच्या आयुष्य उजळणार काळोखपण दूर सारणार , त्याच करुणामय तेज मला हि प्राप्त करून घेता येईल ?
मी हसलो .....स्वतःशीच ..........क्षणभर ..

बरंच काही करायचं आहे आयुष्यात . चांगल जे काही दिसेल ते घ्यायचं. स्वतःला घडवायचं ..आणि आपल्या सोबत इतरांना हि घडवत जायचं .
निसर्गाने भरभरून दिले आहे . निसर्गच खरचं एक आगल वेगळं रूप आहे . काही समजण्या इतपत तर काही समजण्या बाहेर .जे समजतंय ते घ्यायचं . अन चालू पडायचं आपल्या मार्गाने ....

भटकंती सिंधू दुर्ग जिल्ह्याची - भाग १
- संकेत य पाटेकर
२९.०३.२०१४
__________________________________________________________________________

भटकंती सिंधूदुर्ग जिल्ह्याची - भाग २

' येवा कोकण आपलाचं असा' ......

नारळी पोफल्यांच्या सुंदर बागा, काजू - आमराईच्या वनात वसलेलं प्रशस्त टुमदार अस देखणं कौलारू घर. मोकळ्या अंगणी वर्षो न वर्षी खितपत पडलेली तरीही कोरडा घसा आजहि तितक्याच चवीनं ओलावणारी विहीर , फणसाच्या गरया वाणिक गोड कोकणी माणसं , त्यांचे रसाळ मालवणी शब्द ...,
आणि जेवणात असेलली , जिभेवर तासंतास रेंगाळणारी , पोट तृप्तीचा ढेकर देणारी चविष्ट अशी सोलकढी.

' येवा कोकण आपलाच असा' ....हे ब्रीद वाक्य खरंच इथे आल्यावर सार्थकी ठरत .

निसर्ग देवतेच वरदहस्त लाभलेला हा सिंधूदुर्ग जिल्हा..
पावला पावला नजीक त्याच्या अलौकिक सौंदर्याचा - ऐतिहासिक घडामोडींचा प्रत्यय घडवून देतो.

नितल स्वच्छ , मानवी वर्दळ नसणारे , निवांत असे सागरी किनारे.. .... तना मनात चैतन्याचा नवा साज फुलवणारे गतीवान वारे ,

पाहताच क्षणी छाती अभिमानाने प्रेरित ह्वोउन फुलुनी यावी असे ऐतिहासिक बळभक्कम जलदुर्ग.

श्रद्धेच्या अथांगतेने दोन्ही कर एकत्रित जुळुनी यावे अन माथा नकळत देव देवितांच्या चरणी झुकुनी जावे असे सुरेख- सुबक - प्रशस्त , अशी कलात्मक मंदिरे ..

एकीकडे अथांग पसरलेला सागर दुसर्या बाजूला कर्ली खाडीचा संथ प्रवाह आणि त्या दोहांचा चंद्र सूर्य ताऱ्यांच्या साक्षीने नित्य नेमाने होणारा सुरेख संगम .
सृष्टी सौंदर्याचा अनोखा मिलाफच म्हणावा असा हा देवबाग .

कोकणातील विविध पारंपारिक अशी संस्कृती...

काय काय पहिल आम्ही .. त्यापेक्षा काय नाही पहिल आम्ही ....
कोकण मनी भावला तो असा ...................येवा कोकण आपलाच असा.

भटकंती सिंधूदुर्ग जिल्ह्याची - भाग २
- संकेत य पाटेकर
०१.०४.२०१४

तांबरडेगचा नितळ समुद्र किनारा ..



भटकंती सिंधूदुर्ग जिल्ह्याची - भाग ३ साठी येथे क्लिक करा

http://sanketpatekar.blogspot.in/2014/04/blog-post_6680.html

आपलं ' शिववैभव' पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला

पद्‌मदूर्ग (कासा किल्ला)
किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग
जिल्हा : रायगड

ना , हो , करता करता शेवटी ..आपलं शिववैभव " पद्मदुर्ग (कासा किल्ला ) काल , अगदी जवळून पाहता आला .
अगदी धन्य जाहलो . इथल्या चिरा , इथल्या वास्तू , इथली भक्कमता. अजूनही इतिहासाचे तेज अंगी भिनवते.
इतिहासाची साक्ष देत हा आपला किल्ला अजूनही सुव्यवस्थितपने उभा आहे.
गरज आहे ती आपली पाउलं इथपर्यंत नेण्याची . तिथे जाऊन नतमस्तक होण्याची .
नजरेत सार सामावून घेण्याची ..
वर्षानुवर्ष तटबंदीला धडाडणार्या लहरी लाटा अजूनही नाराज मनाने पुन्हा माघार घेतात.
इथली भक्कमता अजूनही त्या लहरी लाटेला जुमानत नाही .
जंजिरा पाहायला सर्वच जातात . पण आपला हा शिवरायांचा किल्ला अजूनही दुर्लक्षित आहे .
सर्वांनी एकदा जरूर पाहून यावे .
थोडी खटपट जरूर करावी लागते तिथवर जाण्यासाठी हे खर आहे. पण तरीही जावून यावेच .

संकेत पाटेकर
०७.०४.२०१४

__________________________________________________________________________________
ट्रेकक्षितीज ह्या संकेत स्थळावरून घेतलेली पुढील माहिती :-

मुरुडच्या सागर किनार्‍यावरुन पश्चिमेला समुद्रात एक किल्ला दिसतो तोच पद्‌मदूर्ग उर्फ कासा किल्ला. मुरुड - जंजिरा पहाण्यासाठी आलेले पर्यटक सहसा पद्‌मदूर्ग पहाण्यासाठी जात नाहीत. कारण जंजिर्‍याला जाण्यासाठी ज्याप्रमाणे बोटी सहज उपलब्ध आहेत, त्याप्रमाणे पद्‌मदूर्गला जाण्यासाठी बोटी सहज मिळत नाहीत. त्यासाठी मुरुडहून खाजगी होडी करुन या किल्ल्यावर जावे लागते.

छत्रपती शिवाजी राजांनी बांधलेला हा किल्ला आजही सुस्थितीत उभा आहे. शिवरायांच्या शब्दात सांगायचे तर ‘पद्‌मदूर्ग वसवून राजापूरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापूरी केली आहे’. असा हा सुंदर किल्ला एकदा तरी वाकडी वाट करुन पाहावा असा आहे.

इतिहास :
जंजिर्‍याच्या सिद्दीचा कोकणपट्टीला उपद्रव होत होता. त्याला आळा घालणे आवश्यक होते. त्यासाठी शिवरायांनी मुरुड जवळ सामराजगड बांधून सिद्दीच्या जमिनीवरील हालचालीवर नियंत्रण आणले, तर सिद्दीच्या समुद्रावरील हालचालींना जरब बसविण्यासाठी महाराजांनी मुरुडजवळ समुद्रात असलेल्या कासा बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर पाथरवट, गवंडी, लोहार, सुतार यांची रवानगी कासा बेटावर करण्यात आली.

ही बातमी सिद्दीला कळल्यावर तो अस्वस्थ झाला, कारण या किल्ल्यामुळे त्याच्या समुद्रावरील हालचालींवर मर्यादा येणार होत्या. त्याने आरमार घेऊन चढाईची तयारी केली होती, परंतू महाराजांनी सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी दर्यासारंग दौलतखानाची आधीच नेमणूक केली होती. किल्ल्याची रसद पुरवण्याचे काम प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक यांच्यावर सोपवली होती. या कामात हयगय झाल्याचे कळताच महाराजांनी १८ जानेवारी १६७५ ला जिवाजी विनायक यांना खरमरीत पत्र लिहून त्यांची कान उघडणी केली. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी रात्रं दिवस एक करुन, सिद्दीशी लढत-लढतच किल्ल्याची उभारणी केली. पद्‌मदूर्गचे पहिले हवालदार म्हणून शिवरायांनी सुभानजी मोहीते यांची निवड केली.

इ.स १६७६ मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली फौज देऊन महाराजांनी जंजिर्‍याची मोहिम काढली. या मोहिमेत मचव्यांवरुन तोफांचा मारा जंजिर्‍यावर केला, पण अपेक्षित परिणाम साधला नाही. मग मोरोपंतांनी जंजिर्‍याला शिड्या लावण्याची धाडसी योजना आखली. पद्‌मदूर्गवर काम करणार्‍या अष्टागारातील सोनकोळ्यांच्या प्रमुखाने, लाय पाटलाने हे जबरदस्त आव्हान स्विकारले. एका रात्री लाय पाटील आपल्या ८ १० सहकार्‍यांसह पद्‌मदूर्गतून बाहेर पडले अंधाराचा फायदा घेत जंजिर्‍याच्या पिछाडीला जाऊन तटाला दोरखंडाच्या शिड्या लावल्या व मोरोपंतांच्या धारकर्‍यांची वाट पाहात राहीला. पहाट फुटायची वेळ झाली तरी सैन्य आले नाही. हे पाहून निराश मनाने लाय पाटलाने पद्‌मदूर्ग गाठला.

लाय पाटलांचे हे धाडस पाहून शिवाजी महाराजांनी त्र्‍यांना पालखीचा मान दिला. पण दर्यात फिरणार्‍या सोनकोळ्र्‍यांना पालखीचा काय उपयोग म्हणून लाय पाटलांने नम्रपणे पालखी नाकारली. यावरुन महाराज काय ते समजले त्यांनी मोरोपंतांना एक नवे गलबत बांधून त्याचे नाव ‘पालखी’ ठेऊन लाय पाटलांच्या स्वाधीन करण्यास सांगितले. याशिवाय राजांनी लाय पाटलास छत्री, वस्त्रे, निशाण व दर्या किनारीची ‘सरपाटीलकी’ दिली.

संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत पद्‌मदूर्ग स्वराज्यात होता. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ही १६८९ मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात असल्याचा उल्लेख इंग्रजांच्या पत्रात आहे. त्यानंतर पद्‌मदूर्ग सिद्दीच्या ताब्यात गेला. मराठ्यांनी पेशवेकाळात परत तो जिंकून घेतला पण त्याविषयी माहिती उपलब्ध नाही.
___________________________________________________________________________________________

क्षण चित्रे .....
प्रचि १
पद्मदुर्ग कडे जाताना ..सागरी मार्ग


प्रचि 2
आपलं ' शिववैभव' पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला
प्रचि 3
इतके वर्ष सागराच्या लहरी लाटेला न जुमानता अजूनही भक्कमपणे उभा राहणारा आपलं हा दुर्ग
प्रचि 4
आपलं ' शिववैभव' पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला
प्रचि 5
जंजिरा ला जाणे सोयीचे आहे . पण आपल्या ह्या शिव दुर्गावर ' पद्मदुर्ग' ला जायचं म्हटलं कि बरीच खटपट करावी लागते .इथले काही नेमकेच स्थायिक आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातात
प्रचि 6
आमचा ग्रुप ...फोटो , शिखरवेध सोबत
प्रचि 7
इथला दगड झिजला ..पण त्या चीरांमधला चुना अजूनही तसाच आहे.
प्रचि 8


प्रचि 9
आतला परिसर ...पडझड झालेल्या वास्तू


प्रचि 10


प्रचि 11 गडावर अजूनही बर्याच तोफा आहेत , त्यातलीच हि एक ....अजूनही शत्रूवर नजर ठेवणारी


प्रचि 12

प्रचि 13
प्रचि 14
कडाडणारी तोफ ..जणू अजूनही शत्रूवर नजर ठेवून आहे.
प्रचि 15
तटबंदी
प्रचि 16
कमळाच्या आकाराचा बुरुज ...
प्रचि 17
काही अवशेष
प्रचि 18
अजूनही मनाशी खवळनारा....जंजिरा

प्रचि 19
पद्मदुर्ग - मागील दरवाजा

प्रचि 20
शत्रूवर नजर ठेवून असणार्या तोफा ....समोर दिसतोय तो जंजिरा
प्रचि 21
अजूनही ऊतम स्थितीत असलेला शौचकूप

प्रचि 22

प्रचि 23
प्रचि 24
मागील दरवाजा ,,,
प्रचि 25
प्रचि 26
पडझड झालेल्या तटबंदीचे काही अवशेष
प्रचि 27
पडझड झालेल्या तटबंदीचे काही अवशेष
प्रचि 28
प्रचि 29
पडकोट
प्रचि 30
दरवाजा
प्रचि 31
प्रचि 32
प्रचि 33
मुख्य दरवाजा
प्रचि 34
परतीच्या मार्गावर ...
प्रचि 35
प्रचि 36
प्रचि 37
जेट्टी
प्रचि 38
भगवा ...........आमची शान आमचा अभिमान
प्रचि 39
शेवटी जंजीरयावर विजयी शान फडकवत निघालेली आपली मर्हाटी नौका... :);)
प्रचि 40
प्रचि 41 दूरवर दिसणारा ....आपला पद्मदुर्ग
प्रचि 42
काशीद सागरी किनारा
प्रचि 43

आपलाच ,
संकेत य पाटेकर